22 January 2021

News Flash

सर्जनचिंतन आत आणि बाहेर

‘नृत्य’ या कलेविषयी माझ्या मनात अपार आदर आहे.

कोणत्याही कलेत हालचाली- आतल्या (बुद्धी आणि मनाच्या) आणि बाहेरच्या ( कलेतून प्रत्यक्ष व्यक्त होणाऱ्या) अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यासाठी त्या कलेला सर्जनशील चिंतन, मनन, परिशीलन आणि विवेकी विवेचनाची जोड द्यावी लागते. या सर्जनप्रक्रियेचा बुद्धिवादी कलावंताने घेतलेला मागोवा..

‘नृत्य’ या कलेविषयी माझ्या मनात अपार आदर आहे. मी काही अविस्मरणीय प्रयोगही पाहिलेले आहेत. त्यात भारतीय नर्तकांतील केलुचरण महापात्रा, संयुक्ता पाणिग्रही, बिरजूमहाराज, राधा-राजा रेड्डी, रोहिणी भाटे, सोनल मानसिंग, मृणालिनी साराभाई, मल्लिका साराभाई आणि अस्ताद डेबू यांचे नृत्य पाहिले आहे. तर रुक्मिणीदेवी अरुंडेल, चंद्रलेखा, उदय शंकर यांच्यावरील माहितीपट पाहिले आहेत. तसेच रशियन बॅले, पिना बॉशचा प्रयोग, मार्था ग्रॅहॅमचा बॅले पाहिलाय. इझाडोरा डंकनचे चरित्र आणि चित्रपट पाहिला आहे. तसेच काही टॅप डान्सेस पाहिलेले आहेत. ही सारी कमालीची थोर आदरणीय मंडळी आहेत. यांच्या प्रयोगातून मिळालेल्या असंख्य क्षणांनी साऱ्यांना जगताना आनंद दिला आहे. त्या क्षणांनी समृद्धता दिली आहे. इथे ‘क्षण’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे.

कादंबरी वाचताना, चित्रपट पाहताना, शिल्प पाहताना, गाणे ऐकताना आणि नाटक बघताना हा ‘क्षण’ महत्त्वाचा असतो. तो क्षण अवचित येतो आणि अचानक विजेप्रमाणे निमिषार्धात चमकून जातो. क्षण म्हणजे ‘मोमेंट.’ ‘Moment’ याचा अर्थ ‘A very brief period of time.’ हिंदीत ‘पल’ किंवा ‘लम्हा’ म्हणतात. या क्षणाचे वैशिष्टय़च हे असते की, तो हरक्षणी.. हरघडी वर्तमानातच असतो. या ‘Moment’पासून ‘Momentum’ म्हणजे ‘गती’ किंवा ‘बल’, ‘Momentarily’ म्हणजे ‘क्षणभर’ असे अर्थ प्राप्त होणारे शब्द तयार होतात. आपण नेहमी बोलताना ‘Moment of Truth’- म्हणजे ‘निर्णायक क्षण’ असाही वापर करतो. माझ्या मते, हे सारे अर्थ महत्त्वाचे आहेत. आणि मला जो मुद्दा मांडायचा आहे त्याकरता हे सारे अर्थ उपयुक्त आहेत.

‘क्षण’ या अर्थाने अनेकांनी आजपावेतो हजारो कविता रचल्या आहेत. ज्ञानदेवांनी ‘क्षण एक मन बैसोनि एकांती। विचारी विश्रांती कोठे आहे?’ असे व्याकूळ होऊन विचारलेले आहे. जोत्स्ना भोळ्यांचे गाणे ‘क्षण आला भाग्याचा’ प्रसिद्धच आहे. तर माणिक वर्माचे ‘क्षणभर उघड नयन देवा’ हे आर्त गीत आपल्याला परिचित आहेच. वीर सावरकरांच्या ‘सन्यस्तखड्ग’ नाटकातील ‘शतजन्म शोधिताना’ या गाण्यात शेवटच्या चरणात ‘क्षण तो क्षणात गेला। सखि हातचा सुटोनी॥’ असे म्हटले आहे. त्यातील ‘क्षण तो क्षणात गेला’ ही ओळ मला फार आवडते. शिवाय गोविंदाग्रजांची- म्हणजे राम गणेश गडकरींची ‘निष्प्रेम चिरंजीवन ते, जगी दगडालाही मिळते। धिक्  तया क्षण एक पुरे प्रेमाचा- वर्षांव पडो मरणांचा मग पुढे॥’ ही ‘प्रेम आणि मरण’ या कवितेतील ओळ महत्त्वाची आहे. तर तुकाराम महाराजांचा ‘क्षण’चा जगण्याशी संबंध सांगणारा अप्रतिम अभंग आहे. तो असा-

‘क्षणाक्षणां सांभाळितो। साक्षी होतो आपुला॥
न घडावी पायी तुटी। मनें मिठी घातली॥
विचारतों वचनां आधी। धरूनि शुद्धी ठेविली॥
तुका म्हणे मागें भ्यालो। तरी झालो जागृत॥’

