भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना त्रास देणाऱ्या ‘जिवलग’ हितशत्रूंनीच त्यांच्या मृत्यूनंतरही सीबीआय चौकशीची मागणी करीत या प्रकरणाचे राजकीय भांडवल करणे सुरू केले आहे. परिणामी मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये आणि त्यांचा क्षोभ शांत व्हावा, यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी भाजप नेत्यांवरील दबाव वाढला. त्यामुळे अखेर मुंडे कुटुंबियांनाही सीबीआय चौकशीच्या मागणीला अनुकूलता दाखवावी लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्लीत भेट घेऊन मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.
मुंडे यांच्या निधनानंतर लगेचच संशय व्यक्त करून सीबीआय चौकशीची मागणी सुरू झाली. रिपब्लिकन नेते रामदास आठवले, शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काहीजणांनी जाणीवपूर्वक मुंडेप्रेमींच्या भावना भडकावित दगडफेक घडविली. मुंडे यांचे नातलग किंवा जवळचे म्हणवणाऱ्यांकडूनही वातावरण तापविण्याचे आणि भावना भडकाविण्याचे उद्योग झाले.  त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी करण्याखेरीज भाजप नेत्यांकडे दुसरा मार्गच नव्हता. यास विरोध करणाऱ्यांच्या हेतूंविषयी शंका उपस्थित करण्याची चाल खेळली जात असून त्याला काही नेते व पदाधिकाऱ्यांची फूस आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक सैरभैर झाले असून त्यांना व कुटुंबियांना धीर देण्याचे काम मी करीत आहे. मात्र त्यांनी मुंडे यांच्या मृत्यूचे भांडवल करणाऱ्यांच्या प्रयत्नांना बळी पडू नये, असे आवाहन पंकजा मुंडे-पालवे यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे. दिल्लीत झालेल्या अपघातात मुंडे यांना जीवघेण्या जखमा झाल्या नव्हत्या. शिवाय त्यांच्या समवेत असलेला स्वीय सहायक व वाहनचालकास दुखापत झाली नाही. त्यामुळे मुंडे यांच्या मृत्यू घातपात असण्याच्या वावडय़ा गेल्या काही दिवसांपासून उठत आहेत. त्यामुळे, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीसांनी दिल्याचा दावा सूत्रांनी केला.