वाराणसीतून मंगळवारी उमेदवारी घोषित करणाऱ्या आपच्या अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर गुजरात सरकारने त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. केजरीवाल हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी चुकीचे आरोप करीत आहेत. मात्र देशात मोदींची वाढती लोकप्रियता रोखण्यात त्यांना यश येणार नाही, असेही सरकारने बुधवारी स्पष्ट केले.
केजरीवाल नेहमीप्रमाणे लोकांची दिशाभूल करीत आहेत. मोदींवर टीका करून त्यांना काही प्रमाणात प्रसिद्धी मिळेल, मात्र ते यशस्वी होणार नाहीत. जनताच त्यांना योग्य ते उत्तर देईल,असे गुजरात सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे.  जेव्हा केजरीवाल गुजरातमध्ये आले होते, तेव्हा राज्यात गेल्या दहा वर्षांत ८०० शेतकरी मरण पावल्याचा आरोप केला होता. आता वाराणसीमध्ये बोलताना गुजरातमध्ये पाच हजार ५७४ शेतकऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप केला. म्हणजेच केवळ प्रसिद्धीसाठी केजरीवाल आरोप करतात असा गुजरात सरकारचा आरोप आहे.