तुकारामबुवांनी ‘क्षण’ आणि ‘साक्षीभाव’ याकडे निर्देशन केले आहे. क्षणाक्षणांत जागृतीचे कण असावे लागतात याचे भान ते देतात. लक्षात घ्या- ‘क्षणोक्षणी भानावर असणे’ याविषयी तुकोबा बोलत आहेत. ‘क्षणाक्षणाला बेभान होणे हेच कलाकाराचे कर्तव्य आहे’, किंबहुना- ‘बेभान होतो तोच कलाकार’ हा गैरसमज सार्वत्रिक असताना तुकाराम महाराज स्वत:कडेच साक्षीभावाने पाहायला सांगत आहेत. हा मुद्दा तात्त्विकदृष्टय़ा महत्त्वाचा आहे.

यातून ‘क्षण’महात्म्याचा मुद्दा पोहोचला असेलच. सारे कलावंत या एका ‘अवचित’, ‘अलौकिक’, ‘अचानक’, ‘अद्भुत’ आणि ‘आनंदमयी’ क्षणासाठी आतुर असतात. हा क्षण पकडण्याकरता उत्सुक असतात. तो क्षण जेव्हा तयार होतो तेव्हा कलावंत आणि रसिक प्रेक्षक यांच्यात एक अद्वैत तयार होते. ‘मी-तूपणाची बोळवण’ होते. पण असा हा अपार अनुभवाचा क्षण.. हा बिंदू तयार होतो कशातून? या प्रश्नाला भिडायला हवे. तत्पूर्वी या विषयातील दुसरा शब्द घेऊ या- ‘Movement’!

‘Movement’ म्हणजे हालचाल. an act of moving. किंवा A change of position किंवा What someone is doing during a particularlar period किंवा A slight movement of the body किंवा A group of people working together to advance their shared political, social or artistic ideas. इथे  ‘Movement’ शब्द ‘चळवळ’ या अर्थी उपयोगात आणलाय. हिंदीत ‘Movement’ला गति, गतिविधी, चलन, चलना, चाल, जुम्बिश, झुकाव, लय, संचार, हरकत असेही म्हणतात. हे सारेच अर्थ आपण वापरत असतो. हालचाल ही जगण्याची आणि जिवंतपणाची खूण असते. मृत्युसमयी शरीरातील सर्व सूक्ष्म हालचाली थांबतात. आतली आणि बाहेरची हालचाल थांबणे म्हणजे मृत्यू.

संगीतातही ‘सिंफनी’मध्ये ‘Movement’ हा शब्द वापरला जातो. नाटक आणि नृत्यात तर या ‘Movement’ला- हालचालीला अतिशय महत्त्व असते. रंगमंचाचे विभाग करून त्यात या हालचाली होतात. Up right, Up centre, Up left, left, centre, Right, Down left, Down centre  आणि Down right या भागात आपला संचार होतो. हालचाल होते. Movement होते. नाटकातील नट पात्रांच्या मनोवस्थेनुसार या शारीरिक हालचाली करतात. कधी संथपणे करतात, तर कधी गतिमानतेने. कधी काहीही हालचालीही होत नाही.

ही शारीरिक हालचाल कशातून तयार होते?

‘Moment’ म्हणजे ‘क्षण’ आणि ‘Movement’ म्हणजे ‘हालचाल’च्या व्याख्या आणि जाणवलेले अर्थ सांगितले. आता ‘हालचाल : आत आणि बाहेर’ या गोष्टी पाहू. प्रत्येक क्षणात ‘हालचाल’ असते. मात्र, प्रत्येक हालचालीत ‘क्षण’ सामावलेले असतात. मात्र, क्षणांच्या अंतर्भूत ताकदीवर हालचालीला सघन अर्थ प्राप्त होतो. आता असे सघन क्षण कशातून निर्माण होतात, हा प्रश्न उभा राहतो.

