विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपतर्फे राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागांचा आढावा घेतला जात असला तरी निवडणूक महायुतीमार्फत लढविली जाणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाना सोबत घेऊन यश मिळविले. त्यामुळे महाराष्ट्रातही शिवसेनेला काळजी करण्याचे कारण नसून त्यांच्याशी पक्ष नेतृत्वाकडून सुसंवाद राखला जाईल, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी मोदी यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.
भाजपच्यावतीने विभागनिहाय आढावा घेण्याच्या प्रक्रियेचा शुक्रवारी नाशिक येथे आयोजित बैठकीद्वारे श्रीगणेशा झाला. सिडकोतील हॉटेलमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीस समितीचे सदस्य अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आ. पंकजा मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी जिल्हावार केंद्रीय मंत्र्यावरही सोपविली जाणार असल्याचे सांगितले. आगामी निवडणुकीसाठी बुथनिहाय रचना भक्कम करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघातील स्थिती, कोणत्या मतदारसंघात अदलाबदल करता येऊ शकते याविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली. नाशिक नंतर पुढील सात दिवसात पुणे, नागपूर, मुंबई, कोकण, औरंगाबाद, अमरावती या ठिकाणी उच्चस्तरीय समितीच्या आढावा बैठका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे जावे, अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे. पण, कोणताही वेगळा विचार केला जाणार नसून निवडणूक महायुतीतर्फे लढली जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेनेकडून उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले जात आहे. यावर फडणवीस यांनी जागा वाटप वा तत्सम कोणताही निर्णय महायुतीच्या संयुक्त बैठकीत होतील, असे सांगत फारसे बोलण्याचे टाळले.
सोशल मीडियावरील मोदी हवा ओसरली
राज यांना टोला
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची लाट विरल्याचे विधान केले आहे. त्यावर फडणवीस यांनी राज यांच्या बोलण्याचा भाजपला फायदा नाही आणि तोटाही होत नसल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे खिल्ली उडविली. आगामी विधानसभा निवडणुकीत मोदी यांचा प्रभाव राज यांना दिसेल असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासमवेत १५ जुलै रोजी उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील माजी मंत्री व अनेक बडे पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत. पण, जनतेशी नाळ जोडणाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.