30 October 2020

News Flash

शेतीतील जोखमींचे व्यवस्थापन कसे कराल?

कृषी उत्पादनांच्या विविधतेमुळे उत्पादनांतील जोखीम कमी होण्यास मदत होऊ शकते.

दुष्काळ, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे शेतीपुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत.

शेती व्यवसायामध्ये असणाऱ्या विविध जोखमींचा विचार करता शेतकरीवर्गास प्रामुख्याने उत्पादनातील जोखमींस सामोरे जावे लागते. उत्पादनांतील जोखमींस असंख्य घटक जबाबदार असतात. हवामानातील बदल, पिकांवरील कीड व रोग, तण, अपुरे तंत्रज्ञान इत्यादी घटकांमुळे शेती व्यवसायामध्ये अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेती व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्यासाठी उत्पादनातील जोखमींचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते.

शेती व्यवसायामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या जोखीम आणि संभाव्य धोके यामुळे शेती व्यवसायात अनिश्चितता वाढली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलांमुळे शेतीपुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. शेती व्यवसायामध्ये असणाऱ्या विविध जोखमींचा विचार करता शेतकरीवर्गास प्रामुख्याने उत्पादनातील जोखमींस सामोरे जावे लागते. उत्पादनांतील जोखमींस असंख्य घटक जबाबदार असतात. हवामानातील बदल, पिकांवरील कीड व रोग, तण, अपुरे तंत्रज्ञान इत्यादी घटकांमुळे शेती व्यवसायामध्ये अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पीक लागवडीनंतर हंगामाच्या शेवटी अपेक्षित उत्पादनाची हमी शेतकऱ्यांना नसते. पिकांचे एकरी उत्पादन प्रत्येक हंगामास बदलत असते किंवा आकस्मिक हवामान बदल जसे दुष्काळ, पूर परिस्थितींमुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त होते. याशिवाय पिकांवरील कीड व रोग, वन्य प्राणी इत्यादी घटक पीकउत्पादनांवर परिणाम करतात व नुकसानीस कारणीभूत ठरतात. शेती व्यवसायात अपेक्षित यश मिळविण्यासाठी उत्पादनातील जोखमींचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. कृषी उत्पादनातील जोखीम व संभाव्य धोक्यांच्या व्यवस्थापनांसाठी खालील मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे.

उत्पादन विविधता

कृषी उत्पादनांच्या विविधतेमुळे उत्पादनांतील जोखीम कमी होण्यास मदत होऊ शकते. एकापेक्षा अधिक पिकांचे उत्पादन किंवा इतर जोडधंदे जसे पशुपालन हे उत्पादनातील जोखीम कमी करण्यास मदत करू शकतात. यामध्ये कमी जोखीम असलेली पिके व जोडधंदे यांची निवड केल्यास नुकसान, जोखीम कमी करता येऊ शकते.

अतिरिक्त क्षमता

अतिरिक्त उत्पादन क्षमता म्हणजेच आपल्याकडे असणाऱ्या साधनसामग्रीचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनातील जोखीम काही प्रमाणात कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, पावसाळ्यामध्ये योग्य प्रमाणात जलसाठा किंवा जनावरांच्या चाऱ्याचा साठा करून ठेवल्यास पुढील काळात येणारी दुष्काळाची जोखीम निश्चितपणे कमी करता येऊ शकते.

एकात्मिक पीक पद्धती

एकात्मिक पीक पद्धतींमध्ये प्रामुख्याने एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास तुलनात्मक उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनातील जोखीम काही प्रमाणात होते.

भाडेतत्त्वावर किंवा करार शेती

भाडेतत्त्वावर किंवा करार शेतीमध्ये ज्याप्रमाणे सामायिकरीत्या उत्पादनाच्या वाटय़ाची विभागणी संबंधितामध्ये होते, त्याचप्रमाणे उत्पादनातील जोखीम व नुकसानीची विभागणीही संबंधितामध्ये होऊ शकते. उदाहरणार्थ, उत्पादनातील व विपणनातील जोखीम असलेले कांदा व इतर पिकांची अशा प्रकारची शेती केल्याचे आढळून येते.

आधुनिक तंत्रज्ञान 

नवीन तंत्रज्ञानाच्या अद्ययावत माहितीच्या साहाय्याने उत्पादनातील जोखीम मोठय़ा प्रमाणात कमी करता येऊ शकते. विविध प्रकारच्या कृषी मालाच्या उत्पादनासंबंधित नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याबाबतचे संशोधन काही सरकारी तसेच खासगी संस्था सतत करीत असतात.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही सरकारी संस्था आपत्कालीन पीक नियोजन पद्धती प्रसारित करीत असतात. सदर नवीन तंत्रज्ञान व अद्ययावत माहितीच्या आधारे उत्पादनातील जोखीम कमी करता येऊ शकते.

विमा योजना 

कृषी उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रकारच्या योजना आणि धोरणे शासन पातळीवर राबविली जात आहेत. कृषी उत्पादनांतील जोखीम कमी करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजेच विमा योजना होय. विविध पिकांच्या उत्पादनातील जोखमींचा समावेश हा पीक विमा योजनेमध्ये होतो. पीक विमा योजनेमध्ये पिकांची काढणी होईपर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी आवश्यक पीक विमा काढून होणाऱ्या संभाव्य नुकसानीस प्रतिबंध घालता येऊ शकतो.

प्रा. प्रवीण जगताप pravinj2011@gmail.com

(लेखक के. के. वाघ कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नाशिक येथे कृषी अर्थशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2017 1:02 am

Web Title: how to manage risk in agriculture
Next Stories
1 हापूसला ‘जीआय’ नोंदणीचे कवच
2 पचायला हलकी, आरोग्यदायी ज्वारी
3 शेळ्यांच्या कृत्रिम रेतनाकडे वाढता कल
Just Now!
X