11 July 2020

News Flash

भवताल आणि ‘भूमि’का

लेखक ज्या काळात वावरतो त्या काळाचा त्याच्यावर मोठा प्रभाव असतोच.

काळ जे गुंते निर्माण करून ठेवतो, ते सगळ्यांच्या वाटय़ाला सारखे येतील असे नाही. लेखक आपल्या कुवतीनुसार हे गुंते उकलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पुढय़ातला जो काळ आहे त्याला तो सामोरा जातो. हा काळाचा तुकडा त्याला पुरेपूर आकळला आहे असेही नसते. लेखक त्याच्या परीने हा काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याची नजर तल्लख आणि तीक्ष्ण- त्याला या काळाचे तरंग टिपता येतात.

लेखक ज्या काळात वावरतो त्या काळाचा त्याच्यावर मोठा प्रभाव असतोच. कितीतरी गोष्टी काळच जन्माला घालतो. हा काळ सरसकट सारखा असत नाही. म्हणजे सगळ्यांच्या घडय़ाळात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणीच काटे असतील; पण म्हणून सगळ्यांच्या वाटय़ाला आलेला काळ सारखा नसतो. या धावणाऱ्या काळात आपण नेमके कुठे आहोत, हे महत्त्वाचे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यावर एखादे झाड असते, एखादा बारका जीव त्या प्रवाहात गटांगळ्या खात खात आपल्या अस्तित्वासाठीची धडपड करीत प्रवाहासोबत वाहत जातो. प्रवाहात चिवट अशा प्रकारचे लव्हाळे तग धरून असते. अगदी तळाशी गुळगुळीत झालेला गोटा अधूनमधून आपली जागा सोडत घरंगळत असतो. कोणी तग धरतो, कोणी बुडतो, कोणी वाहत जातो, आणि कोणावर या प्रवाहाचा काहीच परिणाम होत नाही. काळाचेही असेच आहे. काळ जे गुंते निर्माण करून ठेवतो, ते सगळ्यांच्या वाटय़ाला सारखे येतील असे नाही. लेखक आपल्या कुवतीनुसार हे गुंते उकलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पुढय़ातला जो काळ आहे त्याला तो सामोरा जातो. हा काळाचा तुकडा त्याला पुरेपूर आकळला आहे असेही नसते. लेखक त्याच्या परीने हा काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्याची नजर तल्लख आणि तीक्ष्ण- त्याला या काळाचे तरंग टिपता येतात. आपल्या समोर काही घडत आहे आणि आपण त्याच्या नोंदी करीत आहोत, असे थोडेच असते? किंवा एखादे चित्र आपण तपशीलवार पाहत आहोत आणि नंतर त्याचे वर्णन आपल्याला करायचे आहे, असेही काही सुविहित आकलन काळाच्या बाबतीत नसते. जेव्हा काळ धावतो तेव्हा कोणाला उसंत असते प्रत्येक क्षणाची नोंद करण्याची? बऱ्याचदा लेखक सावरतो तो ‘घडून गेल्यानंतर’! जसा कुठूनतरी भिरकावलेला दगड एखाद्या मुक्या जिवाला लागतो आणि त्याच्या कलकलाटाने आपले लक्ष वेधले जाते. मग आपला शोध सुरू होतो. दगड कुठून आला असणार? तो कोणी मारला असणार? ज्या काळात आपण वावरतो त्या काळाच्या लेखी आपले अस्तित्व ते कितीसे? त्या काळाची कवेत घेण्याची अजस्र ताकद आणि व्यक्ती म्हणून असलेले आपले क्षुद्रपण यांचा मेळ कसा लावायचा? तरीही लेखक आपल्या परीने, आपल्या कुवतीने काळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

