सीताफळाचा वर्षांनुवर्षे वनवास कायम राहिल्याने सरकारदरबारी या फळाची नोंदच होऊ शकली नाही. आता या फळाला केंद्र सरकारचे जीआय मानांकन मिळाल्याने सीताफळ आंतरराष्ट्रीय बाजारात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बालाघाटच्या डोंगराळ भागात नसíगकरीत्या येणारे ‘सीताफळ’ रानमेवा म्हणून ओळखले जाते. जवळपास पाच ते सात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मुबलक प्रमाणात पिकणाऱ्या या फळाला किंमत मात्र मिळत नाही. ‘बालानगरी’ या वाणाचे फळाला अविट गोडी आणि पौष्टिक असल्याने गराचा रस, बिया व टरफल औषध म्हणून उपयोगी येते. मात्र, या फळावरील संशोधन केंद्र उभारले तरी फारसा उपयोग झाला नाही. रामायणातील सीतेच्या आवडीच्या या फळाचा वर्षांनुवर्षे वनवास कायम राहिल्याने सरकार दरबारी नोंदच होऊ शकली नाही. आता या फळाला केंद्र सरकारचे जीआय मानांकन मिळाल्याने सीताफळ आता आंतरराष्ट्रीय बाजारात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीड जिल्ह्यचा बहुतांश भाग बालाघाटच्या डोंगरांनी व्यापला आहे. इतिहासात हा परिसर दंडकारण्याचा असल्यामुळे रामायणातील राम आणि सीता वनवासात आले तेव्हा सीतेला आवडणारे फळ म्हणून या फळाचे नाव ‘सीताफळ’ झाल्याची अख्यायिका आहे. धारूर, वडवणी, केज, बीड, पाटोदा या परिसरातील डोंगर भागात नसíगकरीत्या पूर्ण सेंद्रिय असलेले सीताफळ अधिक गोड, देखणे, रसभरीत असते. या फळाच्या सेवनाचा प्रकृतीवर कोणताही परिणाम होत नाही. २४ टक्के शुगर तेही टोटल सोल्यूबल आहे. वॉिशग्टन आणि इंग्लंड येथील सीताफळापेक्षाही जास्त गोडवा असलेले हे फळ मानले जाते.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सीताफळाच्या झाडांना बहर येतो. शेतकरी, मजूर पक्के (डोळे उघडलेले) सीताफळे तोडून ‘फड’ लावून पिकवतात. त्यानंतर रस्त्यावर, बाजारात या फळाची विक्री केली जाते. मोठय़ा प्रमाणात पिकत असल्यामुळे फळांना भाव मिळत नाही. सर्वसाधारणपणे एका सीताफळाला एक रुपयाच्या आसपास कवडीमोल भाव मिळतो. गरापासून रस, बिया व टरफलापासून औषध बनते. व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करून कंपन्यांना पाठवून चांगला नफा मिळवतात. पण उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. सीताफळावर संशोधन करून प्रक्रिया करणारे उद्योग उभारावेत या साठी मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली. राजकारण्यांनी घोषणाही केल्या. प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही. संशोधन केंद्र उभारले तेही अंबाजोगाईला, ज्यातून कुठलेच संशोधन झाले नाही.

दरम्यान, जिल्हा अधीक्षक, कृषी अधीक्षक रमेश भताने, कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांच्या पुढाकारातून चेन्नईच्या भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री या केंद्र सरकारच्या संस्थेकडे जुल महिन्यात पुणे येथील ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टींगचे प्राध्यापक गणेश िहगमिरे यांच्या पथकाने सीताफळाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रस्ताव मांडला. त्यानुसार मे महिन्यात ‘बीड कस्टार्ड अ‍ॅपल’ नावाने बालाघाट सीताफळ संघ तेलगाव (तालुका धारुर) या नावाने मानांकन मिळाले. केंद्र सरकारच्या संस्थेकडून सीताफळास जीआय मानांकन मिळाल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सीताफळ पोहोचण्यास मदत होणार आहे. परिणामी उत्पादक शेतकरी, मजुरांना याचा चांगला फायदा मिळणार आहे. बालानगरी या वाणाच्या सीताफळाने हैदराबादच्या निजामालाही भुरळ घातली होती. म्हणूनच मोठय़ा प्रमाणात या परिसरात बियाणे रुजवले गेले.

डोंगराळ परिसर, मुबलक पडणारा पाऊस आणि नसíगकपणे येणारे हे फळ अत्यंत गोड आणि दर्जेदार आहे. पण योग्य दिशा न मिळाल्यामुळे वर्षांनुवर्ष हे फळ उपेक्षितच राहिले. आता केंद्र सरकारचेच भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे या फळापासून प्रक्रिया उद्योगांना पोषक वातावरण तयार होईल, अशी आशा केली जाते.

vasatmunde@yahoo.co.in