उत्तर प्रदेश विधानसभेत राष्ट्रीय लोकदलाच्या दोन आमदारांनी शर्ट काढण्याच्या घटनेची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे. याबाबत सदनाच्या शिस्तपालन समितीला अहवाल देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष माताप्रसाद पांडे यांनी दिले आहेत. या अहवालाच्या आधारे गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर कारवाई केली जाणार आहे.याबाबत अपना दल सदस्या अनुप्रिया पटेल यांनी अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीत ही घटना लाजिरवाणी असून, महिलांच्या प्रती असंवेदनशीलता दाखवणारी असल्याचे नमूद केले आहे. बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावेळी बसप आणि राष्ट्रीय लोकदलाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली होती. या वेळी लोकदलाच्या सुदेश कुमार आणि वीरपाल यांनी शर्ट काढले होते. या घटनेने सदनाची प्रतिष्ठा मलीन झाल्याचे पटेल यांनी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. संसदीय कामकाजमंत्री आझम खान यांच्यावरही पटेल यांनी टीका केली आहे.