या काळात वावरताना आपला जो भवताल असतो, तोही लेखकाच्या एकूण निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या भोवती जे घडते ते वास्तव, आपल्या उघडय़ा डोळ्यांना दिसते ते वास्तव, आपण कानोकानी ऐकलेले, कुणीतरी सांगितलेले वास्तव व आपण कल्पना करत असलेले वास्तव.. वास्तवाच्या अशा कितीतरी परी! ‘वास्तव’ हा साहित्यात सदैव वापरला जाणारा शब्द. वास्तवाचे प्रतििबब साहित्यात किती, हा तसा नेहमी विचारला जाणारा प्रश्न. ‘साहित्य हा समाजजीवनाचा आरसा आहे,’ असे त्या अनुषंगानेच बोलले जाते. एखादा लेखक ज्या काळातला आहे, त्या काळातले समाजजीवन कसे होते, हे पाहायचे असेल तर त्या लेखकाचे साहित्य वाचा, असे सांगितले जाते. वास्तवाचा साहित्याशी संबंध आहेच; पण हे वास्तव साहित्यात जसेच्या तसे येत नाही. जेव्हा एखादी कलाकृती थेट, प्रत्ययकारी, अस्सल जीवनदर्शन घडवणारी आहे असे म्हटले जाते; तीसुद्धा वास्तवाची जशीच्या तशी नक्कल करणारी नसते. लेखकाच्या अवतीभोवती असंख्य घटना रोज घडतात. त्याच्यावर या घटनांचे पडसाद येऊन आदळतात. ज्या भूमीवर तो उभा असतो तिथे सतत काही ना काही घडतच असते. तरीही ते सगळेच लेखकापर्यंत- म्हणजे त्याच्या आतपर्यंत पोहोचते असे नाही. त्याला भिडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, त्याच त्याचा कायम पिच्छा करतात. वास्तवातले जे संदर्भ त्याला विद्ध करून सोडतात, घायाळ करतात, अशाच संदर्भाचा काला त्याच्या मस्तकात होतो. हे संदर्भ आणि तपशील जसेच्या तसे उमटत नाहीत. लेखकाच्या अंत:करणापर्यंत यातले मौलिक झिरपत जाते. वास्तवातल्या जंत्रीचे आंतरिकीकरण करूनच कोणतीही कलाकृती जन्म घेते. वास्तवातले चिमूटभर तपशील घेऊनही लेखक आपली स्वत:ची एक अख्खी कल्पित वास्तू उभी करू शकतो. आणि इथेच त्याचा कस लागतो. अन्यथा रोजच्या घटना-घडामोडींच्या वास्तवाचे तपशील देणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये आणि साहित्यात कोणताच फरक करता येणार नाही. कारण वृत्तपत्रातून जे उमटते तेही समाजजीवनाचेच प्रतििबब असते.

आजचे वास्तव स्थितीशील नाही. ते निर्वकिारपणे पाहावे इतके थंडही नाही. या वास्तवाचा चेहरा निर्दयी, भेसूर आणि भक्ष्याला गिळंकृत करण्यासाठी वासलेल्या कराल जबडय़ाप्रमाणे आहे. यात भक्ष्यस्थानी कोण? तर जबडय़ात घेण्याआधी एखाद्या श्वापदाने पायाखाली किंवा पंजाखाली घेताना ज्यांचा आवाजही उमटणार नाही असे सगळेच. मी ज्या वास्तवाच्या तुकडय़ावर उभा आहे ते वास्तव संभ्रमित करणारे आहे. वरकरणी ते लोभस, िहदकळणारे, मायावी आणि फेसाळल्याप्रमाणे वाटत असले, तरीही त्याच्या बुडाशी असलेला गाळ अस्वस्थ करणारा आहे. जी प्रचंड गती या जगण्याला लाभली आहे ती उतारावरून सुसाट घरंगळणाऱ्या एखाद्या दगडी शिळेप्रमाणे आहे. ही गती आणि भोवती चिरफळ्या करून टाकणारे वास्तव. एकात एक अनेक गोष्टींची सरमिसळ. कशाचा संबंध कशाशीही आणि कुठपर्यंतही. म्हणजे आता एखाद्या छोटय़ा गावातही महानगरात धुमाकूळ घालणारे गाणे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘एंट्री’ करणार. गणेशोत्सवाच्या काळात ‘शांताबाई’पासून ‘कल्लोळाचं पाणी’पर्यंतची गाणी रात्रंदिवस वाजणार. रात्री उशिरापर्यंत पोरं गणपतीपुढं बेभान होऊन कसलातरी उन्माद संचारल्यागत नाचणार. शक्यतो शेजारीपाजारी कुणीच कुणाला काही बोललेले ऐकूजाणार नाही, एवढा आवाज या गाण्यांचा. हा गणपतीचा सगळा खर्च गावातला एखादा पुढारी करणार. तरुणांचे टोळके कायम हाताशी राहावे म्हणून सगळा खर्च उचलणारा तो पुढारी हा पसा दुसऱ्याच्याच खिशातून खर्च करणार. तो गावातल्याच रेशन दुकानदाराला किंवा गुत्तेदाराला सांगणार. आणि मग हा रेशन दुकानदार अख्ख्या गावाच्या धान्याचा काळाबाजार करणार. त्याने एवढा खर्चाचा भार उचलला की त्याला बाकीच्या चोरवाटा मोकळ्या! ‘कल्लोळ्याच्या पाण्या’वर नाचणाऱ्यांना याचे भान नाही असे कसे म्हणता येईल? एखाद्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू. खर्च कोणाचा? त्याच गावातून नदीपात्रात बेफाम वाळू उपसणाऱ्या आणि प्रचंड कमाई करणाऱ्या एखाद्या ठेकेदाराचा! वाळूचा उपसा रात्रंदिवस सुरू आणि गावात हरिनामाचा गजरही अहíनश. सात दिवस विणा खाली ठेवायची नाही आणि मंदिराच्या सभागारातल्या खुंटीलाही टांगायची नाही. अख्खे गाव हरिनामात तल्लीन. रात्रंदिवस चालू असलेल्या वाळूउपश्याने रस्त्यांची चाळण झालेली. एखादी खेडय़ातली बाई प्रसूतीसाठी तालुक्याच्या गावी न्यायची म्हटले तर वाटेतच बाळंत होण्याची भीती. अशा सलणाऱ्या, खुपणाऱ्या कित्येक बाबी एकात एक मिसळलेल्या आहेत.

