21 January 2021

News Flash

सजनवा बैरी हो गये हमार…

शैलेंद्र केवळ मागणीनुसार गीते लिहून देणारा गीतकार नव्हता.

गीतकार आणि कवी शैलेंद्र

फणिश्वरनाथ रेणू यांच्या ‘पांच लंबी कहानियां’ या कथासंग्रहातील ‘मारे गये गुलफाम’ या कथेने हिंदी चित्रसृष्टीतील गीतकार आणि कवी शैलेंद्र यांना अक्षरश: झपाटून टाकलं होतं. या कथेवर चित्रपट करायचा- आणि तोही आपणच, असा निर्धारच त्यांनी केला होता. व्यावसायिक हिंदी चित्रपटांसाठी आयुष्यभर लेखणी झिजवणाऱ्या कवी शैलेंद्रना हा चित्रपट मात्र कलात्मकरीत्या बनवायचा होता. त्यात कोणतीही तडजोड त्यांना मान्य नव्हती. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी आपले मित्र बासू भट्टाचार्य यांना गळ घातली. राज कपूर आणि वहिदा रेहमान यांना घेऊन ‘तीसरी कसम’ चित्रपटाची निर्मिती करत असताना त्यादरम्यान आलेल्या नाना अडचणींनी निर्माता शैलेंद्र यांच्या आयुष्याचीच कशी पुरती वाताहत झाली, याची मन पिळवटून टाकणारी कहाणी.. ‘तीसरी कसम’च्या पन्नाशीनिमित्ताने!

(१)

२३ ऑक्टोबर १९६०

कवी शैलेंद्र मुंबईच्या खार या उपनगरातील आपल्या ‘रिमझिम’ बंगल्याच्या अभ्यासिकेत बसला होता. त्याच्या हातात फणिश्वरनाथ रेणू यांचे ‘पांच लंबी कहानियां’ हे पुस्तक होते. नुकतीच त्याने या पुस्तकातील ‘मारे गये गुलफाम’ ही कथा दुसऱ्यांदा वाचली होती. कालच त्याचा तरुण मित्र बासू भट्टाचार्य याने त्याला हे पुस्तक वाचण्यासाठी दिले होते. घरी येताच रात्री त्याने ते वाचावयास घेतले. एक भोळाभाबडा गाडीवान हिरामन आणि नौटंकीत नाच करणारी गणिका हिराबाई यांच्या अस्फुट प्रेमाची ही विफल कहाणी वाचताना त्याचे डोळे अनेकदा पाणावले होते.. मन भारावले होते.. ओझावून गेले होते. या दोघांच्या प्रेमाची आणि चिरवियोगाची ही कहाणी त्याला विषण्ण करून गेली होती. आज पुन्हा एकदा ती कहाणी वाचताना त्याला पुन्हा तोच अनुभव आला. त्याने पुस्तक मिटून ठेवले आणि त्याचे मन त्या कहाणीतील पात्रांबरोबर फिरू लागले.

हिराबाई हिरामनला म्हणाली होती-

‘‘तुम तो उस्ताद हो मीता.’’

‘‘इस्स्!’’

भोळाभाबडा हिरामन शैलेंद्रला आपलाही मीत वाटला होता.

आपल्या गाडीत बसलेल्या सवारीच्या चेहऱ्यावर चंद्रप्रकाशाचा एक तुकडा पडल्यावर आश्चर्याने हिरामन उद्गारला होता-

‘‘अरे बाप! ई तो परी है!’’

आणि आपल्या ‘फेनुगिलासी’ आवाजात ती हिरामनला म्हणाली होती-

‘‘भय्या, तुम्हारा नाम क्या है?’’

‘‘मेरा नाम है हिरामन.’’

‘‘तब तो मैं मीता कहूंगी. मेरा नाम भी हिरा है.’’

‘‘इस्स्! मर्द और औरत के नाम में फरक होता है.’’

‘‘हां. मेरा नाम हिराबाई है.’’

कुठे हिरामन, कुठे हिराबाई! शैलेंद्रला वाटले- खरेच, फार फरक आहे..

हा फरक हिराबाईला कळला आहे. म्हणून तर तिने त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. जाताना ती त्याला म्हणाली,

‘‘तुम्हारा जी बहुत छोटा हो गया है, क्यौं मीता? महुवा घटवारीन को सौदागर ने जो खरीद लिया है, गुरु जी.’’

‘‘अहा.. मारो मत.’’ हिरामनने बैलांवर चाबूक उगारताच हिराबाई त्याला म्हणाली होती. आज हिराबाई त्याला सोडून कायमची निघून गेली आहे. जाताना आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवीत ती म्हणाली होती,

‘‘जी छोटा मत करो मीता..’’

‘‘जी छोटा कैसे न करे?’’ मनातली सारी चीड हिरामन बैलांवर काढू पाहतो. त्यांना मारण्यासाठी हात उगारतो आणि पुन्हा तो कोमल, मंदिरातल्या घंटेसारखा मधुर आवाज त्याच्या कानावर येतो-

‘‘अहा.. मारो मत..’’