नाटकात अभिनयासंदर्भात ‘Internalisation’ आणि ‘Externalisation’ असे शब्द वापरले जातात. मराठीत आपण ‘अंतर्मुख’ आणि ‘बहिर्मुख’ असे म्हणतो. ‘आपल्या आत डोकावून पाहणे’ हा वाक्प्रचार आपण काही वेळा ऐकतो. आताच्या ‘गोंगाटी’ समाजात ‘आत बघणे’ या क्रियेला किंचितही जागा उरलेली नाही. बाजारू यंत्रणेत प्रत्येक गोष्ट विकायला असताना आपण आणि आपल्या साऱ्या भावना किमतीचे लेबल लावून प्रदर्शनात मांडलेल्या आहेत. या फ्लेक्सच्या चकचकीत, बटबटीत, कचकडय़ा संस्कृतीत आपण ‘अंतर्मुख’ व्हायला जागाच ठेवलेली नाही. अर्थात हा गोंगाट आपल्या समाजात कायम असावा. म्हणूनच तर ज्ञानदेवांना ‘क्षण एक मन बैसोनि एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ हा प्रश्न पडतो. ‘एकान्त’ ही फार आवश्यक गोष्ट असते. एकान्त हरवला तर क्षण निर्माण होत नाही. ‘मी-तूपणाची बोळवण’ होत नाही. मीर ताकी मीर म्हणतो त्याप्रमाणे ‘तुम मेरे पास होते तो कोई दुसरा नहीं होता’ हे शक्य होत नाही. ‘एकान्त’ ही कुठल्याही माणसाची गरज आहे. यातूनच सर्जनाचे धुमारे फुटतात. आपण आपल्या आत डोकावून पाहू लागतो. आपण स्वत:कडे साक्षीभावाने पाहू लागतो. ज्याला काही निर्माण करायचे आहे त्याच्यासाठी हा एकान्त अतिमहत्त्वाचा आहे. या एकान्ताचा अर्थ रानावनात जाऊन बसणे, इतकाच मर्यादित नाही. समाजात राहत असताना लोकान्तातच एकान्त मिळवावा लागतो. रामदासस्वामी म्हणतात त्याप्रमाणे ‘काहीसा एकान्त- काहीसा गलबला’! पण हे आता दिवसेंदिवस दुरापास्त झालेले आहे. कलकलाट हीच या काळाची ओळख आहे. वातावरणात ‘ऑक्सिजन’ या वायूबरोबर हे ‘गोंगाटवायू’ आत शरीरात जातात. टीव्ही, मोबाइल, इंटरनेट ही माध्यमे तो ‘गोंगाटवायू’ शरीरभर पसरवत असतात. त्यामुळे मानसिक आणि पर्यायाने शारीरिक आरोग्यही धोक्यात आलेले आहे. सलग ऐकणे, पाहणे, विचार करणे, वाचणे आता शक्यच होत नाही. आता साऱ्या क्षणांचे तुकडे असतात. या तुकडय़ांतून बेचव आणि सत्त्वहीन चोथा आपल्या मेंदूत रेंगाळत राहतो. या चोथ्यातून आपण अनुभव नावाची गोष्ट वेचत राहतो. हा अनुभव संपृक्त नसल्याने सतत मग ‘व्हेकंट’.. पोकळ, भुसभुशीत वाटत राहते. आता कलाकार म्हणून मी या प्रकारच्या क्षणांच्या शोधात असतो. मी असा क्षण पकडू पाहतो- ज्यात मला जगण्याचे शहाणपण सापडेल, ज्यात माणूस म्हणून मी उन्नत होईन, ज्यात मला अपार निरामय शांतता मिळेल. माझ्या मते, ‘जगण्याची एकूण समज वाढवणे’ हे कुठल्याही कलाकाराचे उद्दिष्ट असते.

श्रेष्ठ गायक पं. कुमार गंधर्वाच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट.. एका मैफिलीला श्रोते कमी जमलेत हे पाहून आयोजक अस्वस्थ झाले होते. कुमारजी तंबोरे जुळवत होते. त्या एकान्त क्षणी कुमारजींची आयोजक मित्राशी दृष्टभेट झाली. आयोजकाची अस्वस्थता कुमारजींच्या लक्षात आली. कुमारजींनी अस्वस्थतेचे कारण विचारले. आयोजकाने कमी प्रेक्षकांची अडचण सांगितली. एक क्षणभर कुमारजी चिंतनमग्न झाले आणि म्हणाले, ‘देखो भैया, हम अंदर देखके गाते है, बाहर देख के नहीं.’ किती महत्त्वाचे आहे हे बोलणे! रोहिणीताई भाटेंवरच्या माहितीपटात त्या फार महत्त्वाचे वाक्य बोलल्या आहेत. त्यांनी ‘चिंतन’ हा शब्द वापरला. त्यांच्या मते, नृत्यात निव्वळ शारीरिक हालचालींपेक्षा चिंतन महत्त्वाचे. आता ‘चिंतन’ म्हणजे काय? चिंतन म्हणजे व्यापक, सखोल आणि प्रगल्भ वैचारिक जीवनदृष्टी! लोकांकडे लक्ष ठेवून सतत लोकाभिमुख, प्रेक्षकानुनयी हालचाली करणे यातून आपले सत्त्व आणि स्वत्वच हरवते. आपण ज्या हालचालीचा.. movement चा अर्थ समजावून घेत आहोत, त्यातील ‘आतल्या हालचाली’चा हा अर्थ  मला लागतो. रंगमंचावर शरीराची हालचाल होणे ही नंतरची क्रिया आहे. तुमच्या प्रयोगात शरीराच्या अपरिमित हालचाली असतील, देखणी रचना असेल, संगीत असेल, रंगसंगतीचे पोशाख असतील, नेत्रदीपक प्रकाशयोजनाही असेल, स्क्रीन असेल, प्रोजेक्शन असेल.. पण ते ‘चिंतन’ कोठे असेल? ‘चिंतन’ नसेल तर कलाकृतीला काय अर्थ? ‘चिंतन’ नसेल तर कलेलाच काय अर्थ आहे? कलेत ‘चिंतन’ असेल तर आपण चिंतनात खोल बुडी मारून वर येतो आणि प्रेक्षकालाही बुडी मारायला लावून वर आणतो.  यातून साक्षीभावाचा क्षण तयार होतो. गाणाराच स्वत:चे गाणे ऐकू लागतो. ‘मीच गायक, मीच प्रेक्षक’ हीच साक्षीभावाची स्थिती होते. ‘संगीत अंदरही होता है’ या कुमारजींच्या वाक्याचा अर्थ मग कळतो. अंतर्मुख झालो तरच चिंतन शक्य आहे. एकान्त असेल तरच चिंतन असेल. कलेची साधना म्हणतात ती हीच असावी. कलेचा आनंद आणि कलेचा उन्माद यांत फरक आहे.

