News Flash

साखर उताऱ्याच्या घटीची समस्या

उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादकता न वाढल्यास संपूर्ण कारखानदारी धोक्यात येईल, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नुकताच पुण्यातल्या एका कार्यक्रमात दिला. त्यांचा अनुभव पाहता कारखानदारांनी त्यांचा इशारा गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. कारण अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी या-ना त्या कारणाने अडचणीत आली आहे. भ्रष्टाचार हादेखील एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्याचबरोबर राज्यातील महत्त्वाची कमी उत्पादकता आणि साखर उतारा हीदेखील मोठी समस्या आहे.

उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाटय़ाने मागे गेला असून आता उत्पादकता वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. देशातील आणि विदेशातील साखर उद्योगाचा आढावा घेतला असता महाराष्ट्रासमोरील आव्हान मोठे आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वच साखर कारखान्यांनी ऊस विकास कृती कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. खरे तर हा कार्यक्रम सक्तीने हाती घ्यायला हवा. वाढती पाण्याची समस्या लक्षात घेता, ठिबकवर ऊस लागवड वाढवावी लागणार आहे. यासाठी साखर कारखान्यांनी आणि व्हीएसआयकडून शेतकऱ्यांना मदतीची आणि जागृतीची गरज आहे. उत्पादकता वाढीसाठी स्वत:चा बेणेमळा शेतकऱ्यांनी उभारण्याची गरज आहे. माती आणि परीक्षण युनिटची आवश्यकता आणि सेंद्रीय, जैविक खतांचा वापर यावर भर देण्यासही पावर यांनी सांगितले आहे. गटनिहाय कृषी केंद्रे उघडून खते, अवजारे, विस्तारसेवा देण्याबाबतही त्यांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

जगात १२२ देशांत १८०० लाख टन साखर तयार केली जाते. त्यातील ७० टक्के साखर ही उसापासून तर ३० टक्के साखरनिर्मिती बीटपासून होते. भारतात मात्र बीटपासून साखर निर्मिती अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे सर्व लक्ष उसाकडेच द्यावे लागणार आहे. उसापासून साखरनिर्मितीत जगात सर्वात मोठा स्पर्धक ब्राझील हा देश आहे. तिथे १०० लाख हेक्टरवरील उसापासून ३७५ लाख टन साखर तयार केली जाते. भारतात मात्र २७५ लाख साखर तयार होते. आपल्या देशात सर्व राज्यांना मागे टाकून उत्तर प्रदेश साखर उत्पादनात आघाडीवर पोहचला आहे. तो का पुढे गेला, याचा अभ्यास राज्यातल्या साखर कारखानदारांनी केला पाहिजे. उत्तर प्रदेशने २१ लाख हेक्टरवरून २२.३३ लाख हेक्टरवर ऊस लागवड नेली आहे. हेक्टरी उत्पादन ५९ टनांवरून ७३ टनापर्यंत नेले असून उतारा ९ टक्क्यांवरून १०.८२ टक्क्यांवर आणला आहे. तेथे ऊस शास्त्रज्ञ डॉ. बक्षीराम यांनी को-२३८ नावाचे एक महिना लवकर पक्व होणारे व जास्त उतारा देणाऱ्या वाणाचा प्रसार केला आहे. साखर विकण्यासाठी दिल्ली, राजस्थान, हरियाणा या बाजारपेठादेखील उत्तर प्रदेशला जवळ आहेत. कारखान्यांचे गाळपदेखील १३० दिवसांच्या पुढे चालते.

ऊस उत्पादकता, उतारा, हंगामाचे दिवस व बाजारपेठा या सर्व बाबींमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. राज्यातील उसाची स्थिती पाहता गेल्या दोन वर्षांत दहा लाख हेक्टरने क्षेत्र घटले आहे. कारखानेदेखील ५८ ते ९२ दिवसच चालतात. हंगाम कमी होत चालल्याने कारखान्यांचा खर्च वाढला आहे. ११ टक्के वाढीव एफआरपी आणि काढलेली कर्जे यामुळे कारखान्यांचे आíथक गणित बिघडले आहे. अशीच परिस्थिती राहिली आणि ऊस उत्पादकांना चांगला दर दिला गेला नाही तर शेतकरी अन्य पिकांकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत.

ainapurem1674@gmail.com

(लेखक कृषि अभ्यासक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 1:44 am

Web Title: sugarcane productivity sugar production
Next Stories
1 भारतीय शेतकऱ्यांचे कृषिविषयक अधिकार
2 शिवारातील ‘स्वयंचलित प्रणाली’चे यश!
3 ‘बोरबन’ची डाळिंब, द्राक्षे युरोपात..
Just Now!
X