भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात आक्रमक प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरात प्रारुपापासून देशाला देवाने वाचवावे, अशा शब्दात मोदींवर तोफ डागली. तर राहुल गांधी यांनी अमरेली येथील प्रचारसभेत मोदींचा उल्लेख खोटारडा असा केला.
गुजरातमध्ये सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना एकही आत्महत्या नसल्याचे मोदी सांगतात, अशी टीका त्यांनी केली. पंजाबमधील अकाली-भाजप सरकार अंमली पदार्थाच्या तस्करीसारख्या बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पंजाबमधील बर्नाला येथे केला. भाजप आणि अकाली आपले खिसे भरण्यात मश्गूल आहेत. आता ते प्रत्येक बेकायदेशीर कृत्यांत गुंतले आहेत. अंमली पदार्थाची तस्करी, वाळू उत्खनन असे प्रकार सर्रास होत आहेत, असा आरोपही गांधी यांनी काँग्रेसचे संगरूर मतदारसंघातील उमेदवार विजय सिंगला यांच्या प्रचारसभेत केला.
अंमली पदार्थाच्या वाढत्या प्रमाणाला पायबंद घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, राज्यातील युवक दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहेत आणि राज्य सरकारला त्याबाबत काहीही देणेघेणे नाही, या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हेही कोणतीही पावले उचलत नाहीत, हे बादल ‘गरजना जानते है, बरसना नही जानते,’  असेही गांधी म्हणाल्या. सत्तारूढ पक्षांच्या धोरणांमुळे राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे, नव्हे दिवाळखोरच बनले आहे, तीन महिने हे सरकार वेतनच देत नाही, निवृत्तांना निवृत्तीवेतन मिळत नाही, असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.