कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याविरोधात ठोस कारवाई करण्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री मीडियाला केवळ निवेदने देत आहेत, अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली आहे. मात्र काँग्रेसने या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.
दाऊद इब्राहिम याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्यासाठी प्रसिद्धिपत्रक प्रसृत करण्याची गरज आहे का, असा सवाल मोदी यांनी एका गुजराती दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केला. दाऊदला पाकिस्तानातून आणले जाईल, असे शिंदे यांनी निवेदन केले आहे त्याबाबत विचारले असता मोदी यांनी, अशा प्रकारच्या गोष्टी मीडियाद्वारे साध्य केल्या जातात का, असा सवाल केला. अशा प्रकारच्या गोष्टी वर्तमानपत्रांतून जाहीर केल्या जातात का, अमेरिकेने बिन लादेनशी चर्चा केली होती का, लादेनचा खातमा कसा करणार ते जाहीर करण्यासाठी अमेरिकेने पत्रकार परिषद घेतली होती का, असा सवालही मोदी यांनी केला. सरकारने काय केले, सरकारकडे परिपक्वताही नाही, गृहमंत्री अशा प्रकारची वक्तव्ये करतो ही शरमेची बाब आहे, असेही ते म्हणाले.