कर्नाटक विधान परिषदेच्या आमदारकीसाठी एका इच्छुकाच्या समर्थकांशी पैशांच्या देवाणघेवाणीबाबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे चर्चा करीत असल्याची सीडी बाहेर आल्याने खळबळ माजली आहे. तथापि, या प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे कुमारस्वामी यांनी सोमवारी स्पष्ट केले.
कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही, हे आपण यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चौकशी झाली तरी त्याला आपली हरकत नाही, असे कुमारस्वामी यांनी वार्ताहरांना सांगितले. कोणतीही भीती न बाळगता अथवा न कचरता आपण या प्रश्नावर  यापूर्वीच सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या राजकारणाचा दर्जा काय आहे, त्याबाबत आपण भाष्य केले असून तेच त्या वादग्रस्त सीडीमध्ये आहे. कोणाला वाटल्यास त्यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करावा, आपण चर्चेला तयार आहोत, असेही ते म्हणाले.
बिजापूरमधील जदचे(धर्मनिरपेक्ष) नेते विजूगौडा पाटील हे विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असून त्यांच्या समर्थकांशी कुमारस्वामी हे पैशांच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करीत असतानाची सीडी शनिवारी बाहेर आल्याने माजी मुख्यमंत्री कोंडीत सापडले आहेत.
तुम्ही कोणालाही आमदार करा, आम्हाला (प्रत्येक पक्ष आमदाराला) एक कोटी रुपये हवेत, असे कुमारस्वामी सांगत असल्याची सीडी कन्नड दूरचित्रवाणी वाहिनीवरून प्रसारित झाली . जदचे(धर्मनिरपेक्ष) ४० आमदार असून त्यांना ४० कोटी रुपये हवे आहेत, असेही कुमारस्वामी सांगत असताना त्या सीडीमध्ये दिसत आहे.