महापुरुषांची जयंती शाळेत साजरी करताना पेटवलेली अगरबत्ती विझवून लगेच पुढच्या कार्यक्रमात लावण्यासाठी शिल्लक ठेवली पाहिजे असा दंडक घालणारे संस्थाचालक, येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून तोडपाणी करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवलेले दलाल, देवस्थानच्या जमिनीवर वेटोळा करून तीर्थक्षेत्राचा विकास करू पाहणारे ‘विश्वस्त’, मोकळ्या जमिनी घशात घालण्यापासून ते जुगार अड्डे चालवण्यापर्यंतचे अंगीकृत उद्योग बाळगणारे आणि त्यासाठी गुंड पोसणारे पुढारी, सावकारी ते प्लॉटिंगच्या धंद्यापर्यंत आणि ‘केबीसी’सारख्या घोटाळेबाज सापळ्यात अज्ञ लोकांना अडकवण्यापर्यंतच्या कामात जीव झोकून देणारे गुरुजी, लोकशाही व्यवस्थेतही सर्वाधिक चढी बोली बोलून सरपंचपद मिळवण्यासाठी खेळली जाणारी स्पर्धा, शाळेतला तांदूळ सरळ दुकानावर जाईल यासाठी कार्यरत असलेली साखळी.. अशा अनेक तपशिलांनी हे वास्तव गरगरून, भोवंडून टाकणारे आहे.  यात सर्वसामान्य माणूस हतबल, मूक आहे. याचा परिणाम लेखकावर, त्याच्या संवेदनशीलतेवर होतोच.

आपला काळ आणि आपला भवताल यातले आशयद्रव्य घेऊनच लेखकाला रचनेचे शिल्प साकारावे लागते. मस्तकातला सगळा ऐवज घेऊन तो जेव्हा लिहायला बसतो तेव्हा केवळ अक्षरेच झरतात असे नाही, त्याच्या उरातूनही काहीतरी झरत असते, पाझरत असते. हा निचरा जितका सघन, तितकी रचना जिवंत होत जाते. अशावेळी बाहेर पडण्यासाठी उत्सुक असलेले अक्षरांचे जत्थेच्या जत्थे ओसंडून धावू लागतात. हा वेग अनावर असतो. वास्तवाचे प्रकटीकरण म्हणजे ‘हे असे असे आहे’ असे सांगणे नव्हे, किंवा ‘जसेच्या तसे सांगणे’ही नव्हे. प्रत्यक्षात उघडय़ा डोळ्यांना दिसणाऱ्या वास्तवापेक्षा या वास्तवाला प्रभावित करणारे, त्यावर दाब टाकणारे आणि अदृश्य पातळीवर असलेले वास्तव जास्त सामथ्र्यवान असते. ते सूक्ष्मपणे हेरण्याची अंतर्दृष्टी लेखकाकडे असायला हवी. एखाद्या व्यक्तीचे वर्तन दिसू शकते, तिच्या हालचाली, देहबोली असे सगळे काही दिसेल. पण त्या व्यक्तीचे मनोव्यापार कसे दिसणार? तिथपर्यंत लेखकाला पोहोचावे लागते. खूप खोलवर खणत गेल्याशिवाय हा शोध पुरा होत नाही. हा शोध म्हणजेच माणूस समजून घेण्याचा शोध. कधीकाळी सुष्ट-दुष्ट अशा प्रवृत्तींच्या संघर्षांत माणसांची ढोबळ वर्गवारी करणारे साहित्य होते. काळ्या-पांढऱ्या रंगात या व्यक्तिरेखा रंगवल्या जात. प्रत्यक्षात जीवन इतके साधे-सरळ कधीच नसते. त्यातली व्यामिश्रता समजून घेणे व त्याचे सर्जनात रूपांतर करणे, हे एक मोठे आव्हान असते. प्रत्यक्षातले वास्तव जेव्हा लेखक अनुभवतो तेव्हा त्याची दृष्टी या वास्तवाला वारंवार तपासत राहते. हे एक जग लेखकासमोर असते; ज्या जगात तो एक पात्र म्हणूनही जगत असतो. याखेरीज लेखकाचे स्वत:चेही एक जग असते. या जगात तरी तो त्याच्यापुरती अनियंत्रित सत्ता हाताळत असतो. या जगातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे वर्तनव्यवहार, क्रिया-प्रतिक्रिया या साऱ्यांवर त्याची मालकी असते. पण हेही एका मर्यादेतच खरे आहे. बऱ्याचदा लेखकाच्या डोक्यात वेगळेच असते आणि प्रत्यक्ष लेखनाची सुरुवात होते तेव्हा वेगळेच काहीतरी लिहून होते. त्याने निर्माण केलेली पात्रे ही जणू त्याची मुभा घेऊनच मोकळेपणाने वागू लागतात. कालांतराने स्वत: विकसित होण्याची दिशा निश्चित करू पाहतात. हे पवित्रे लेखकालाही दिङ्मुढ करणारे असतात. असे झाले तरच ही लेखकाने निर्माण केलेली ‘प्रतिसृष्टी’ आहे असे मानता येईल. आपल्या भोवतालातले जगणे एखाद्या कलाकृतीत आणतानाचा हा प्रवास लेखकाचा कस पाहणारा असतो. ‘माझ्या डोळ्यांना तर खूप दिसते आहे, पण जे दिसते ते सारेच मला जसेच्या तसे मांडायचे नाही. मला वेगळे काहीतरी सांगायचे आहे..’ हा विचार निर्मितीच्या केंद्रस्थानी असतो.

