लालकृष्ण अडवाणी जसे जनसंघ ते भाजपच्या जडणघडणीचे साक्षीदार आहेत, तसेच त्यांनी भारतीय सिनेसृष्टीचे गेल्या पन्नास वर्षांत बदललेले स्वरूपदेखील जवळून पाहिले आहे. हिंदी नव्हे तर इंग्रजी चित्रपटांचेदेखील अडवाणी चाहते!  पत्रकार अडवाणी कधीकाळी ऑर्गनाइझर (तेच ते! संघाचे मुखपत्र) साप्ताहिकात चित्रपट परीक्षण लिहीत असत. त्या आठवणी ताज्या झाल्याने अडवाणी काहीसे हळवे झाले. पान्चजन्य व ऑर्गनाइझर आता मॅगझिनसारखे प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी दिल्लीत जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर होते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत. भागवतांचा शब्द म्हणजे अडवाणींसाठी ‘आदेश’. या कार्यक्रमात एक ध्वनिचित्रफीत दाखवली. ऑर्गनाइझरच्या वाढीसाठी योगदान दिलेल्यांची. त्यात अडवाणींचा उल्लेख होता. ते भारावले. लागलीच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बरं हे अश्रू पुढचे तासभर आटले नाहीत. कारण ‘भागवत’ पुराण सुरू झाले. मोहन भागवत म्हणाले, परिवर्तनाला साऱ्यांनी सामोरे गेले पाहिजे. या वाक्याने अडवाणींच्या हृदयाला हात घातला.  अडवाणी हळवे झाले. भारतीय चित्रपटसृष्टी जशी बदलली तसा भाजपही बदलला! दोन्ही बदल अडवाणींना हळवे करणारे  आहेत. फक्त डोळ्यात आलेले अश्रू पुसायला अडवाणी एकटेच राहतील ! कारण बाकीच्यांनी ‘परिवर्तन’ स्वीकारले आहे.