१६ व्या लोकसभेसाठी बुधवारी ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि मणिपूर या चार राज्यांत मतदान घेण्यात आल़े  मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती़  त्यामुळे मतदानाची टक्केवारी लक्षणीय दिसून आली़  अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही मतदान घेण्यात आल़े
अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६० पैकी ४९ आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी ५५ टक्के मतदान झाले, तर मेघालयमधील लोकसभेच्या दोन जागांसाठी ७१ टक्के, नागालँडमध्ये एका जागेसाठी ८१.४७ आणि मणिपूरमध्ये एका जागेसाठी ८० टक्के मतदान झाल़े इतर राज्यांत मतदान शांततेत पार पडले; परंतु अरुणाचल प्रदेशातील कोंसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचे अज्ञात अतिरेक्यांनी अपहरण केले होत़े  मात्र त्यांना काही वेळाने सुखरूप सोडून देण्यात आल़े  तसेच नागालँडमधील आसाम सीमेलगतच्या वादग्रस्त लाँगलेग जिल्ह्यामध्ये मतदान घेण्यातच आले नाही़   सीआरपीएफ जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक अधिकाऱ्यांना येथील मतदान केंद्रावर जाऊ दिले नाही़ मेघालयमध्ये खासी जैंतीया या पर्वतीय भागात फुटीरतावादी गटाने पुकारलेल्या  बंदला न जुमानता  मतदान केले, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पी़  नाईक यांनी सांगितल़े

अकरा राज्यांमध्ये आज मतदान
देशातील ११ राज्यांमधील तसेच ३ केंद्रशासित प्रदेशांमधील मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात ८० पैकी १० जागांवर, दिल्लीतील सातही मतदारसंघांमध्ये, बिहारमधील ४० जागांपैकी ६ जागांवर आणि केरळ, मध्य प्रदेशातील ९ जागांवर, हरयाणातील सर्वच्या सर्व म्हणजे १० जागांवर, ओदिशातही १० जागांवर गुरुवारी मतदान होईल.देशभरात लोकसभेसाठी मतदान होत असतानाच अरुणाचल प्रदेशाप्रमाणे ओदिशातही विधानसभेच्या ७० जागांपैकी ५० जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे.