उत्तर भारतातील खासदारांना मराठी मंत्र्यांसाठी असलेले कक्ष देण्याचा ‘उदारपणा’ दाखवणाऱ्या महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांची शिवसेनेच्या खासदारांनी कानउघाडणी केली. गेल्या तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र सदनातील कँटीन बंद करून निवासी आयुक्त विपीन मलिक यांनी शिवसेना खासदारांना आव्हान दिले होते. त्याविरोधात संतप्त झालेल्या सेना खासदारांनी मलिक यांच्यासह साहाय्यक आयुक्त नितीन गायकवाड यांना संसदेतील शिवसेना कार्यालयात येण्याचे फर्मान धाडले. मलिक यांनी सेना खासदारांच्या आदेशाला भीक न घालता प्रकृती बरी नसल्याचे कारण पुढे करीत येण्याचे टाळले. गायकवाड यांनी मात्र सेनेच्या दरबारात हजेरी लावली. बागपतचे खासदार सत्यपाल सिंह यांच्यासह चार अमराठी खासदारांना सदनातून बाहेर काढा, अशी मागणी सेना खासदारांनी केली. शिवसेना स्टाइलने प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यावर गायकवाड यांची बोलती बंद झाली.