News Flash

विविध राजकीय पक्षांच्या आसऱ्याने शेतकरी संघटनेचे नेते निवडणूक रिंगणात

कधी काळी सत्ताधाऱ्यांचा कर्दनकाळ आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून पुढे आलेल्या शेतकरी संघटनेचे नेते विविध राजकीय पक्षांचा आसरा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

| March 7, 2014 12:25 pm

विविध राजकीय पक्षांच्या आसऱ्याने शेतकरी संघटनेचे नेते निवडणूक रिंगणात

कधी काळी सत्ताधाऱ्यांचा कर्दनकाळ आणि शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून पुढे आलेल्या शेतकरी संघटनेचे नेते विविध राजकीय पक्षांचा आसरा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचा उदय झाला तेव्हा विदर्भात ही संघटना खऱ्या अर्थाने भरभराटीस आली होती. केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरलेले निष्ठावान हजारो कार्यकर्ते हे शेतकरी संघटनेचे प्रमुख भांडवल होते. छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला आणि तोंडी ‘भीक नको हवे घामाचे दाम’ ही घोषणा देत कार्यकर्ते आंदोलन करीत, तेव्हा लाखो शेतकरी त्यात सहभागी होत असत. सत्ताधारी पक्षावर या संघटनेने दबाव निर्माण केला होता. त्याचा फटका सत्ताधारी पक्षाच्या अनेक दिग्गजांना त्याकाळी झालेल्या निवडणुकीच्या वेळी बसला होता. शेतकरी संघटनेचे नेते  शरद जोशी यांच्या जाहीरसभेला लाखो लोक गोळा व्हायचे. शेतकऱ्यांचे ‘पंचप्राण’ असा त्यांचा उल्लेख कार्यकर्ते करीत असत. राजकारणात प्रवेश न करताही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणूक लढविणाऱ्यांना पाठिंबा देण्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली तेव्हा पहिल्याच प्रयत्नात वसंत बोंडे, शरद काळे, मोरेश्वर टेमुर्डे, सरोज काशीकर, वामनराव चटप यांनी विधानसभेत प्रवेश केला.
सत्ताप्राप्तीशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून संघटनेच्याच नेतृत्वाखालील स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना झाली. जाहीर सभेत बोलणाऱ्या शरद जोशींनी स्वपक्षाच्या उमेदवारासाठी मते मागायला सुरुवात केली आणि तेव्हाच सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विश्वास त्यांच्यावरून उडाला. जीवाला जीव देणारे सहकारी एक एक करता दूर होत गेले आणि शेतकरी संघटनेची घसरण सुरू झाली. मधल्या काळात विदर्भाच्या प्रशानावरून शेतकरी संघटनेचे नेते पुन्हा एकत्र झाले होते. विदर्भातील शेतक ऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेतकरी संघटनेने अनेक आंदोलन करून केली.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पुन्हा शेतकरी संघटनेचे नेते राजकारणात सक्रिय झाले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाने शेतकरी संघटनेच्या नेत्यांना उमेदवारी दिली असून त्यात वामनराव चटप यांना चंद्रपूरमधून तर वध्र्यातून संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांच्या नावांची चर्चा असून त्यांची उमेदवारी लवकर घोषित होण्याची शक्यता आहे. या शिवाय राजू शेट्टी यांनी हातकणगले तर माढा मतदार संघातून सदाभाऊ खोत यांची महायुतीकडून उमेदवारी घोषित झाली आहे. संघटनेचे काही नेते भाजप आणि आम आदमी पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. विदर्भात शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १२ जागा लढविल्या होत्या, राजुरा वगळता इतर ठिकाणी पक्षाला मिळालेली मते संघटनेची शक्ती किती कमी झाली याचा प्रत्यय देणारी होती. अलीकडच्या काळात शेतमालाच्या भावात झालेली वाढ याचे श्रेय सरकार घेत असले तरी त्यासाठी दबाव आणि जागृती निर्माण करण्याचे काम शेतकरी संघटनेने केले आहे, म्हणूनच या संघटनेची गरज आजच्या काळातही नितांत आहे, मात्र निवडणुकीच्या राजकारणात या संघटनेचे अस्तित्व कमी झाले तर शेतकऱ्यांनी जावे कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
 या संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले यांनी सांगितले,  शेतकरी संघटनेची ताकद कुठेच कमी झालेली नाही. शेतकरी संघटना ही वैचारिक संघटना असून वेळप्रसंगी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभेचा आसरा घेणे आवश्यक झाले आहे. केवळ आंदोलनाने प्रश्न सुटत नाही तर राजकीय पाठबळ त्यासाठी आवश्यक असल्याने संघटनेचे नेते राजकारणात प्रवेश करीत आहे. त्यामुळे संघटनेचे अस्तित्व कमी होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2014 12:25 pm

Web Title: shetkari sanghatana leaders set to fight lok sabha election 2
Next Stories
1 पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्यांकडे उमेदवारांचे खास लक्ष
2 काँग्रेसच्या प्रचारसभेचा भिवंडीत ‘जत्रोत्सव’
3 ‘इंजिना’ला जनसुराज्य, शेकापचा डबा?
Just Now!
X