सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घ्यावी, अशी सूचना भाजपने आपल्या खासदारांना केली आहे. देशवासीयांकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन संघाचे नेते सुरेश सोनी यांनी केले.
भाजपने पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांसाठी वर्गाचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने सोशल मीडियावर चर्चा झाली. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि पीयूष गोयल यांनी मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करा, त्याचा परिणाम होतो, असे गोयल यांनी सांगितले. मात्र ते वापरताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेक खासदारांनी याबाबत पक्षानेच मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली.
आपले मतभेद माध्यमांतून बाहेर येऊ देऊ नका, अशी सूचना माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. समाजात जे प्रश्न आहेत त्याबाबत सजग राहा, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाची जी विचारसरणी आहे त्याबाबत तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे बौद्धिक संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश सोनी यांनी घेतले. या शिबिराला दीडशे खासदार उपस्थित आहेत.