पत्रकार म्हणून अनेक घटना, प्रसंग मी दररोज पाहतो. संवेदनशीलतेला आवाहन करणाऱ्या आणि आस्थेच्या व्यूहात शिरणाऱ्या त्यातल्या काही घटना असतात. दुष्काळाचे वार्ताकन करताना एका महिलेची भेट झाली होती. जिने रोजगारासाठी कुटुंबासह गाव सोडले. काम तर मिळालेच नाही; पण शेतमालकाशी झटापट झाल्यानंतर घरच्यांची ताटातूट झाली आणि तिला परत स्वत:च्या गावी येण्यासाठी चौदा दिवसांची पायपीट करावी लागली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा मी हादरून गेलो होतो. या घटनेवर त्यावेळी काही बातम्याही केल्या. पण भेट झाल्यापासून ती बाई काही डोक्यातून जाता जात नव्हती. सतत डोक्याला काहीतरी कुरतडत होते. आणखी खूप काही या बाईमध्ये होते. एवढे सोसूनही तिच्यातला चिवटपणा कायम होता. दु:खाचा अटळ आणि निमूट स्वीकार करण्याचे समंजसपण तिच्यात होते. वेळप्रसंगी नवऱ्यालाही धीर देत पुन्हा उभे राहण्याचा ठाम निर्धार तिच्या ठायी होता. आपल्यावर बेतलेला, गुदरलेला प्रसंग उकलून सांगण्याची शैली होती. आणि जणू काही घडलेच नाही, अशी मनाची समजूत करीत पुन्हा रोजच्या जगण्यातल्या संघर्षांला सामोरे जाण्याचे सहजपणही होते. लेखक म्हणून मला या बाईने भयंकर अस्वस्थ केले. हे अस्वस्थपण आपल्याला कशाचा तरी दंश झाला आहे आणि ती ठणक काही केल्या जात नाही, या प्रकारचे होते.

मी स्वत: लहान असताना आग्यामोहोळाने एका माणसाचा पिच्छा केल्याचे पाहिले होते. मी वडिलांसोबत तेव्हा तालुक्याच्या ठिकाणी आठवडी बाजाराला गेलो होतो. तो प्रसंग आजही डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. हा माणूस इकडे घुसू की तिकडे- असे करत सरावैरा धावत होता. त्यावेळी गर्दीतले कोणीतरी म्हणाले होते, ‘आता याची सुटका नाही. यानं पाण्याच्या हौदात जरी उडी मारली तरी या माश्या याच्या डोक्यावर घोंगावत राहणार.’..लिहिणाऱ्याची गत याहून निराळी नसते.

