लोकसभा निवडणुकीतील यशापयशावर चर्चा करण्यापेक्षा आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने कामाला लागण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना देणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्येच विधान परिषद सभापतीपदावरून धुमशान सुरू झाले आहे. या महत्त्वाच्या पदावर आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आमने-सामने उभे ठाकले आहेत.
केंद्रातील संभाव्य सत्तांतराच्या पाश्र्वभूमीवर विधान परिषद सभापती निवडीची काँग्रेसला घाई झाली असून त्यासाठी ८ मे रोजी विधान परिषदेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. त्यात अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी विद्यमान सभापती शिवाजीराव देशमुख यांनाच पुन्हा सभापतीपदी बसविण्यात येणार असल्याची चर्चा असतानाच प्रत्यक्षात आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जोरदार मोहीम हाती घेतल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. देशमुख यांनाच पुन्हा सभापती करावे यासाठी मुख्यमंत्री आग्रही असताना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी शरद रणपिसे यांचे नाव पुढे केले आहे. वयोमानामुळे देशमुख यांची तब्येत साथ देत नाही. अशा परिस्थितीत रणपिसे यांना सभापती केल्यास ते दलित समाजातील असल्याने विधानसभा निवडणुकीत हा समाज पक्षासोबत राहील असा दावा करीत ठाकरे आणि मोहन प्रकाश यांनी रणपिसे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड देण्याचाही त्यात हेतू आहे. मात्र याची कुणकुण लागताच मुख्यमंत्री चव्हाण यांनी रविवारी दिल्ली गाठली असून तेथेच सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याचा फैसला होईल.