मध्य अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रांसह विशेषत थायलंडमध्ये पिकवले जाणारे ‘ड्रॅगन फ्रुट’ हे फळपीक अत्यंत कमी पाण्यावर पिकते. खाण्यासाठी पौष्टिक असल्यामुळे या फळाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. खेळाडू आणि शेतीचा छंद असलेले आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांना काही वर्षांपूर्वी ‘ड्रॅगन फ्रुट’ फळपिकाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी पडीक पाच एकरमध्ये तीन वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रुटची लागवड करून दोन वर्षांपासून उत्पन्न घेत आहेत. कमी पाण्यावर एका एकरमध्ये सोळाशे झाडे लावल्यानंतर साधारणपणे २० वर्षांपर्यंत फळं देतात. प्रत्येक हंगामात एक झाड शंभरपेक्षा जास्त फळांचे उत्पादन देत असल्याने प्रति एकर एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. लागवडीसाठी सुरुवातीलाच पावणे दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर मशागतीवर फारसा खर्चही करावा लागत नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुट हे फळपीक ‘आíथक वरदान’ ठरणारे असल्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही भेट देऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी हे फळपीक घेण्याचे आवाहन केले.  बीड जिल्ह्यतील आष्टी, पाटोदा, शिरूर हे तीन तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने कायम दुष्काळी. देशात सर्वात कमी पाऊस पडणारा तालुका म्हणून आष्टीची नोंद. मूळ शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करून आíथक उत्पन्न वाढवण्यावर त्यांचा भर असतो. काही वर्षांपूर्वी त्यांना अत्यंत कमी पाण्यावर ड्रॅगन फ्रुट फळपीक चांगले उत्पन्न देते याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हे फळ लावण्याचा निश्चय केला. मध्य अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रांसह विशेषत थायलंडमध्ये पिकवल्या जाणाऱ्या या फळपिकाला जगाच्या बाजारात मोठी मागणी असते. खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्यामुळे अडीचशे रुपयांपर्यंत प्रतिकिलो भाव मिळतो. धोंडे यांची कडा, चोभा, निमगाव परिसरात जमीन आहे. पडीक पाच एकरात ड्रॅगन फ्रुट फळपिकाची लागवड केल्यानंतर दोन वर्षांत उत्पन्नाला सुरुवात झाली आहे. दुष्काळातही ही फळपिके तग धरून राहिली. एका एकरात सोळाशे झाडांची लागवड होते. सुरुवातीला पावणे दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर तब्बल २० वर्षे प्रत्येक हंगामात एक झाड शंभरपेक्षा जास्त फळांचे उत्पन्न देते. परिणामी शेतकऱ्याला एका एकरातून एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते. तर दरवर्षी मशागतीवरही फारसा खर्च करावा लागत नाही. आष्टी तालुक्यात सलग चार वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती भीषण राहिली. अशा भागातील शेतकऱ्यांसाठी ही ड्रॅगन फ्रुट फळशेती फायद्याची ठरणार आहे. मुंबई-वाशीच्या बाजारपेठेत या फळाला मोठी मागणी आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक असलेले हे फळ पडीक जमिनीत शेतकऱ्याला ‘आíथक वरदान’ ठरणारे आहे. आष्टी तालुक्यात पावसाअभावी पारंपरिक शेती करण्यावरच भर राहतो. मागच्या हंगामात तर जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हते. पाऊस पडला की गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि काही प्रमाणात ऊस, तर नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली जाते. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला हंगाम वाया जातो व शेतकरी आíथक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत या भागातील शेतकऱ्यांना कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारा प्रयोग धोंडे यांनी यशस्वी केला. ड्रॅगन फ्रुट शेतीला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी भेट देऊन या शेतीची माहिती घेतली. आणि स्वत प्रसिद्धिपत्रक काढून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरील ड्रॅगन फ्रुट शेती करावी असे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी धोंडे यांच्या शेतात भेट देऊन ड्रॅगन फ्रुटची माहिती जाणून घेतली. धोंडे यांच्या या नव्या प्रयोगामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या शेतीकडे वळू लागले आहेत. नगर परिसरातील नर्सरीतून ड्रॅगन फ्रुटची रोपे मिळू लागली आहेत. धोंडे यांनी पाच एकरांत घेतलेल्या ड्रॅगन फ्रुट शेतीतून मिळालेल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांमध्ये याची चर्चा असून दररोज ही शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी मोठय़ा संख्येने येत आहेत.

vasantmunde@yahoo.co.in