‘शहजादे’ राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांना एकाच दिवशी, एकाच मतदारसंघात प्रचार करताना पाहता यावे, त्यांचे ‘प्रचारयुद्ध’ अनुभवता यावे अशी अनेकांची इच्छा होती, ती आज आसामात पूर्ण झाली आहे. आता दोघांनाही मिळालेल्या प्रतिसादावरून लोकांनीच काय तो निष्कर्ष काढावा, असे ‘मिश्कील’ उद्गार नरेंद्र मोदी यांनी आसामात काढले.
येथील एका प्रचारसभेत बोलताना मोदी यांनी या ‘मुकाबल्या’ची आठवण करून दिली. प्रसारमाध्यमांकडून गेले दोन महिने ‘मोदीजी आणि राहुलजी यांच्यातील थेट द्वंद्व अनुभवता यावे’ अशी मागणी होत होती. आज नौगाँग येथे ती पूर्ण झाली. आता प्रसारमाध्यमांनी निष्पक्षपणे ही संधी साधावी आणि जनतेची नस नेमके काय दर्शवीत आहे, हे ओळखावे, अशी कोपरखळी त्यांनी मारली.
या सभेत मोदी विनोद करण्याच्या मूडमध्ये होते. ‘राहुल आणि सोनिया दोघांचीही भाषणे तुम्ही ऐका.. तुम्हाला त्यात तोच तोचपणा जाणवेल. मला जाणीव आहे, त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. पण गरज असेल तर त्यांनी आम्हाला विचारावे. आम्ही त्यांना भाषणे लिहून देऊ,’ असा टोमणा त्यांनी मारला.
मर जवान, मर किसान
कोणे एके काळी लालबहादूर शास्त्री यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषविताना ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला होता. मात्र आता त्याच काँग्रेसच्या राजवटीत परिस्थिती उलटली असून ‘मर जवान, मर किसान’ असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी झोंबरी टीका मोदींनी केली.