यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी घोटाळेबाजांना चांगलाच धडा शिकवला. टूजी स्पेक्ट्रम घोटाळय़ातील ए. राजा, रेल्वे भरती घोटाळय़ातील पवनकुमार बन्सल, कोळसा खाण घोटाळय़ातील नवीन जिंदाल, महाराष्ट्र सदन घोटाळय़ातील छगन भुजबळ या सर्वाना मतदारांनी घरी बसवले. मात्र, आदर्श घोटाळय़ातील आरोपी अशोक चव्हाण आणि बेकायदा खाण घोटाळय़ातील आरोपी व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे यातून सहिसलामत सुटले.
येडीयुरप्पा हे कर्नाटकातील खाण घोटाळ्यात सामील होते, त्यामुळे त्यांना कर्नाटकात भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  त्यांनी या वेळी भाजपचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे मंजुनाथ भंडारे यांचा पराभव केला. भाजपने येडीयुरप्पा यांच्या पक्षाला अलीकडेच आपल्यात विलिन करून घेतले होते, आदर्श घोटाळ्यामुळे मंत्रीपद गमावलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसचे तिकीट मिळणार की नाही अशी अवस्था असताना त्यांना तिकीट मिळाले व त्यांनी नांदेड मतदारसंघात भाजपचे डी.बी.पाटील यांचा पराभव केला.
देशातील महाघोटाळा समजल्या जाणाऱ्या टू जी घोटाळ्याशी संबंधित द्रमुकचे माजी मंत्री ए.राजा यांना निलग्रीस या तामिळनाडूतील मतदारसंघात अद्रमुकचे सी. गोपालकृष्णन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. रेल्वे भरती घोटाळ्यात राजीनामा द्यावे लागलेले मंत्री पवनकुमार बन्सल यांना भाजपच्या श्रीमती किरण खेर यांनी चंडीगड येथून पराभूत केले. द्रमुकचे भ्रष्ट मंत्री टी.आर.बाळू यांना तंजावर मतदारसंघात अद्रमुकचे परशुरामन यांनी पराभूत केले. उत्तर प्रदेशातील कानपूर मतदारसंघात भाजपचे मुरली मनोहर जोशी यांनी कोळसा घोटाळ्यातील मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचा पराभव केला.  आदर्श घोटाळ्यात पहिल्यांदा नाव आलेले व नंतर स्वच्छ असल्याचे सांगण्यात आलेले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूर मतदारसंघात भाजपचे शरद बनसोडे यांनी पराभव केला. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पराभव केला.  पाटबंधारे घोटाळा प्रकरणात सामील असलेले
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचा शिवेसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी पराभव केला. जलसंपदा घोटाळ्यातील राष्ट्रवादीचे
नेते सुनील तटकरे यांना शिवसेनेचे अनंत गीते यांनी पराभूत केले.