गतवेळी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला वारसदार म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिव खोत यांचे आव्हान आहे. आघाडीतील गटबाजी व संशयाचे वातावरण आणि मोहिते-पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची बंडखोरी पाहता ही जागा राखणे राष्ट्रवादीसाठी विशेषत: शरद पवारांसाठी प्रतिष्ठेचे ठरले आहे. महायुतीतही राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांची बंडखोरी डोकेदुखीची ठरली आहे.
माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्य़ातील माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला तर सातारा जिल्ह्य़ातील माण व फलटण अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २००९ साली शेवटच्या क्षणी शरद पवारांनी स्वत:ची उमेदवारी आणली आणि तीन लाख १४ हजारांच्या मताधिक्याने निवडणूकजिंकली होती. पवार असताना जिल्ह्य़ात पक्ष मोठा होण्याऐवजी त्यात विस्कळीतपणाच आला. याच जिल्ह्य़ावर वर्षांनुवर्षे वर्चस्व ठेवणारे मोहिते-पाटील यांची ताकद कमी होऊन मोहिते-पाटील विरोधक अजित पवारनिष्ठांना महत्त्व आले. मोहिते-पाटील यांच्या घरात ‘कलह’ निर्माण होऊन त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे, तर माण व फलटण भागातील काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी या संघर्षांने माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह निंबाळकर यांची अपक्ष उमेदवारी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी जबाबदारी घेऊन निंबाळकरांसह माणचे आमदार जयकुमार गोरे यांना ‘शांत’ केल्याचे दिसत असले तरी अंतस्थ ही मंडळी ‘अशांत टापू’तील समजली जातात. माढा मतदारसंघात मतदारांची संख्या १६ लाख ९२ हजार आहे. यात सर्वाधिक पाच लाख ९५ हजार मतदारसंख्या असलेल्या माण-फलटणमधील मते निर्णायक समजली जातात.
 आघाडीतील गटबाजी व प्रतापसिंह मोहिते-पाटलांची बंडखोरी खोत यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविली जाते. मागील दोन वर्षे माढा भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभे केलेल्या आंदोलनाच्या आधारे खोत हे जनाधार मिळवू पाहतात. माढय़ावर डोळा ठेवून उमेदवारी मागितलेले राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांनी शेवटच्या क्षणी माढाऐवजी बारामतीत पाठविण्यात आल्याने महायुतीवर जानकर यांचा प्रभाव असलेला धनगर समाज नाराज आहे. या मतदारसंघात दुष्काळी भाग अधिक आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी पाठपुरावा चालविला आहे. शेती, पाणी, उद्योग, तसेच कुर्डूवाडीतील रेल्वे वर्कशॉप आदी प्रश्न महत्त्वाचे आहेत.

मागील ४० वर्षांची सेवा, त्यातून मिळविलेला जनतेचा विश्वास आणि शरद पवार यांचे मार्गदर्शन व पाठबळ या जोरावर निवडणूक मैदानात उतरलो असून यात निश्चितपणे यशस्वी होईन, असा विश्वास वाटतो.
विजयसिंह मोहिते-पाटील (राष्ट्रवादी)

माढा भागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना घामाचे जास्त चार पैसे मिळवून देताना केलेल्या संघर्षांमुळे जनमानसात विश्वास संपादन केला. हा संघर्ष रस्त्यावर व संसदेत करायचा आहे. शेतीबरोबर पाणी, उद्योगधंदे, बेरोजगारांना व्यवसाय, कुर्डूवाडीत बंद पडलेला रेल्वे वर्कशॉप सुरू करण्यासाठी आपली साखरसम्राट तथा धनदांडग्यांविरुद्धची ही लढाई आहे.
-सदाशिव खोत (स्वाभिमानी पक्ष)