15 December 2017

News Flash

दुष्काळी भागात ‘ड्रॅगन’ला बहर

मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील शेखर नेने या शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे.

मंदार लोहोकरे | Updated: August 5, 2017 12:55 AM

मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील शेखर नेने या शेतकऱ्याने ड्रॅगन फळ लागवडीचा  प्रयोग केला आहे. त्यांनी ठिबक सिंचनावर दहा एकर क्षेत्रावर ड्रॅगनची लागवड केली आहे. कमी पाणी, कमी खते, कमी खर्च आणि विशेष म्हणजे बाजारात हमखास मागणी असलेले पीक घेऊन या भागातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये नावीन्याचा ध्यास आणि शेतीला आधुनिकतेची जोड देऊन नेने यांनी मोठय़ा धाडसाने ड्रॅगन फळ पिकाची लागवड केली.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका हा दुष्काळी आणि कमी पावसाचा म्हणूनच परिचित आहे. मात्र अशा या भागात एका शेतकऱ्याने ओसाड जागेवर चक्क फळांचा मळा फुलविला आहे. या शेतकऱ्याने अशक्यप्राय वाटणारी ड्रॅगन फळाची लागवड करून वर्षांकाठी सर्व खर्च वगळता ७ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील शेखर नेने या शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. त्यांनी ठिबक सिंचनावर दहा एकर क्षेत्रावर ड्रॅगनची लागवड केली आहे. कमी पाणी, कमी खते, कमी खर्च आणि विशेष म्हणजे बाजारात हमखास मागणी असलेले पीक घेऊन या भागातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. येथील पावसाचे प्रमाण कमी आणि हिवाळाही कमी असल्याने येथे पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते. एखादाच नवीन प्रयोग यशस्वी होतो. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सहन करणारा तालुका म्हणून मंगळवेढय़ाकडे पाहिले जाते. येथील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. खरीप ज्वारीचे पीक फक्त खात्रीने घेतले जाते. इतर वेळी येथील शेती पाण्याअभावी पडीक असते. त्यामुळे येथील शेतकरी शेतीपेक्षा मोलमजुरी करूनच उदरनिर्वाह करतात. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये नावीन्याचा ध्यास आणि शेतीला आधुनिकतेची जोड देऊन नेने यांनी मोठय़ा धाडसाने ड्रॅगन फळ पिकाची लागवड केली.

सुरुवातीला त्यांनी २०१० मध्ये एक एकर क्षेत्रावर ड्रॅगनची लागवड केली. त्यापूर्वी त्यांच्याकडे द्राक्ष आणि डाळिंबाची बाग होती. परंतु सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आणि उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने सलग तीन वष्रे बाग पाण्याअभावी जळून गेली. त्यामुळे त्यांना नुकसान सोसावे लागले. अशा वेळी शेती करावी की नाही असा विचार करत असतानाच त्यांना ड्रॅगन फळपिकाची माहिती मिळाली. कमी पाण्यात, औषध फवारण्या आणि रासायनिक खतांचा वापर न करता हे पीक येत असल्याने त्यांनी एक एकरावर १० फूट रुंद व ५ फूट लांब अशा अंतरावर रोपांची लागवड केली. त्यासोबतच त्यांनी ठिबकचा वापर केला.

ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीनंतर १२ ते १३ महिन्यांमध्ये फळधारणा सुरू झाली. त्यानंतर चार महिन्यांमध्ये फळ काढणीला आले. पहिल्याच वर्षी एक एकरातून दीड लाख रुपयांचा नफा मिळाला. पहिल्या वर्षी रोपे आणि ठिबकसाठी एकरी ६० हजार रुपयांचा खर्च आला. त्यानंतर मात्र दरवर्षी काढणी, मजुरी, वाहतूक आणि इतर कामासाठी एकरी ३० हजारांचा खर्च येतो. या फळाची माहिती नसल्याने चोरी होण्याचे प्रकार होत नाहीत.

मंगळवेढा तालुक्याला मागील दोन वर्षी दुष्काळाशी सामना करावा लागला होता. पाणीटंचाईमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डाळिंब आणि द्राक्षांच्या बाग जळून गेल्या. मात्र नेने यांच्या माळरानातील ड्रॅगनला चार महिने पाणी नसतानाही ही फळ बाग जिवंत राहिली. योग्य व्यवस्थापन आणि ठिबकद्वारे पाणी नियोजन केल्यामुळे या वर्षी चार एकर क्षेत्रावर ड्रॅगन बाग बहरली आहे. सध्या फळांची काढणी सुरू आहे. आतापर्यंत चार एकरातून त्यांनी ८ टन फळांची विक्री पुणे, मुंबई येथील बाजारपेठेमध्ये केली आहे. सरासरी १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. आणखी ८ ते ९ टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. खर्च वजा जाता त्यांना या फळविक्रीतून एकरी पाच लाख रुपयांप्रमाणे चार एकरातून २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या सात वर्षांमध्ये ड्रॅगन फळ पिकातून नेने यांनी चांगली प्रगती साधली आहे. एक एकरावरून आता दहा एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. त्यांना यश आल्याचे पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेऊन ड्रॅगनची लागवड केली. दररोज विविध भागातून शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी येतात.

येथील साहाय्यक कृषी अधिकारी राजकुमार ढेपे यांनी बागेची पाहाणी केली. दुष्काळी भागासाठी हे पीक अत्यंत फायद्याचे आहे. शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला हरकत नाही असे ढेपे यांनी सांगितले. नेने यांनी आणखी पाच एकर क्षेत्रावर नवीन लागवड करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी स्वत: रोपे तयार केली आहेत. एकंदरीतच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यात येणारे व अधिक नफा मिळवून देणारे हे पीक फायद्याचे ठरू पाहात आहे.

ड्रॅगन फळाचे वैशिष्टय़ म्हणजे या फळाचा रस काही आजारांवर गुणकारी आहे. दोन्ही प्रकारच्या ड्रॅगन फळाची आम्ही लागवड केली आहे. शहरात या फळाला मोठी मागणी आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे हे फळ आहे.

शेखर नेने, शेतकरी

cglohokare@gmail.com

First Published on August 5, 2017 12:55 am

Web Title: dragon fruit plantation in drought affected area