त्या बाईची गोष्ट खूप काळ माझ्या मनाला पिळवटून टाकीत होती. त्यातूनच ‘डंख’ ही गोष्ट मी लिहिली. कथेचा नायक एक कार्यकर्ता आहे. जेव्हा ही बाई आपल्या नवऱ्यासोबत येऊन कार्यकर्त्यांला आपली वेदना सांगते, तेव्हा हा कार्यकर्ता तिच्या दु:खाने तर हादरतोच; पण ते सांगणाऱ्या बाईची शैलीही त्याच्यावर विलक्षण छाप पाडते. जी आच तिला लागली, त्यातली तडफड बाईच्या सांगण्यातून कुठेच व्यक्त होत नाही. या बाईच्या सोसण्याच्या बुडाशी असलेला दु:खाचा अनाहत नाद या कार्यकर्त्यांलाही विकल करतो. पुढे गोष्ट त्या बाईपुरतीच मर्यादित राहत नाही. हा कार्यकर्ता असलेला नायक जेव्हा आजारपणात स्वत:च्या गावी जातो तेव्हा आपल्या जवळच्याच नात्यातल्या मुलीला आपली आई शेतात राबवून घेत असल्याचे पाहतो. राबायला आलेली मुलगी ही नायकाच्या मावसबहिणीचीच असते. तिच्यासोबत तिची आणखी एक मत्रीण. कथेतल्या नायकाची गत पुन्हा आग्यामोहोळ पाठीशी लागलेल्या त्या माणसासारखीच. म्हणजे तो गावी आला तरीही त्याला आपल्या पायाखालीच काहीतरी जळते आहे असे वाटू लागते. बाईच्या दु:खाची ठणक घेऊन तो गावी येतो, तर इथेही स्वत:च्याच शेतात मुलीचं राबणं पाहतो. ‘पोरी नादावल्यासारखं काम करतात. बाकीच्या मजूर बायकांसारखी टंगळमंगळ करत नाहीत..’ हे या नायकाला त्याची आईच सांगते. कथेत हे सगळे कलात्म अंगाने येते. पण प्रत्यक्षात त्यात शोषणाचेच स्तर उलगडत जातात. ‘झाकण उघडल्याबरोबर दम कोंडून टाकणारी वाफ बाहेर येईल असे सगळे काळजात साठवून कशा जगतात या बाया?’ असा प्रश्न नायकाला त्या बाईच्या अनुषंगाने सुरुवातीला पडलेला असतो. शेवटी त्याच्या लक्षात येते- ही गोष्ट फक्त एकटय़ा त्या बाईची नाही; शाळकरी वयात आई ज्यांना राबवून घेते अशा पोरींचीही आहे. कथेतला नायकच शेवटी आवेगाने काही लिहू पाहतो आणि एका असह्य तापातून सुटण्याचा रस्ता त्याला दिसू लागतो. सुरुवातीला आपल्याला जो डंख बसलेला आहे त्याची ठणक आता उतरत चालली आहे असे त्याला वाटू लागते.

असे सूक्ष्म पातळीवर जाणवणारे, तर कधी अदृश्य असणारे शोषण नेहमीच कुठे ना कुठे डोळ्यातल्या कुसळाप्रमाणे सलत असते. त्याच्याकडे मी केवळ कुठल्यातरी पात्राचे अटळ भागधेय म्हणून बघत नाही. किंवा पृष्ठस्तरावर जे दिसते तेवढेच टिपणे हेही मला पुरेसे वाटत नाही. जमिनीच्या पोटात वाहणारे पाण्याचे झरे या पृष्ठस्तरावरून दिसत नाहीत, पण हे प्रवाह आणि त्याची खळखळ यांचा कायम शोध घ्यावासा वाटतो. प्रत्येक वेळी या शोषणाची रीत वर्गसंघर्षांचीच असेल असे नाही. ती अगदी गावात एखाद्या कुटुंबाकडे एकवटलेल्या सत्ता-संपत्तीच्या हव्यासातून जन्माला आलेलीही असू शकते.

माझ्या ‘चिरेबंद’ या कथेचा नायक प्रसाद हा २०-२२ वर्षांचा तरुण आहे. गावी त्याचा मोठा वाडा आहे. तिथे फक्त त्याची आजी राहते. वडिलांच्या सांगण्यावरून तो आपल्या मूळ गावी आलेला आहे. या प्रसादचे आजोबा सावकारी करायचे. त्यांनी अनेकांच्या जमिनी गिळलेल्या आहेत. अनेक जमिनींचे खटले अजूनही चालू असतात. अशाच एका जमिनीच्या वादातून प्रसादच्या आजोबांचा खून झालेला आहे. पण पुढे हैदराबाद मुक्तीसंग्रामातल्या लढय़ातील एक हुतात्मा स्वातंत्र्यसनिक अशी ओळख प्रसादच्या आजोबांची होते. त्यांच्या पश्चात आजीला पेन्शनही मिळते. प्रसादला स्वत:च्या आईकडून आणि गावात आल्यानंतर काही लोकांकडून हे सारे संदर्भाचे धागे कळू लागतात. त्याची आजी चिरेबंदी वाडा सोडत नाही. ती चिवट आहे. नवऱ्याने शोषणातून हा जमीनजुमला मिळवला आहे याची तिला कल्पना आहे. ही आजीसुद्धा एकाकी, तरीही चिरेबंद. प्रसादला मात्र हा पिढीजात वारशाचा वाडा, जमीनजुमला या कशाशीही नाते जोडून घ्यावेसे वाटत नाही. हे सारे शोषणातून एकवटलेले आहे, असे तो फक्त कुठे म्हणत नाही; पण हळूहळू तशी त्याची धारणा होते. काही मोजके दिवस थांबल्यानंतर तो एके दिवशी त्या वाडय़ातून बाहेर पडतो.

