वाराणसी लोकसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यावरून जद(यू)मधील मतभेदांची दरी रुंदावली आहे. केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी संघटनेत त्या प्रश्नावर चर्चा व्हावयास हवी, असे मत बिहारचे पक्षप्रमुख वसिष्ठ नारायण सिंग यांनी व्यक्त केले आहे. जद(यू)चे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी याबाबत केलेल्या घोषणेपासून दूर राहण्याचा सिंग यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. या बाबत आपण पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्याशी चर्चा केली आहे, मात्र त्यांना या निर्णयाची कल्पनाच नाही असे वाटते, असेही वसिष्ठ नारायण सिंग म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दोन टप्प्यांत पक्षाचे सर्व नेते प्रचारात गुंतलेले असून अद्याप कोणीही वाराणसीत जाण्याची योजना आखलेली नाही, असेही वसिष्ठ नारायण सिंग म्हणाले.