आघाडीत निम्म्या जागांचा धरलेला आग्रह काँग्रेस मान्य करणार नाही हे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीने गत वेळच्या तुलनेत १० ते १५ जागा जास्त मिळाव्यात, अशी व्यूहरचना केली आहे. मात्र, निवडून येण्याची हमी असलेल्या चांगल्या जागा पदरात पाडून घेण्यावर राष्ट्रवादीचा भर राहणार आहे.
आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी रात्री राज्यातील निवडक नेत्यांबरोबर जागावाटपाबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी १४४ जागांचा आग्रह धरला असला तरी काँग्रेसने एवढय़ा जागा देण्याबाबत ठाम नकार दिला आहे. यामुळेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने कोणत्या आणि किती जागा सोडवून घ्यायच्या याचा आढावा घेतला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४ तर राष्ट्रवादीने ११४ जागा लढविल्या होत्या. लोकसभा निकालाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी लावून धरली आहे. १३० जागांची मागणी लावून धरण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. काँग्रेसची मात्र गतवेळच्या तुलनेत आठ ते दहा जागा जास्त देण्याची तयारी असल्याचे समजते. २००४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १६४ तर राष्ट्रवादीने १२४ जागा लढविल्या होत्या. हेच सूत्र कायम राहावे, असा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. मात्र १२५ पेक्षा कमी जागा स्वीकारणार नाही, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
काँग्रेसपुढे पेच
राष्ट्रवादी गत वेळच्या तुलनेत जास्त जागा सोडवून घेणार हे स्पष्ट असल्याने कोणत्या जागा सोडता येतील याचा पेच काँग्रेस नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे. गेल्या वेळी मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार जागांचे वाटप झाले होते. तेव्हाच राष्ट्रवादीने जास्त जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर कोणत्या जागा सोडायच्या याचा राष्ट्रवादीपुढे पेच निर्माण झाला आहे. मुंबई आणि विदर्भात राष्ट्रवादीची ताकदच मुळी मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्रात आधीच राष्ट्रवादीच्या ताब्यात जास्त जागा आहेत. ठाण्यासह कोकण आणि मराठवाडय़ात जास्त जागा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहील, अशी चिन्हे आहेत.