दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे अनेक वेळा म्हटले जाते. ८० खासदार पाठवणाऱ्या या राज्यात या वेळी चौरंगी सामना अपेक्षित आहे. राज्यातील सत्तारूढ सपा आणि प्रमुख विरोधक असलेल्या बसपाला दिल्लीतील समीकरणांच्या दृष्टीने मोठे संख्याबळ हवे आहे. तर भाजपला केंद्रातील सत्तेसाठी हे राज्य महत्त्वाचे आहे.
दिल्ली आणि आग्रा यांच्यात तसे फार काही अंतर नाही. मात्र, भौगोलिकदृष्टय़ा आग्रा उत्तर प्रदेशात तर दिल्ली स्वतंत्र राज्य. मुघलांच्या काळात आग्रा खरे तर देशाची राजधानी. परंतु काळाच्या ओघात हा केंद्रिबदू दिल्लीकडे सरकला. मात्र, अजूनही दिल्लीच्या तख्तावर उत्तर प्रदेशचा पगडा असतोच. त्यामुळेच देशाच्या पंतप्रधानपदी कोणाला बसवायचे याचे हुकमाचे पत्ते उत्तर प्रदेशच्या मतदारांकडे असतात.
तब्बल ८० खासदार निवडून देणाऱ्या या सर्वात मोठय़ा राज्यात यंदा फारशी वेगळी परिस्थिती नाही. मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशनेच भाजपला सर्वात धोका दिला होता. तर काँग्रेसला अनपेक्षितपणे हात दिला होता. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदींचा राज्याभिषेक करायचा असेल तर भाजपला उत्तर प्रदेशातून अधिकाधिक खासदार निवडून आणणे क्रमप्राप्त आहे. आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे यंदा ही लढत पंचरंगी असेल. मुझफ्फरनगरमधील जातीय दंगलींमुळे उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षाची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. दुरावलेल्या मुस्लीम मतदारांना जवळ ओढण्यासाठीच भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी अलीकडेच, भाजप भूतकाळात झालेल्या चुकांची माफी मागण्यास तयार असल्याचे सूचक विधान केले. आम आदमी पक्षाच्या राजकारण प्रवेशामुळे निवडणुकीचे निकाल फिरण्याची शक्यता आहे. एकंदरच लोकसभा निकालांवर प्रभाव पाडणाऱ्या उत्तर प्रदेशात नेहमीपेक्षा यंदा राजकीय लठ्ठालठ्ठी जास्त असेल.  
भाजपचा छुपा अजेंडा?
वाराणसीतल्या जागेवरून भाजपमध्ये सध्या लठ्ठालठ्ठी सुरू आहे. नरेंद्र मोदींसाठी हा मतदारसंघ मुरली मनोहर जोशी यांनी सोडावा, असा राजनाथसिंह यांचा आग्रह आहे.  शेवटच्या क्षणी जोशी राजी झालेच तर मोदी वाराणसीतून आणि राजनाथ लखनऊमधून लढतील. नाहीच तर लखनऊची जागा मोदींसाठी मोकळी सोडली जाईल. निकालांनंतर भाजपच्या आकडय़ांचा वारू १९० ते २२०च्या अलीकडे-पलीकडे अडला आणि इतरांची साथ घ्यावी लागलीच व ‘मोदी पंतप्रधानपदी नको’ असा त्यांचा आग्रह असला तर ऐनवेळी राजनाथ यांचे नाव पुढे करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. त्यामुळेच मुस्लीम समाजाची माफी मागण्याची तयारी असल्याचे राजनाथ यांनी केलेले विधान महत्त्वाचे ठरते.
लक्षणीय लढती
*आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरिवद केजरीवाल यांचे कार्यक्षेत्र दिल्ली असले तरी ते आहेत मूळचे गाझियाबादचे. आपच्या प्रभावामुळे गाझियाबादेतून राजनाथसिंह माघार घेतील अशी शक्यता आहे.
*अरिवद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी जेथून उभे राहतील त्या ठिकाणी उमेदवारी घोषित करण्याचे जाहीर केले आहे.
*राहुल यांच्या अमेठी मतदारसंघातून आपच्या कुमार विश्वास यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या लढतीत राहुल यांचे पारडे जड असले तरी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार विरुद्ध कुमार विश्वास अशी ही रंगतादार लढत असेल.