..एखादा अनुभव सुचल्यानंतर कथेत येणाऱ्या प्रतिमांची मांडामांड, निवेदनाची पद्धत, भाषेचा वापर अशा अंगाने विचार करावा लागतो. या साऱ्या आशयाचे वाहकत्व भाषेलाच करावे लागते. अशावेळी अनुभव ज्या जातकुळीचा आहे त्या प्रतीची भाषा वापरावी लागते. ‘चिरेबंद’सारख्या कथेत निवेदनाची लय संथ पावसाच्या झडीसारखी आहे. काही वेगळ्या, वेधक प्रतिमा कथेत येतात. एका शेतात शेतकरी नांगरणी करीत असतो. त्याच्या नांगराचा फाळ खाली जमिनीत सोन्याच्या हंडय़ाला तटतो. हंडय़ाच्या खणकन् आवाजाने शेतकरी चमकतो. खाली वाकून हंडय़ाला हात लावतो तर भलीमोठी घंटा असलेला पांढरा नंदी शेतकऱ्याच्या मागे लागतो. शेतकरी जीव वाचवण्यासाठी ठेचकाळत, अडखळत शेताच्या बाहेर पडतो तेव्हा त्याला तो नंदी दिसत नाही. अप्रत्यक्षपणे का होईना, पण या ठिकाणी अघोरी संपत्तीचे सूचन केले जाते. पुढे ही पांढऱ्या नंदीचीच प्रतिमा कथेच्या शेवटी येते. प्रसाद वाडय़ाबाहेर पडताना आजी चिवटपणे वाडय़ातच बसलेली आहे. ‘कुणीतरी ढकलून दिल्यागत मी दरवाजाबाहेर पाऊल टाकलं आणि पांढरा नंदी पाठीमागं लागल्यासारखा वेगानं पायऱ्या उतरत खाली आलो..’ या शब्दांत प्रसादचे निवेदन संपते.

वास्तवाला कलात्मक रूप देताना असंख्य प्रतिमा, प्रतीके, लोककथेतून झिरपत आलेले संदर्भ असे सारे काही गोळा होते. अनुभवाचा ‘कलावस्तू’पर्यंतचा प्रवास हा असा अनेक गोष्टींचा स्वीकार करीतच होतो. जेव्हा लोक गोष्टी सांगायचे तेव्हाही कल्पनाशक्तीची अफाट ताकद होतीच. त्याआधारेच वास्तवाला कथनमूल्य प्राप्त झालेले होते. ही एकच अशी गोष्ट होती, की जिथे जगण्यातले अभाव भरून निघतील आणि व्यक्ती म्हणून असलेल्या दुबळेपणावर मात करून कल्पनेने काही काळ का होईना, पण एक मनोराज्य उभे करता येईल. आज आपण जादुई वास्तववादाबद्दल बोलत असलो तरीही आपले कथनपरंपरेतले भाषिक पूर्वसंचित पाहिले तर वास्तव सरधोपटपणे सांगण्याची रीत आपल्याकडे कधीही नव्हती, हे आपल्या ध्यानी येईल. सगळी कामांची आवराआवर झाल्यानंतर बाहेर पटांगणात झोपताना गोष्टी सांगण्याची परंपरा होती. वैशिष्टय़पूर्ण अशा गोष्टी सांगणारी काही माणसे गावात असायची. एका रात्रीत पूर्ण होणार नाहीत आणि सलग काही दिवस ऐकवल्या जातील अशा गोष्टी सांगणारी काही माणसेही मी पाहिली आहेत. कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव देऊन आपल्या जगण्यासाठी बळ पुरविणारा निवारा शोधणे आणि रोजचे जगणे सुसह्य करणे, या प्रकारची ही रीत आहे. चमत्कृतीपूर्ण, अद्भुत नवलाईने या कष्टप्रद आणि अभावग्रस्त जगण्यातली पोकळी भरून काढणे, या गोष्टीची आपल्याकडे मोठी परंपरा आहे.

