पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सावत्र भावाने भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्याच्या मुद्दय़ाचे भाजपकडून एवढे भांडवल केले जात आहे. पण भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची आणि भाजपच्या माजी खासदार करुणा शुक्ला यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल कोणीही वाच्यता का करत नाही, असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी केला.
करुणा शुक्ला यांनी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आपल्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला होता. पंतप्रधानांच्या सावत्र भावाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा समाचार चिदम्बरम् यांनी घेतला. रामदेव बाबा यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे दलितांचा उपमर्द झाल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. गुजरात हे राज्य वार्षिक वृद्धीदराच्या निकषावर देशात पाचव्या क्रमांकावर आहे, तर देशातील उत्तम विद्युत सुविधा असलेल्या राज्यांच्या यादीत गुजरात नवव्या क्रमांकावर आहे. तेव्हा या राज्याने विकासाच्या गमजा मारू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.