जसवंत यांच्या पुत्रावर बडतर्फीची कुऱ्हाड
जयपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांचे चिरंजीव आणि भाजपचे राजस्थानातील आमदार मानवेंद्र सिंह यांनी पक्षत्याग करावा अन्यथा  बडतर्फीच्या कारवाईस सामोरे जावे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या निषेधार्थ सिंह यांच्यावर ही कारवाई केली जाईल, अशी तंबी त्यांना देण्यात आली आहे. मानवेंद्र सध्या भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात प्रचार करीत आहेत.
विमान मंत्रालयाला आदेश
जम्मू : नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी देण्यात जाणीवपूर्वक विलंब लावला, या भाजपच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयास सर्व तपशील मांडण्याचा आदेश दिला आहे.
‘तक्रार आल्यास दखल’
जम्मू : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद बुखारी यांची भेट घेतल्याप्रकरणी कोणी तक्रार दाखल केल्यास त्याची तात्काळ दखल घेऊ, असे गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही़ एस़  संपत यांनी सांगितल़े  अशा प्रकरणांमध्ये आम्ही सामान्यत: तक्रार आल्यानंतरच कारवाई करतो़  त्यामुळे आम्ही तक्रारीची वाट पाहू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केल़े सोनिया यांनी १ एप्रिल रोजी इमामाची भेट घेऊन मुस्लीम मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन मुस्लीम नेत्यांना केले होत़े  त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचे सांगत या प्रकरणी आयोगाने स्वत:हून कारवाई करण्याची मागणी भाजपकडून बुधवारी करण्यात आली होती़