काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे शुक्रवारी भाजपने स्पष्ट केले.
राहुल गांधी यांच्या विरोधात अभिनेत्री स्मृती इराणी, तर सोनिया गांधी यांच्याविरोधात भाजपच्या नेत्या उमा भारती यांना निवडणुकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्या पाश्र्वभूमीवर भाजपने वरील स्पष्टीकरण दिले आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबीयांचे  बालेकिल्ले आहेत. या मतदारसंघातून इराणी आणि भारती यांना उमेदवारी देणार का, या प्रश्नावर भाजपने मौन पाळले आहे. या बाबत अनेक प्रकारच्या सूचना आल्या आहेत, असे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले.भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीत तुल्यबळ उमेदवार देण्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.