याकरिता प्रथम ‘आतला आवाज’ काय म्हणत आहे हे पाहणे गरजेचे असते. माझ्या मनात काही हालचाल होते का? आणि झाली तर त्या हालचालीचे रूप काय असते? आजूबाजूचे जग पाहून आणि अनुभवून आपल्या आत काय होते? कुठले प्रश्न तिथे उपस्थित होतात आणि अस्वस्थ करतात? जगण्याच्या भौतिक प्रश्नांबरोबरच कुठले आधिभौतिक प्रश्न मनात कोलाहल माजवतात? लाखो प्रकारचे हे प्रश्न असतात. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे म्हणणारे नैतिक प्रश्न हरक्षणी उसळी मारत असतात. या प्रश्नांमुळे मनात सतत हालचाल होते. ही मनाची ‘movement’  जास्त महत्त्वाची असते. तुमच्या मनातील प्रश्नांच्या खोलीवरून तुमच्या मनाची उंची कळते. पण आता असे प्रश्नच पडताहेत की नाही, अशी स्थिती सर्वत्र आहे. कलावंत यापासून दूर नाहीत. ते या ‘बहिर्मुख गोंगाटवायू’चे बळी आहेत.

आता आपल्या आत प्रश्न कसे पडतात, चिंतन कसे होते, हे बघू. ‘संवेदनशीलता’ हा शब्द आपण नेहमी ऐकतो. ‘Sensitive’ हा तसा बोलण्यात नेहमी येतो. ही संवेदनशीलता आपल्या पंचेंद्रियांतून उगवते. कान, नाक, डोळे, त्वचा अणि जीभ ही पंचेंद्रिये. या पाच गोष्टींचा सिग्नल मेंदू असतो. या मेंदूचा विकास या पाच माध्यमांतून होतो. ऐकणे, पाहणे, स्पर्श, श्वास घेणे आणि चव घेणे यातून माणूस जगण्याचा अनुभव घेतो. जिवंतपणाचा अनुभव घेतो. या अनुभवाचे काही अर्थ मेंदूला लागतात. आपल्याला स्मृती किंवा ‘मेमरी’ असते. त्यात हे अनुभव साठवले जातात. सूक्ष्म आणि स्थूल घटनांचे पुंजकेच्या पुंजके मेंदूच्या कप्प्यात असतात. डोळ्यांना पाहण्याबरोबरच वाचताही येते. नाकाला श्वासाबरोबरच वास घेता येतो आणि जिभेला चवीबरोबरच बोलण्याकरिता मदत करता येते. हा सारा विकास मानवाच्या उत्क्रांतीत झाला आहे. पाहणे आणि वाचणे यातूनच तर माणसाने कमालीची झेप घेतली. जगातील अनेक गोष्टी आपल्याला जगताना अनुभवता येण्यापलीकडे असतात. त्या वाचनातून आपल्याला कळू शकतात. जगाच्या कानाकोपऱ्यात जे जे चालू असते ते मुद्रणकलाक्रांतीमुळे वाचून कळते. आता तर ते दृश्यकलाक्रांतीमुळे प्रत्यक्ष पाहताही येऊ लागले आहे. ही प्रगती नव्वद सालानंतर तर झपाटय़ाने झाली. या काळाचे नावच ‘Post 90’ आहे. नव्वदनंतर जगभर जे कमालीचे बदल झाले ते अभूतपूर्व आहेत. परिस्थिती विलक्षण वेगाने बदलली. होत्याचे नव्हते झाले. ‘डिजिटल भाषा’ जाणणारे आणि ‘डिजिटल’ भाषा न जाणणारे अशी जगाची विभागणी झाली. असे सारे विभक्त जग एका बशीत गोळा झाले. अनुभवांचे आदानप्रदान प्रकाशवेगाने होऊ लागले. त्याचे फायदे झाले, तसेच तोटेही होऊ लागले. वेडसर वाटावे असे तंत्रज्ञान बेभानपणे नाचू लागले. गेल्या तीस वर्षांत माणसाचा मेंदू मात्र त्या गतीला साजेसा बदललेला नाही. हे बदल कसे समजावून घ्यावेत, हेच शोधण्यात माणसाची सारी शक्ती खर्च होते आहे. खर्च होणाऱ्या या अफाट ऊर्जेतून शक्तिपात होतो आहे. मेंदूला विलक्षण शिणवटा येत चालला आहे. आपणा साऱ्यांनाच क्षणोक्षणी हेलपटल्यासारखे होत आहे. जगण्याचे प्रश्न अधिक गहिरे आणि व्याकूळ होत आहेत. जग समजावून घेणे याला किती मर्यादा आहेत, हे आज कळू लागले आहे. या साऱ्या प्रक्रियेत आज खरोखर गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र प्रश्न उद्भवत आहेत. हे प्रश्न आपण जितके जागृत असू, तितके पडणार. जागृत असण्याकरता संवेदनशील असणे गरजेचे आहे. आजच्या प्रदूषणाच्या काळात आपण खरोखरच काय वाचतो, पाहतो, ऐकतो आणि अनुभवतो, यावर विचार करणारा माणूस अस्वस्थ होणारच. विचार करणारा, चिंतन करणारा माणूस हा नेहमीच अस्वस्थ असतो, व्याकूळ असतो. श्रेष्ठ कवी कबीर म्हणतात त्याप्रमाणे-

