उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेसवासी झालेले माजी आमदार सुभाष बने यांनी गुरुवारी अपेक्षेनुसार काँग्रेसला राम राम ठोकला आहे.
पक्षाकडून न्याय न मिळाल्याचे कारण देत बने यांनी हा निर्णय जाहीर केला असून लवकरच ते शिवसेनेत परततील, असा अंदाज आहे. २००५ मध्ये राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसचा रस्ता धरला. त्यांच्याबरोबर कोकणातून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये तत्कालीन आमदार बने (संगमेश्वर) आणि गणपत कदम (राजापूर) यांचा समावेश होता. शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत हे दोन्ही नेते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. पण त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत संगमेश्वर मतदारसंघ फेररचनेत विभागला गेला, तर राजापूर मतदारसंघातून कदम पराभूत झाले.  हे दोन्ही नेते सेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने यापूर्वीच दिले होते. बने यांच्या राजीनामापत्राने त्याला दुजोरा मिळाला आहे.
चिपळूणमधून चव्हाणच उमेदवार
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून  शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या मतदारसंघातून जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडीक हेही इच्छुक होते.केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी मुंबईतील मेळाव्यात चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे जाहीर केले.