उघडय़ा जीपवरील लोकसभेचा उमेदवार सुहास्य वदनाने लोकांना हात दाखवत चालला होता. पाठीमागे गर्दीतून घोषणा सुरु होत्या.. लक्ष्मीबाईनेही एक जोरदार घोषणा दिली, ‘धनुष्यबाणावर शिक्का मारा!’.. आणि शेजारून चालणाऱ्या गॉगलधारी तरुणाने तिला हटकले. ‘अग लक्ष्म्ये राडा व्हईल ना.. व्होट फॉर ‘पंजा’ बोल’.. ‘आवं, पण सकाळी तर तुमी धनुषबाण म्हनला व्हता ना?’.. चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव आणून तिने विचारले खरे.. आणि एक सणसणीत शिवी हासडून ‘जास्त शानपना करू नगं, सांगितल तेवढंच बोंबल’ असा सज्जड दम मिळाला.. सकाळची पार्टी दुसरी होती, आताची पंजावाल्यांची हाय, असे त्याने समजावून सांगितले.. लक्ष्मी आणि तिच्या बरोबरच्यांना ‘कोणती पार्टी’ याच्याशी काहीही घेणदेणे नव्हते.. त्यांचे ‘लक्ष्य’ केवळ त्यांना मिळणाऱ्या तीनशे रुपयांवर होते. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील झोपडपट्टय़ांमधून स्वयंघोषित कार्यकर्ते तसेच पक्षाचे कार्यकर्ते प्रचरासाठी गर्दी दिसावी म्हणून भाडय़ाने माणसे आणण्याचे काम इमाने इतबारे करत आहेत. निवडणुका आल्या की त्यांचे सुगीचे दिवस सुरु होतात. उन्हाळ्यात मुंबईमध्ये दिवसरात्र राबणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांकडे असले तरी गर्दीचे गणित दाखविण्यासाठी झोपडपट्टय़ांमधून माणसे गोळा केली जातात.
मानखुर्दची ‘अण्णाभाऊ साठेनगर’ ही पंचवीस हजार लोकवस्तीची झोपडपट्टी.. येथील बहुतेकजण अलीकडे वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये सहकुटुंब फिरण्याचे काम करून रोजगार मिळवतात. पन्नाशीची अक्का आपल्या मुलांसह उत्साहाने प्रचारात सहभागी होते. तिच्या म्हणण्यानुसार गेल्या निवडणुकीत दिवसाचे दोनशे रुपये खाऊन पिऊन मिळायचे.. यंदा सकाळच्या प्रचाराचे तीनशे रुपये आणि जेवण असा दर आहे. दीपक नावाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पक्षाला माणसांची गरज आहे. झोपडपट्टीतील मतांवर साऱ्यांचाच डोळा आहे. एरवी आम्हाला कोण विचारतो. त्यामुळे आता आम्ही वसुली करणार. दीपककडे पन्नास महिलांची फौज आहे. थोडय़ा दिवसांनी दर वाढतील, असा त्याला विश्वास आहे. रोजचे सातशे ते आठशे रुपये ‘त्यांना’ द्यावेच लागतील, असे त्याचे म्हणणे आहे.
चेंबूर, गोवंडी, धारावी, अणुशक्तीनगर, मानखुर्दपासून मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये, जोगेश्वरी कांदिवली पूर्व येथील दामुपाडे येथे वेगवेगळ्या पक्षांचे स्वयंघोषित कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांना प्रचारयात्रांपासून वेगवेगळ्या कामांसाठी कार्यकर्ते पुरविण्याचे काम करतात. निवडणुकीच्या निमित्ताने आमची ‘अन्न सुरक्षा’ चोख झाल्याचे भाडय़ाने कार्यकर्ते देणाऱ्या लक्ष्मणने सहज सांगितले.
कामात दांडी!
भांडी-धुणी करणाऱ्या रखमाबाईला महिन्याला एका कामाचे नऊशे रुपये मिळतात. प्रचारात रोजचे जेऊन-खाऊन तीनशे रुपये मिळत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी सध्या दांडय़ा होत असल्याचे तिने सहज सांगितले. ‘ह्य़े काम सोपं हाय, झेंडा घेऊन जीपच्या मागे मागे फिरायचे, दुसरं काय’, हा तिचा सवाल आपल्या ‘प्रगल्भ लोकशाही’ची कल्पना देणारा आहे.