लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेले अपयश धुवून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती प्रथमच राजकीय व्यासपीठावर उतरल्या असून विधानसभेसाठी त्यांनी माहेरापासून प्रारंभ केला आहे. लोकसभेतील पराभवानंतर खचलेल्या काँग्रेसजनांना मानसिक उभारी देण्यासाठी १० ते ५ या वेळेत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती सत्त्वशीला चव्हाण यांनी शिकवणी वर्ग घेतला. यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोजक्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे काँग्रेसजनांचा हा शिकवणी वर्ग प्रसिद्धीमाध्यमांपासून अलिप्त ठेवण्यात आला होता.
मिरजेच्या एका शैक्षणिक संकुलात रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिकवणी वर्ग आयोजित करण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करण्याबरोबरच तोंडावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींसाठी कोणती भूमिका घ्यावी, प्रचाराचे मुद्दे कोणते असावेत, प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबविली जावी याची माहिती काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली. पूर्ण वेळ श्रीमती चव्हाण या प्रत्येक कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकत होत्या. कार्यक्रमातील पूर्ण सूत्रसंयोजन स्वतच्या हाती ठेवून बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना त्याचवेळी प्रचारातील त्रुटी व सूचना याची माहिती घेत होत्या. लोकसभेतील प्रचारामध्ये ज्या उणिवा भासल्या त्याचे निराकरण कोणत्या पद्धतीने करता येईल याची माहितीही त्यांनी घेतली.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील आघाडी शासनाने केलेली विकासकामे जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे कशी मांडता येतील याची रूपरेखा करण्याबरोबरच सोशल मीडियातून होणाऱ्या प्रचारावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचून न जाता अधिक समर्थपणे विधानसभेसाठी सामोरे जावे असे आवाहनही श्रीमती चव्हाण यांनी केले.
कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेसाठी मुख्यमंत्र्यांची सासरवाडी असणाऱ्या मिरजची निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीच विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पटलावर उतरल्याने आगामी निवडणूक काँग्रेसने गांभीर्याने घेतल्याचे स्पष्टपणे जाणवले.

मुख्यमंत्र्यांचा स्वतंत्र गट
जिल्ह्यात काँग्रेस अंतर्गत अनेक गट-तट आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींनी आयोजित केलेल्या कार्यशाळेस जिल्ह्यातील पारंपरिक गटबाजीशी निगडित नसणाऱ्या कार्यकर्त्यांचीच उपस्थिती या कार्यशाळेस लाभली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा स्वतंत्र गट जिल्ह्यात कार्यरत झाला असल्याचेही मानले जात आहे. जिल्हा काँग्रेसचे कोणतेही महत्त्वाचे पदाधिकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी या बठकीस उपस्थित नव्हते. त्यांना आमंत्रित केले होते की नाही हे समजू शकले नाही.