‘सुखीया सब संसार है
खाबे और सोये
दुखीया बास कबीर है
जागे और रोये’

कबीर म्हणतात त्याप्रमाणे जागृत असणाऱ्याचे दु:ख कधीच संपत नाही. पण प्रश्न असा आहे की, आपण जागे आहोत का? आपल्यात जागे राहायची ताकद आहे का? जागेपणी दिसणाऱ्या जगाला आणि प्रश्नांना सामोरे जायची आपली तयारी आहे का? डोळ्यावर पट्टी बांधून आपण परिस्थिती पाहायचे नाकारत आहोत का? आणि कानात ‘हेडफोन्स’ खुपसून आपण ऐकणेही बंद केले आहे का? एकमेकांवर हिंसक हल्ले करून आणि ओरबाडून नाजूक, तरल स्पर्शाला मूठमाती दिली आहे का? वास, सुवास आणि सहवासाची वासलात लावली आहे काय? बोलणारी जीभ सैल सोडून ती सर्वत्र संचार करणाऱ्या, आग ओकणाऱ्या उग्र ड्रॅगनप्रमाणे झाली आहे काय? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे दु:खदपणे ‘होय, असे होत आहे’ अशीच येतील. मग असे प्रश्न जर आत मनात आणि मेंदूत हालचाल करत असतील तर आपल्या कलेत नवे धुमारे फुटतील का? की असे प्रश्नच पडत नाहीत? त्यामुळेच तर आपली कला काळवंडत चाललेली नाही ना? आता व्यक्तीला मिठी मारायचे दिवस जाऊन रोबोला मिठी मारण्याचे दिवस येऊ घातले आहेत. पण हे जग मला पाहायचे नाही. मला जिवंत व्यक्ती हवी आहे. जिवंतपणाचा मुखवटा चढवलेले यंत्र मला नको आहे. बेचव शब्द आणि निर्थक हालचाली मला आणि आपल्याला अभिप्रेत नाहीत.

आपल्या बा हालचाली अर्थपूर्ण व्हायच्या असतील तर अंतर्गत हालचालीही अर्थपूर्ण व्हायला हव्यात. आपल्या चिंतनाचे विषय जेवढे खोल करत जाऊ तशा हालचालीही आवश्यक तेवढय़ा आणि तरल होतील. आपल्या साऱ्या शिक्षणात मोठी खोट आहे. कला आणि शास्त्रे एकमेकांपासून दूर आहेत. आपले सारे शिक्षण नोकरी लागण्याकरता आहे, असे प्रसिद्ध विचारवंत विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले होते. शिक्षण हे ज्ञानप्राप्तीकरता आहे. ही ज्ञानप्राप्ती आपल्याला जबाबदार, संवेदनशील, वैश्विक नागरिक बनवते, वगैरे विचार आपल्या शिक्षणातच नाहीत. कलाशाखाही तशाच आहेत. नाटकवाले आम्ही कधी सहज नृत्य, शिल्प, चित्र पाहणार नाही. भाषेचा अभ्यास करणार नाही. आम्ही अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान आदींपासून अलिप्त राहणार. खेळाडूंचेही तसेच असते. नृत्यकलेचेही तसेच नाही का? मला गेल्या तीस वर्षांत माझ्या नाटकांना नृत्य करणारे एक-दोन अपवाद वगळता कोणी आलेले आठवत नाही. नृत्य करणाऱ्यांना दुसऱ्या क्षेत्रांत काय प्रयोग चालले आहेत हे पाहायचे नाही का?

