काँग्रेस धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाशी बांधील आहे, याबाबत जनतेच्या मनात असलेला विश्वास किंचित ढळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी यांनी दिली आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील विश्वास पुन्हा संपादन करून पुढे जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मतही अ‍ॅण्टनी यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत सी. के. गोविंदन नायर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा अ‍ॅण्टनी यांनी वरील कबुली दिली. जनतेच्या मनातील विश्वास ढळला असून त्याबाबत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जनतेच्या मनात पुन्हा विश्वास संपादन करून पुढे जाणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
धर्मनिरपेक्षतेचे पालन करताना काही चुका घडल्या आणि त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांना समान न्याय मिळाला नाही, अशी जनतेची धारणा झाली आहे आणि ती दूर केलीच पाहिजे. जातीयवादी शक्तींचा प्रभाव वाढत असून केरळमध्येही निराळी स्थिती नाही, अशी चिंताही अ‍ॅण्टनी यांनी व्यक्त केली.