डॉ. पंकज भानुदास हासे/ डॉ. मंजूषा पंकज हासे

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिकीकरणाने पशुसंवर्धनास एक नवी दिशा मिळाली. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने पशुसंवर्धन व्यवसाय अल्पावधीतच उदयास आला. सन २००८२००९ मध्ये एकूण कृषी क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये पशुसंवर्धनाचा वाटा २६.८४ टक्के आहे.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

शेतीप्रधान संस्कृती असणाऱ्या भारत देशाला उत्तम पशुसंवर्धनाचा इतिहास व वारसा अगदी आर्य संस्कृतीपासून लाभलेला आपणास पाहावयास मिळतो. शेतीला पूरक साधन तसेच गाईला देवता मानणाऱ्या समाजामुळे पशुसंवर्धनाला आर्य समाजापासूनच महत्त्व होते. गाईच्या दुधामधील आयुर्वेदीय गुणधर्माचा अभ्यास आर्यकालीन भारतातसुद्धा प्रगत होता. उच्च पोषणमूल्य असणाऱ्या देशी गाईच्या दुधामुळे पशुपालन व्यवसाय वृद्धिंगत झाला. साधारणत: १८ व्या शतकाच्या पूर्वार्धापासून पशुपालनाकडे एक आर्थिक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले. गोपालनाला राजाश्रय मिळाल्याने राजे-महाराजे आपल्या प्रजेला गोपालनासाठी प्रोत्साहित करू लागले. संपत्तीची देवाणघेवाण ही पशूंच्या स्वरूपात होऊ लागली. दैनंदिन जीवनातील आदान-प्रदानाचे माध्यम म्हणून पशूंचा विचार होऊ लागला. ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पशुसंवर्धनाकडे डोळसपणे पाहिले जाऊ लागले.

कालांतराने एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिकीकरणाने पशुसंवर्धनास एक नवी दिशा मिळाली. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने पशुसंवर्धन व्यवसाय अल्पावधीतच उदयास आला. सन २००८-२००९ मध्ये एकूण कृषी क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये पशुसंवर्धनाचा वाटा २६.८४ टक्के राहिला. पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणाऱ्या परावलंबी शेतीला पर्याय म्हणून शाश्वत आर्थिक प्रगतीचा व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाची भरभराट झाली. सकल घरेलू उत्पादनात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाने ५.९ टक्के वाढीची नोंद केली. गुजरात, महाराष्ट्र व पंजाब यांसारख्या राज्यांनी एकंदरीतच पशुसंवर्धनातून प्रगतीचा आदर्श संपूर्ण देशासमोर ठेवला.

गुजरातमध्ये सहकार रचनेतून निर्माण झालेली ‘आनंद मिल्क युनियन’ हे बदलत्या आर्थिक प्रवाहाचे द्योतक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे यांसारख्या जिल्ह्य़ांनी तर पशुसंवर्धनामध्ये विविध प्रयोग करून शेती विकासाचा जणू कानमंत्रच दिला. तेथील अल्पभूधारक, शेतमजूर यांना दुभती जनावरे पोटच्या लेकरासमान वाटू लागली. ‘चितळे’सारख्या विज्ञानाची कास धरणाऱ्या संस्थेने आज परिसरातील अनेक कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजंदार उपलब्ध करून दिलाच, शिवाय उत्पादित दुधाला खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करून दिली. प्रभात, चितळे, पराग डेअरी, थोरात डेअरी, गोकुळ या व यांसारख्या अनेक दुग्ध उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांनी शाश्वत अर्थार्जनाचा विश्वास पशुपालकांमध्ये निर्माण केला आहे. या संस्थांची कामगिरी होतकरू तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील उत्पादन स्रोतांमध्ये एकंदर दुग्धोत्पादनाच्या ९२ टक्के, मांस उत्पादनाच्या ४२ टक्के व कातडी उद्योगाच्या ८३ टक्के उत्पादन हे गोधनापासून मिळते. १९५० ते १९७० या कालखंडामध्ये भारतातील दुग्ध उत्पादन गोठीत स्वरूपात होते. परंतु १९७० साली ‘ऑपरेशन फ्लड’च्या माध्यमातून धवलक्रांतीची मुहूर्तमेढ डॉ. वर्गीस कुरियन यांच्याकडून केली गेली. दुग्ध व्यवसायातील मैलाचा दगड म्हणून या उपक्रमाची इतिहासात नोंद झाली. जागतिक बँकेने १९९८ साली प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालामध्ये या उपक्रमाचा विशेषत्वाने उल्लेख केला.

जागतिक बँकेने गुंतवलेल्या २०० कोटी रुपयांमधून प्रतिवर्षी त्यांना २४,००० कोटी रुपयांचा ग्रामीण अर्थकारणातून परतावा मिळाला आहे. जो की आतापर्यंत राबविण्यात आलेल्या कोणत्याही उपक्रमातून मिळाला नव्हता. डॉ. वर्गीस कुरियन यांनी अट्टहासाने कोटय़धीश होण्याचा मार्ग नाकारला आणि ‘आणंद’सारख्या धूळभरल्या खेडय़ाला आपली कर्मभूमी मानली. विदेशी आक्रमणाला थोपवत ‘अमूल’ची निर्मिती केली व धवलक्रांतीच्या या जनकाने पशुपालक व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याचा मार्ग दाखविला. २००१ मध्ये दुग्धउत्पादन ४८.६ दशलक्ष टनांवर पोहोचले. दूध उत्पादनाचा वार्षिक सरासरी दर हा ५.६ टक्के इतका राहिला आहे. १२ व्या प्रकल्पात महिला पशुउत्पादक संघटना स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रकर्षांने उल्लेखिलेली आहे.

‘गोधन ज्याच्या घरी तेथे लक्ष्मी वास करी’, ‘ज्याच्या दारी काळी, त्याच्याकडे दररोज दिवाळी’ यांसारख्या पुरातन म्हणींची साक्षात प्रचीती गोपालकांनी अनुभवली. पशुसंवर्धनामुळे गोबर गॅस निर्मिती म्हणजे आजच्या वाढत्या महागाईच्या काळात इंधनाला स्वस्त आणि सुलभ उपाय पशुपालकांनी अवलंबिला आहे. करमाळा तालुक्यातील सुरेश वाघधरे यांच्यासारख्या प्रयत्नशील शेतकऱ्याने गोबर गॅसपासून (मिथेन) वीज निर्मिती, गांडूळ खत, व्हर्मीवॉश निर्मिती, नॅपेड खत निर्मिती असे प्रयोग करून पशुपालकांना अर्थार्जनाचा नवीन मार्ग दाखविला आहे.

‘इंडिया टुडे’सारख्या नामांकित नियतकालिकानेही व्यवसायाभिमुख उद्योगांमध्ये ‘शेळीपालन आर्थिक समृद्धी’ यासारख्या लेखाने शेळीपालन हा एक आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय असल्याचे अधोरेखित केले. केवळ शेळीपालनावरच गुजराण करणारी कुटुंबे आपल्याला दिसतात. काळे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या उस्मानाबादी शेळीला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पारितोषिकाने शेळीपालकांचा विश्वास दृढ झाला आहे. या जातीच्या शेळीच्या एका वेळी तीन करडे जन्म देण्याच्या सिद्ध, जनुकीय गुणधर्मामुळे शेतमजूर, अल्पभूधारक यांना शाश्वत उत्पन्नाचे व अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाले आहे.

pankaj_hase@rediffmail.com