आपापले कप्पे करून किंवा बेटे करून आपण सुखी असतो. सुरुवातीला ज्या ‘मास्टर्स’ची नावे घेतली आहेत त्यांचा काळ हा तुलनेने शांत होता. पिढय़ानुपिढय़ांच्या अनुभवांतून आलेले शहाणपण आणि अपार निष्ठा यांच्या मिलाफातून उच्चांक गाठला गेला. यात काहीजण असेही होते, की ज्यांनी परंपरेविरुद्ध बंड केले. श्रेष्ठ नर्तिका चंद्रलेखा या त्यातल्या होत्या. आशीष खोकरांच्या एका लेखात याचा उल्लेख आहे. त्या बदलल्याच. आधुनिक काळाची मूल्यं आपल्या नृत्यात मुक्तपणे उमटावीत, हा मंत्र इझाडोरा डंकनने दिला. परंपरेची चौकट जाचक होऊ लागली. तेच ते पौराणिक आणि कृष्णलीलांचे विषय संदर्भहीन होऊ लागले. साठ-सत्तरच्या दशकांत सर्वच क्षेत्रांत वैचारिक क्रांती होत होती. जगभर साहित्य, नाटय़, सिनेमा, चित्रकला बदलू लागली. आजच्या माणसाच्या अस्तित्वाचे मूलभूत प्रश्न त्यातून प्रतिबिंबित होऊ लागले. दोन महायुद्धांनी ही जाणीव गडद केली. अशावेळी होणाऱ्या मंथनातून माणसे कलेचा पुनर्विचार करू लागली. बदलत्या काळाचे विषय वेगळे झाले. विषयातील आशय हालचालींचे अर्थ बदलवू लागला. आपल्या अंतर्गत आणि बा हालचालींवर काळाचा परिणाम होतोच.

आता पुढचा मुद्दा असा की, हालचालींवर परिणाम होतो आहे की नाही? माझ्या निरीक्षणानुसार, आतल्या हालचाली आणि बाहेरच्या हालचाली आता वेगळ्या होऊ लागल्या आहेत. एक रोगट अशी ही जाणीव आहे; पण ती सर्वाना जाणवते आहे. आपण आतून बुरसटलेले किंवा वैचारिक-बौद्धिकदृष्टय़ा मागास होत चाललो आहोत आणि बा स्तरावर आधुनिक. हा भ्रम, भास ‘स्क्रिझोफ्रेनिक’ स्थिती निर्माण करणारा आहे. आपण आतल्या आत विस्कटलेलो आहोत याचे दर्शन आता सर्वत्र होते. एक अनुभव सांगतो.

मी एका नावाजलेल्या नृत्यसंचाबरोबर नाटक करणार होतो. त्या संस्थेनेच मला बोलावले होते. सुरुवात नेहमीप्रमाणेच छान झाली होती. पण माझे त्यांच्याशी काही जुळेचना. एकतर मला आताच्या काळात गुरू-शिष्य परंपराच मान्य नाही. तसेच ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ ही भूमिकाच मला अमान्य आहे. सतत कानाला हात लावून छातीवर हात ठेवत गोड हसणे मला नकोसेच वाटते. तुम्ही एकदा का ग्रंथ, व्यक्ती अथवा शब्द प्रामाण्य मानलेत की चर्चा संभवतच नाही. प्रश्न करायचा नाही. का, म्हणून विचारायचे नाही. इथल्या घराणेशाहीविरोधात कुमार गंधर्वासारख्या लोकांनी बंड केले म्हणून ते संगीत अधिक उंचीवर पोहोचले. निरांजने लावून परंपरा आहे तिथेच राहते आणि काही दिवसांनी सडते. परंपरेला निर्भीडपणे प्रश्न विचारणे म्हणजे बंडखोरी. पण ती केली तर परंपरा संपत नाही, उलट वाढते, हे आपल्या बहुतेकांच्या गावीच नसते. तसेच ही परंपरा न मानणे याचा अर्थ आदर नसणे असाही नाही.

