नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात २००९ च्या निवडणुकीशी तुलना करता तब्बल ९.७५ टक्यांनी मतदान वाढल्याचे समोर आले आहे. यंदा राज्यात सरासरी ६०.४२ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी भरघोस मतदान केले असले तरी शहरी भागातील मतदानाची टक्केवारी अजूनही पन्नाशीतच अडकली आहे. परिणामी ७३.५ टक्के मतदान झालेला हातकणंगले मतदार संघ राज्यात अव्वल ठरला असून कल्याणध्ये सर्वात कमी ४३.०६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
राज्यात मतदानाची घसरती टक्केवारी ही राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोगासाठीही चिंतेची बाब झाली होती. यावेळी ही टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात मतदार जागृती केली होती. राजकीय पक्षांनीही मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे राज्यात बुलढाण्याचा अपवाद वगळता सर्व ४७ लोकसभा मतदार संघातील मतदानात भरीव वाढ झाली आहे. सन २००९ मध्ये बुलढाण्यामध्ये ५१.६४ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदान वाढण्याऐवजी त्यात ०.३४ टक्यांची घट झाली आहे. धुळे मतदारसंघात सर्वाधिक १६.५ टक्यांनी मतदानात वाढ होऊन यंदा ५८.५२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल दिंडोरीत १५.९६ टक्यांची तर जळगावमध्ये १५.८२ आणि मावळमध्ये १५.५२ टक्क्यांनी मतदान वाढले.
निवडणूक प्रक्रिया आणि उमेदवारांबाबत फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटरच्या माध्यमातून चर्चेची गुऱ्हाळे रंगवणारे शहरी मतदार प्रत्यक्ष मतदानासाठी घराबाहेर पडण्यास कुचराई करतात. या उलट प्रचारादरम्यानची आश्वासने आणि उमेदवारांची फारशी माहिती नसतानाही मतदारांनी मात्र आपले कर्तव्य चोख बजावल्याचे ग्रामीण भागातील मतदानाच्या टक्केवारीवरून स्पष्ट होते. हालकणंगले लोकसभा मतदारसंघात राज्यात विक्रमी असे ७३.५ तर भंडारा-गोंदियामध्ये ७२.२१ आणि कोल्हापूरमध्ये ७२.०५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र गोंदियातील मतदानाची वाढ ही केवळ सव्वा टक्यांची आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात यावेळी ८.७४ टक्यांनी वाढ होऊनही राज्यात सर्वात कमी ४३.०६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अशाचप्रकारे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात १० टक्यांनी वाढ होऊनही केवळ ४९.३७ टक्के मतदान झाले आहे.
७३.५ टक्के मतदान झालेला हातकणंगले मतदार संघ राज्यात अव्वल ठरला असून कल्याणध्ये सर्वात कमी ४३.०६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.