आधी मिळेल ते पोटात ढकलायचे आणि नंतर पुन्हा रवंथ करत बसायचे, असा प्रकार अनुभव घेण्याच्या पद्धतीतही असतो. भवतालातल्या घटनांची पहिली नोंद ही अशीच असते. पुढच्या टप्प्यात लेखक त्यावर काम करीत असतो. गवसलेल्या, हाती आलेल्या धाग्यांचे विणकाम त्याला करावे लागते. अगदी सुरुवातीला फक्त कच्चा सांगाडा दिसू लागतो. या सांगाडय़ात प्राण भरण्याचे काम लेखकालाच करावे लागते.

आपण ज्या भवतालात वावरतो त्या भवतालाशी आपले एक नाते जोडलेले असते. ते जसे आपण समाजशील प्राणी आहोत म्हणून व्यक्तींशी, समाजाशी जोडलेले असते, तसेच ते निसर्गाशीही जोडलेले असते. हा निसर्गही आपल्यावर परिणाम करीत असतो. जी माणसे आपल्या जगण्याच्या परिघात येतात त्या माणसांचे जीवनव्यवहार, त्यांची स्वप्ने, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांच्या हर्ष-खेदाच्या जागा अशा सगळ्याच गोष्टींकडे लेखक कमालीच्या औत्सुक्याने पाहतो. माणूस समजून घेण्याची त्याची असोशी त्याच्यात सदैव प्रबळ असते. जे नवे, वैशिष्टय़पूर्ण आहे ते लेखकाच्या नजरेतून सुटत नाही. त्याला काही सुचते तेव्हा तो त्या सुचण्याच्या िबदूजवळ स्थिर राहत नाही. तेथून त्याचा नवा प्रवास सुरू होतो. घटना-घटितांचे कंगोरे तो तपासत जातो. जे आपल्याला गवसले आहे त्याची अभिव्यक्ती ही लेखकाच्या दृष्टीने एक जोखीमच असते. कारण या ठिकाणी तो स्वत:लाच पणाला लावत असतो. अनुभव शब्दात बांधतानाची त्याची धडपड विलक्षण जीवघेणी आणि तगमग सहन करायला लावणारी असते. अशावेळी आपल्याकडे नेमक्या शब्दांची समृद्धी किती, यावर बरेच काही अवलंबून असते. लेखकाने जे शब्द कमावलेले असतात ते शब्दकोशातून नव्हे; जगण्यातूनच ते आलेले असतात. कुठून कुठून त्याने ही शब्दांची सामग्री जमवलेली असते. झाडांचा अवघा घनगर्द पर्णसंभार आपल्याला दिसतो, पण त्याच्या मुळांनी मातीतून शोषलेले जे अन्नद्रव्य आहे त्यालाच त्याचे श्रेय जाते. लेखकाला भाषेचे हे संचित समाजजीवनातूनच मिळते.