त्याचा हात आपोआप खाली येतो. हा आवाज कोठून आला? हिरामनला प्रश्न पडला. हिराबाई तर दूर निघून गेली आहे. की हा आवाज आपल्याच मनाच्या तळातून आला आहे? हा आवाज आयुष्यभर आपला पाठलाग करीत राहणार आहे का?

हा आवाज कोठून आला? शैलेंद्रलाही प्रश्न पडला. रेणूंच्या कथेतील हिरामनला तर असा काही भास झाला नव्हता.

शैलेंद्रला वाटले, हा आवाज आपल्याच मनातून आला आहे. या दोघांशी आपले जन्म-जन्मांतरीचे नाते जुळले आहे. ही कहाणीही या आवाजासारखा आपला असाच पाठलाग करणार आहे. डोळे मिटून तो त्या कहाणीचा विचार करू लागला. एकामागोमाग एक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून सरकू लागले आणि एका क्षणी त्याला वाटले, या कहाणीवर एक अप्रतिम चित्रपट निर्माण होऊ  शकेल!

एका सप्तरंगी स्वप्नाचा उदय त्याच्या मनात झाला होता. पाहता पाहता या स्वप्नाने त्याचा ताबा घेतला. क्षणापूर्वीचा शैलेंद्र आता राहिला नव्हता. या नव्या शैलेंद्रच्या आयुष्यात आता फक्त एकच इच्छा उरली होती. अंधूक दिसलेल्या त्या स्वप्नाचा पाठपुरावा करायचा.. ते प्रत्यक्षात आणायचे. मग त्यासाठी ऊर फुटेपर्यंत धावावे लागले तरी चालेल. पण समोर क्षणकाल दिसलेला तो मृग होता की कांचनमृग?

या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मात्र खूप अवधी लागणार होता..

तसे सिनेमाचे क्षेत्र त्याला नवे नव्हते. गेल्या बारा वर्षांपासून तो याच क्षेत्रात तर वावरत होता! अनेक चित्रपट आपल्या नजरेसमोर आकारास येताना त्याने पाहिले होते. त्यांची निर्मितीप्रक्रिया न्याहाळली होती. प्राथमिक अवस्थेत का होईना, तिच्यात भाग घेतला होता. एखादी कहाणी ऐकता ऐकता त्याच्या मनात ती पात्रे येऊन बसत. आपल्या भावना शब्दांतून मांडण्यासाठी त्याच्याकडे शब्द मागत. कथा आणि गीते यांचे 07-ls-diwali-2016-lyrics-shailendraएक अजब संयुग त्याच्या मनात तयार होई. आणि लोक म्हणत, शैलेंद्रने किती समर्पक गीते लिहिली आहेत!

याचे कारण शैलेंद्र केवळ मागणीनुसार गीते लिहून देणारा गीतकार नव्हता. ज्या पात्रांच्या तोंडी आपली गीते असणार आहेत, त्या पात्रांचे अंतरंग तो जाणून घेई. त्यासाठी पटकथा पुन:पुन्हा वाचे. दिग्दर्शकाशी, संगीतकाराशी चर्चा करी. त्याच्या सुदैवाने राज कपूर, बिमल रॉय, अमिया चक्रवर्ती, हृषिकेश मुखर्जी, विजय आनंद अशा उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. त्यांचे काम त्याने जवळून आणि बारकाईने पाहिले होते. चित्रपट तयार होण्याची प्रक्रिया न्याहाळली होती. त्यामुळेच या कहाणीवर विचार करतानाच त्याच्या डोळ्यासमोर भावी चित्रपटातील अनेक दृश्ये तरळू लागली होती.

पण गंमत म्हणजे प्रारंभीच्या काळात शैलेंद्रच्या मनात याच सिनेक्षेत्रात यायची मुळीच इच्छा नव्हती. शैलेंद्र त्यावेळी मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करायचा. कवी होता. ‘मशीनांच्या तानपुऱ्या’वर तो गीते लिहायचा. कामगारांच्या सुखदु:खांचे वर्णन करणारी त्याची गीते कामगारांमध्ये लोकप्रिय होऊ लागली होती.

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. मात्र, हा आनंद निर्भेळ नव्हता. देशाच्या फाळणीचे जहर या आनंदात कालवले गेले होते. निरपराध लोक हजारोंच्या संख्येने मारले जात होते. पंजाब जळू लागला होता. या साऱ्या घटनांचा शैलेंद्रच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. त्याच्या गीतांतून या परिस्थितीचे प्रतिध्वनी उमटू लागले-

‘जलता है, जलता है पंजाब हमारा प्यारा

जलता है, जलता है, भगतसिंग की आंखों का तारा’

पाकव्याप्त पंजाबमधून.. पाकिस्तानमधून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ  लागले. मुंबईत या निर्वासितांच्या मदतीसाठी एक मोर्चा काढण्यात आला. या मिरवणुकीत चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सामील झाले होते. शैलेंद्रने याप्रसंगी आपले ‘जलता है पंजाब’ हे गीत गायिले. एका दिवसात हे गीत असंख्य लोकांच्या हृदयात शिरून बसले. शैलेंद्र लोककवी होण्यास सुरुवात झाली होती.