तर मी त्या नृत्यगटाशी गप्पांमधून सारे समजावून घेत होतो. नाटक करण्याकरता मी एका नíतकेचे अत्यंत वेगळे आणि बंडखोर आत्मचरित्र निवडले. त्यातून मी तिचा शोध घेऊ इच्छित होतो. लहानपणी लैंगिक अत्याचाराला सामोरी गेलेली आणि मुक्त लैंगिक नातेसंबंध जपणारी ही स्त्री माझ्या चिंतनाचा विषय होता. त्यावर तिच्या धक्कादायक, विचक्षण आयुष्याची गोष्ट उभी होती. ती मी नृत्यातून मांडायचे ठरवले. वाचने सुरू झाली. मी संहिता तयार केली. त्यातील बहुतेक मुलींना विषय जडच वाटत होता. जड म्हणजे ‘असे विषय बोला कशाला? रंगभूमीचे आणि नृत्याचे पावित्र्य’ वगैरे बोलणे व्हायचे. पण मी त्यांना विषय हळुवारपणे समजावून देत होतो. त्यातून आम्ही वेगवेगळे व्यायामप्रकार करून पाहू लागलो. माझ्या लक्षात आले की, या नव्या मुलींना ‘लिंगभाव’, ‘लैंगिक’, ‘लैंगिकता’ अशाविषयी बोलते केले पाहिजे. पण या साऱ्या संकल्पनांविषयी त्या अनभिज्ञच होत्या. मग मी एक कार्यशाळा घ्यायचे ठरवले. त्यात ‘शरीररचना’ म्हणजे ‘बॉडी अ‍ॅनॉटॉमी’विषयक सत्र झाले. त्यांना मासिक पाळीबद्दलचे समज-गैरसमज, गर्भधारणा वगैरेविषयीची शास्त्रीय माहिती शून्यच होती. शहरातील शिकलेल्या, तथाकथित ‘मॉडर्न’ मुलींची ही स्थिती होती. असे विषय बोलता बोलता ‘तुम्हाला आयुष्यात आलेला काळाकुट्ट अनुभव’ नाव न घालता लिहा, असे सांगितले. तर काय? आमच्या लेखिकेपेक्षा भयाण अनुभव लिहिलेले कागद आमच्यापुढे आले. आता हे भयाण अनुभव नृत्यातून का मांडायचे नाहीत, असा प्रश्न मी त्यांना केला. जे त्या बाईच्या आयुष्यात घडते ते कोणाच्याही आयुष्यात घडते, हेच यावरून सिद्ध होत होते. हे साऱ्यांना पटलेही. पण जसजसे दिवस उलटले तसतशी मुलींची गळती सुरू झाली. अनेकींनी ‘आई-बाबांना हे बघवणार नाही,’ असे सांगितले. तर कोणी ‘डोक्याला त्रास होतोय,’ असे सांगितले. प्रत्यक्ष आयुष्यात या मुली महानगरीय ‘आधुनिक’ होत्या. मोबाइलधारक होत्या. मात्र ‘या’ विषयावरील नृत्यनाटय़ म्हणताच त्या ‘मिडीऑकर’, ‘पारंपरिक’ व्हायच्या. हे त्यांचे असे रूपांतरीत होणे मला अस्वस्थ करायचे. आयुष्य आणि नृत्य त्या साऱ्यांनी वेगळेच मानलेले होते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नृत्य नव्हते. आणि नृत्यात आयुष्य उमटत नव्हते.

तर सरतेशेवटी शिक्षिका नर्तिकाच उरली. तिने आणि मी तरीही धीर सोडलेला नव्हता. पण एक दिवस चक्क लेखिकेच्या मुलीनेच आम्हाला परवानगी नाकारली. तिला अशी ‘वेगळी’ आई बघायची नव्हती. तिच्याही मनात ‘एक्स्ट्राव्हॅगॅन्झा’ आणि देवीचा आशीर्वाद असलेलीच तिची आई होती. तिला तिच्या आईला ‘माणूस’ म्हणून पाहायचे नव्हते. आणि मला ते पाहायचे होते. यानिमित्ताने मी स्त्रीवादी, सामाजिक पातळीवरील लैंगिक समस्या, स्त्री-पुरुष नातेसंबंधातील राजकारण, बाललैंगिक शोषण असे प्रश्न पाहत होतो. हे मी काही बाहेरून लादत नव्हतो, तर ते मुळातच होते. पण जे क्लासच्या नर्तिकांचे झाले, तेच लेखिकेच्या मुलीच्या बाबतीतही झाले. स्त्रीला देवी, आदिशक्ती किंवा थेट गणिका दाखवल्याशिवाय चालत नाही. आजच्या स्त्रीचे दु:ख अथवा आनंद सीता, द्रौपदी, कुंती, गांधारीद्वारे कसे दाखवणार? आजच्या प्रश्नांचा पोत वेगळा आहे की नाही? तसेच कृष्ण, राम, रावण, हनुमान या व्यक्तिरेखांद्वारे आजच्या पुरुषांचे जग तरी कसे मांडणार? बदललेल्या जगाचा आपल्यावर जर परिणाम होतो, तर कलेवर व्हायला हवा की नको? असो. पण माझे नाटक तिथेच थांबले.

हा प्रसंग मुद्दाम सांगितला. यातून मला एका क्षेत्राचे दर्शन झाले. माझ्या नाटय़कलेतही असे बुरसटलेले विचार आहेतच. आजचे सारे आधुनिकोत्तर काळाचे फायदे घेताना आत मनात आणि बुद्धीत मात्र मागासलेपण फार आहे. हे वैचारिक आणि बौद्धिक मागसलेपण रंगमंचावर ‘क्षण’ निर्माण नाही करू शकत. आजच्या काळात आपण ‘त्या’ परंपरेचे श्रद्धावान पाईक नसतो, आणि नव्या काळाची आव्हानेही आपल्याला पेलायची नाहीत- अशा द्वंद्वात आपल्या कला अडकलेल्या असतात. अशा ‘ना अरत्र, ना परत्र’ अवस्थेत नवसर्जन होऊ शकत नाही. ‘मिडलक्लास अ‍ॅन्ड मिडीऑकर सेन्सिबिलिटी’ असेच सारे चित्र दिसते. शारीरिक हालचालींबरोबरच मेंदूची हालचाल व्हावी असे विषय अभ्यासक्रमात असायला पाहिजेत. शरीर जितके लवचीक करण्यावर भर असतो, तितकाच भर बौद्धिक क्षमतावाढीवर दिला पाहिजे. ‘आडात नसेल तर पोहोऱ्यात कुठून येणार?’ ही म्हण महत्त्वाची आहे. बौद्धिक हालचाली करण्यास मेंदू तयार नसेल तर तो हालचालींवर बंधने आणणारच. साहजिकच त्या हालचाली संकुचित आणि संदर्भहीनच होणार. पोहोरे रिकामेच राहणार. वैचारिक अभ्यासाचा आळस आपली कला उन्नत करू शकणार नाही. ‘क्षण’ तयार होऊ शकणार नाहीत. चिंतनापासून आपण दूर जाऊ. एकांत लाभणार नाही. व्यक्ती अंतर्मुख होणार नाही.

