ज्योती बसू यांचा विक्रम पवन चामलिंग मोडणार?
गंगटोक : आतापर्यंत देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम पश्चिम बंगालचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि मार्क्‍सवादी नेते ज्योती बसू यांच्या नावावर होता, परंतु आता सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री पवन चामलिंग हा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच सिक्कीम राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असून या वेळीही चामलिंग यांच्या सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षाचे सरकार सत्तेत आले तर चामलिंग मुख्यमंत्री होतील आणि मुख्यमंत्रीपदी सातत्याने २५ वर्षे राहण्याचा विक्रम ते करतील. ज्योती बसू यांच्या नावावर सलग २३ वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम आहे.

काँग्रेसचे धोरण जातीय शक्तींना प्रोत्साहन देणारे आहे. जातीय शक्तींचा धोका लक्षात घेऊन डाव्या पक्षांच्या नेतृत्वात धर्मनिरपेक्ष लोकशाही शक्ती हाच पर्याय आहे. भाजपला अजूनही आपला जाहीरनामा घोषित करता आलेला नाही.
सीताराम येचुरी, माकप नेते 
‘तृणमूलच्या पाठिंब्याची भाजपला गरज नाही’ 
कोलकाता : लोकसभा निवडणूक निकालानंतर आम्हाला कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची गरज लागणार नाही. सध्याचे वातावरण भाजपसाठी अनुकूल असल्याने २५० जागा आम्हाला मिळतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेसला भाजपपासून धोका असल्याचे वाटत असल्याने पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पक्षावर टीका करीत असल्याचे नायडू यांनी सांगितले. तर काँग्रेसचा पराभव निश्चित असून आतापर्यंतचा त्यांचा सर्वात दारुण पराभव होणार आहे. काँग्रेस तीन आकडी संख्याही गाठू शकणार नाही, असा दावा नायडू यांनी केला आहे.
बनावट मतदान यंत्रे जप्त
फुलबनी (ओडिशा) : कंटमाळ विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ बिजु जनता दलाचे चिन्ह असलेली  ५० बनावट मतदान यंत्रे जप्त करण्यात आली. भरारी पथकाने ही कारवाई केली. एका वाहनातून ही मतदान यंत्रे जप्त करण्यात आली. एका अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. कंटमाळ विधानसभा मतदारसंघात १० एप्रिलला मतदान होणार आहे.
१,०६७ नव्या पक्षांची नोंदणी
नवी दिल्ली  : सार्वत्रिक निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर मुख्य पक्षांव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेक छोटय़ा छोटय़ा पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली असून देशभरातील ही संख्या तब्बल एक हजार ६२७ इतकी आहे. दहा मार्चपर्यंत एक हजार ५९३ नवे पक्ष, तर ११ ते २१ मार्चदरम्यान आणखी २४ पक्ष संघटनांनी नोंदणी केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.