भाजप-शिवसेनेत जागावाटपाची बोलणी प्रगतीपथावर असल्याचा उभय पक्षांचा दावा असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद सुरु झाला आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. महायुतीमधील घटकपक्षांनी शिवसेना-भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा सेनेचा आग्रह आहे. त्याला घटकपक्षांचा विरोध असून त्यांच्यासाठी २० पर्यंत जागा सोडण्यासाठी शिवसेना अनुकूल असल्याचे सूत्रांकडून समजते.
युतीमध्ये जागावाटपाचा तिढा असला तरी तो सोडविण्यासाठी उभय पक्षाच्या नेत्यांमध्ये संवाद सुरु आहे. प्रसिध्दीमाध्यमांपुढे उघडपणे बोलणी करण्याचे युतीच्या नेत्यांनी टाळले आहे. घटकपक्षांनी आपल्याला किती जागा हव्या आहेत, हे शिवसेना-भाजप नेत्यांना सांगितले आहे. स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी फडणवीस आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी चर्चा केली आहे. त्यांच्यासह रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना यांच्यासाठी २० पर्यंत जागा सोडण्यास तयारी असली तरी भाजप देईल, तेवढय़ाच जागा आपण देऊ, अशी शिवसेनेची भूमिका आहे. भाजपकडे ११७ जागा असताना सेनेइतक्या जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही. पण जागावाटपात जे मुद्दे अडलेले आहेत किंवा ज्या मतदारसंघाबाबत वाद आहे, त्यावर अमित शहा व ठाकरे यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल.
लोकसभा निवडणुकीत घटकपक्षांनी शिवसेना-भाजपचे निवडणूक चिन्ह घेतले नाही. त्यामुळे जानकर, सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला. हे टाळण्यासाठी घटकपक्षाच्या उमेदवारांनी भाजप किंवा शिवसेना यापैकी ज्या पक्षाच्या जागेवर लढत असतील, त्यांचे चिन्ह घ्यावे, असा सेनेचा आग्रह आहे. राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाकडची नोंदणी कायम रहावी, यासाठी ठराविक मते मिळण्याची किंवा उमेदवार निवडून येण्याची अट असते. आपला पक्ष टिकविण्यास घटकपक्षांचे प्राधान्य आहे.