कुठलीही कला हे ते त्या कलाकाराचे ‘विधान’ असते.. ‘Statement’ असते. तुम्ही म्हणा किंवा म्हणू नका- तुमची कलाकृती काहीतरी ‘राजकीय विधान’ करतच असते. राजकारण, समाजकारण यांविषयी आपल्या मनामध्ये फार गोंधळ आहेत. कलाकार हा कलेतून राजकारणच करत असतो. ते राजकारण आणि पक्षीय राजकारण यांत आपण गल्लत करू नये. इझाडोरा डंकन ही ‘Freedom’ने झपाटलेली होती. ‘स्वातंत्र्य’ नावाचे मूल्य तिच्या नृत्यातून आवेगपूर्णरीत्या अभिव्यक्त होत होते. आजच्या आजूबाजूच्या भयानक परिस्थितीचे वर्णन कविता, कादंबरी, चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकलेतून येत असताना नृत्यकला त्यापासून दूर कशी काय राहू शकते? एखाद् दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्रातील गेल्या तीस वर्षांविषयीचे हे निरीक्षण आहे. त्यामुळे रंगमंचावरील हालचाली या माझ्याशी काही संवादच साधत नाहीत. मी ‘डिसकनेक्ट’ होतो. त्या हालचालींना ‘कॉन्टेपररी रेलेव्हन्स’ येत नाही. समकालीनता येत नाही. एक गोष्ट स्पष्ट करतो, की नाटकात जशी राजकारणी व्यक्ती आल्याने नाटक राजकीय होत नाही, तसेच उद्या निर्भया प्रकरणावर नृत्य करून ते नृत्य शोषणाविरुद्ध उभे ठाकलेले स्त्रीवादी होईलच असेही नाही.

हालचाल दोन प्रकारची असते. एक मनाच्या गाभ्यात किंवा मेंदूत सुरू असते. दुसरी शरीराच्या बा स्तरावर चालते. मनात चिंतन होते. वैचारिक घुसळण होते. बौद्धिक हालचाल होते. ती मग ‘शरीर’ या माध्यमाद्वारे प्रकट होऊ लागते. इथे परत तुकाराम महाराज आठवतात. ते म्हणतात- ‘आंतरिचे धावे स्वभावे बाहेरी..’ जे आत चालले आहे ते आपोआपच बाहेर प्रकट होते. आतली हालचाल सकस व्हावी, त्या हालचालीचा पोत हा सृजनशील मातीसारखा असावा याकरिता शेतकरी जसा जमिनीचा कस वाढावा म्हणून प्रयत्न करतो, तसे आपल्याला करायला हवे. वाद्याचा नाद हा त्याच्या ‘मटेरिअल’च्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. तबल्याचे लाकूड, चामडे आणि वीण यावर ध्वनीची ‘क्वालिटी’ तयार होते. तर कलाकाराने बौद्धिक श्रम जास्त केले पाहिजेत. यामुळे तो ज्या प्रकट हालचाली करेल त्या अधिक अर्थपूर्ण, सकारण, सहेतू आणि सघन असतील.

कुठल्याही कलेतली आवश्यक बाब म्हणजे फक्त आणि फक्त व्यक्तीची सघनता हीच होय. सारे काही सूक्ष्मात असते, स्थूलात नसते, हेच खरे. आपले असे सर्वबुद्धीशक्तीनिशी तिथे असण्याचे होण्यात आपत: रूपांतर होईल. इतर साधनांची मदत न घेताही केवळ आणि केवळ शरीराच्या संपूर्ण असण्यावरच कला तरल होईल. आतल्या आणि बाहेरच्या हालचालींची ‘मी-तूपणाची बोळवण’ होईल. ा

(नृत्यकलेसंदर्भातील एका चर्चासत्रात एकूणच सर्जनशीलतेसंबंधी केलेले मुक्त चिंतन)
अतुल पेठे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:13 am

Web Title: dance 10
Next Stories
1 कोंड
2 देशोदेशीचे ट्रम्प : (ब्राझील) बोल्सोनारो झाले बेताल!
3 इटली : मात्तिओ सॅल्विनी..  दे धडक!
Just Now!
X