‘खुंदळन’ या गोष्टीत अशी वेगळी, समाजजीवनातून आलेली, ठसठशीत अशी भाषा वापरण्याचा प्रयोग मी केला आहे. विचारनिष्ठेपासून ढळलेल्या आणि अपराधभावाने ग्रासलेल्या एका कार्यकर्त्यांचे भावविश्व या कथेत येते. कथेच्या सुरुवातीला बियाच्या कणसाची प्रतिमा येते. जेव्हा दुष्काळ पडलेला असतो तेव्हा काही वेळा लोकांची आतडी खरकटी होण्यासाठीसुद्धा अन्न मिळत नव्हते- असे संदर्भ आपल्याला इतिहासात सापडतात. अशावेळी पुढच्या काळात ज्वारीपेरणीसाठी लोकांनी काही कणसं जपून ठेवलेली असतात. आज खायला काही नाही, मग आता हीच ज्वारी दळून खावी असा विचार त्यावेळी लोकांनी केला नाही. जे पुढच्या काळासाठी पेरणीकरता जपून ठेवायचे आहे ते आज कितीही वाईट वेळ आली तरीही दळून खायचे नाही, हा शिरस्ता पाळण्यामागे एक मूल्यविचार आहे. आपण सत्त्व राखणारे बियाचे कणीस होतो, आता आपणही जात्यातून भरडून निघालो, आपले पीठ झाले आहे, आता कुणीही आपल्याला मळणार, ही भावना त्या विचारनिष्ठेपासून ढळलेल्या नायकाला सारखी छळत असते. कुठल्या कुठल्या प्रतिमांनी त्याचा हा अपराधभाव ठळक होत जाईल याचा विचार केल्यानंतर काही प्रतिमा सापडू लागतात. ‘टिचरीगोटी’सारखी प्रतिमा. गोटय़ा खेळणारी लहान मुले ‘टिचरीगोटी’ डावात घेत नाहीत. त्या कार्यकर्त्यांचे ते टिचलेपण त्यातून उठावदार होते. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये या कार्यकर्त्यांचा उल्लेख एके ठिकाणी ‘उकळलेली पत्ती’ असा होतो. म्हणजे ज्याचा वापर झालेला आहे. आता त्याच्यात तडफ नाही आणि रगही नाही असे त्यातून ध्वनित होते. अशा वेगवेगळ्या प्रतिमा, उपमांच्या माध्यमातून हा अनुभव आकाराला येत होता. कधीकाळी लोकांमध्ये रमणाऱ्या या कार्यकर्त्यांला त्या अपराधीपणातून आलेले एकाकीपणही आहे. जत्रेत नेणत्या मुलाचं बोट सुटल्यानंतरची जी भावावस्था असते, ती हा कार्यकर्ता अनुभवतो. शेवटी त्याच्यातला अपराधभाव आणि त्यातून त्याचे आतून मोडून पडणे ही बाब साकारण्यासाठी आणखी काही प्रतिमांची मांडामांड करावी लागते. शेवटी ‘आडरानात अब्रू लुटलेल्या बाईसारखं पोरकेपण भवती दाटून आलं..’ अशी त्याच्या मनाची अवस्था त्याला एका टोकावर घेऊन जाणारी असते. आपला भवताल रेखाटताना भाषेची योजकता कशी होती, याचे हे थोडक्यात उदाहरण.

आज साऱ्या वास्तवालाच एक विलक्षण अशी गती आली आहे. गाव कुठे संपते आणि शहर कुठून सुरू होते, याची सीमारेषाच निश्चित करता येत नाही. ज्या गावात सकाळी पाकिटातले दूध येते आणि दुकान उघडल्याबरोबर चार-दोन डोकी मोबाइल रिचार्ज करण्यासाठी येतात, तिथे आता जगण्यातही किती बदल झाले असतील याची आपण कल्पना करू शकतो. मी ज्या भवतालात वावरतो तो धड शहरही नाही आणि खेडेही नाही असा आहे. एक अर्धनागर असे जग आता सगळीकडे आकाराला येते आहे. या नव्या जगाची घडई सध्या वेगाने सुरू आहे. हा वेग पकडायचा असेल तर सर्व प्रकारचे पूर्वग्रह बाजूला फेकून द्यावे लागतील आणि खुल्या जीवनदृष्टीने त्याकडे पाहावे लागेल.

या भवतालाचा मला जाणवणारा सगळ्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे आजच्या लेखकाला परिसराची निसर्गवर्णने तसेच रंगरूप, उंची मोजणारी व्यक्तिचित्रणे यांत गुरफटून चालणार नाही. भवतालातल्या घटकांनी धारण केलेली गती टिपायची असेल तर माणसाचा, त्याच्या मनाच्या तळाचा शोध हीच गोष्ट महत्त्वाची मानावी लागेल. जे जगणे स्थितिशील होते त्या जगण्यात परिसराबद्दलची निष्ठा होती. आजचा परिसर स्थितिशीलता हरवणारा आणि आपली स्थानवैशिष्टय़े गमावणारा आहे. त्यामुळे ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘गारंबीचा बापू’, ‘माणदेशी माणसं’ यांसारख्या परिसरनिष्ठ कलाकृती पुढच्या काळात लिहिल्याच जाऊ शकणार नाहीत. आजच्या भवतालात या स्वरूपाच्या परिसरनिष्ठेला फारसा अवकाशच नाही. कारण सर्वदूर अशा एकाच अर्धनागर जगाचा प्रारंभ केव्हाच झालेला आहे. त्यामुळे परिसराचे, निव्वळ शेताबांधाचे चित्रण एवढाच आजच्या लेखकाच्या आस्थेचा व्यूह असणार नाही. आपल्या भवतालातल्या माणसांच्या जगण्यातली उलथापालथ, हरघडी होणारे त्यांच्या जगण्यातले अंत:स्फोट, ते घडवणाऱ्या राजकारण व समाजकारणाचे अंतरंग हीच आजच्या लेखनामागची ‘भूमि’का असणार आहे.
आसाराम लोमटे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2016 11:19 am

Web Title: surrounding time period and writer
Next Stories
1 भोवळ
2 नंदनवनं महानगरांतली!
3 वनप्रेमी पॅरिस
Just Now!
X