याच सुमारास ‘इप्टा’ने मुंबईत एका कविसंमेलनाचे आयोजन केले. या संमेलनात अनेक नामवंत आणि नवोदित कवींना आमंत्रित करण्यात आले होते. या कवींत तरुण गीतकार शैलेंद्रदेखील होता. अनेक कवींनी आपली गीते सादर केली. शैलेंद्रची पाळी आल्यानंतर तो माइकजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने खडय़ा आवाजात ‘जलता है पंजाब साथियो..’ म्हणण्यास सुरुवात केली. सारा जनसमुदाय एकाग्रतेने हे गीत ऐकत होता. या गीतानंतर टाळ्यांचा जो कडकडाट झाला तो अभूतपूर्व होता.

त्या दिवशी हे कविसंमेलन ऐकण्यासाठी जे श्रोते आले होते त्यांत चोवीस वर्षांचा, गोरापान, निळ्याशार डोळ्यांचा एक तरुणही होता. त्याचे नाव राज कपूर होते. नामांकित अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा हा मुलगा. चित्रपटसृष्टीत काही भव्यदिव्य करण्याच्या स्वप्नाने तो झपाटलेला होता. तो स्वत: उत्तम कलाकार होताच; पण कलेचा तितकाच पारखीदेखील होता. एकीकडे वडिलांच्या पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असताना तो त्याचा पहिला चित्रपट ‘आग’ चित्रित करण्याच्या कामात व्यस्त होता. या सिनेमाच्या क्लायमेक्ससाठी त्याला एक गीत हवे होते. ‘जलता है पंजाब’ गाणाऱ्या कवीमध्ये त्याला आपल्या चित्रपटाचा भावी गीतकार दिसला. त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळले की, या तरुणाचे नाव शंकर सिंह शैलेंद्र असून तो रेल्वेमध्ये वेल्डर म्हणून काम करतो आणि परळ येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये राहतो. राज कपूर त्याला भेटायला गेला.

राज कपूरची भेट शैलेंद्रसाठी अत्यंत अनपेक्षित होती. एक चित्रपट निर्माता आपल्याकडे सिनेमाची गाणी लिहिण्याचा प्रस्ताव घेऊन येईल, ही कल्पनाच त्याच्या मनात कधी आली नव्हती. त्यामुळे जेव्हा राजने त्याच्यासमोर आपला प्रस्ताव मांडला आणि त्यासाठी उत्तम मानधन देण्याची तयारीही दर्शवली, तेव्हा क्षणभर तो आश्चर्यचकितच झाला. मात्र, दुसऱ्याच क्षणी त्याने राजला स्पष्ट सांगितले,

‘‘मैं पैसे के लिए नहीं लिखता. कोई ऐसी बात नहीं है, जो मुझे आप की फिल्म में गाना लिखने के लिए प्रेरणा दे. मै क्यूं लिखू?’’

त्या दिवशी तर शैलेंद्रने राजला परत पाठवले; पण नंतर अशा काही घटना घडत गेल्या, की आपल्याच मस्तीत, आपल्याच तत्त्वाने जगणाऱ्या या कलावंतावर सारा मानापमान गिळून एका परक्या व्यक्तीच्या दारी काही मागणे घेऊन जाण्याची पाळी आली. पण शैलेंद्रने मन कठोर केले व तो राज कपूरच्या कार्यालयात जाऊन पोहोचला. तेथील शिपायाला त्याने सांगितले, ‘‘मी शैलेंद्र. राजसाहेबांना मला भेटायचे आहे.’’

राज त्यावेळी ‘बरसात’ या त्याच्या नव्या चित्रपटाच्या निर्मितीत गुंतलेला होता. शिपायाने निरोप दिल्यावर राजही क्षणभर आश्चर्यचकित झाला. त्याने या कवीला सन्मानाने बोलावून घेतले. शैलेंद्रला आडवळणाने बोलता येत नव्हतेच. ऑफिसमध्ये गेल्यावर तो स्पष्टपणे म्हणाला,

‘‘मी कवी शैलेंद्र. आपण एकदा माझ्याकडे आला होता..’’

‘‘होय. माझ्या ध्यानात आहे.’’ राज म्हणाला.

‘‘मला पैशांची अत्यंत गरज आहे. मला पाचशे रुपये हवेत. ते द्या- आणि माझ्याकडून काम करून घ्या.’’

एका क्षणाचाही विलंब न करता राज म्हणाला, ‘‘ठीक. मी तुम्हाला पैसे देतो. तुमची गरज भागवा. कामाबद्दल आपण नंतर बोलू.’’

शैलेंद्रच्या आयुष्याला वेगळे वळण लागले ते या क्षणी. कारण राज सहज म्हणू शकला असता की, ‘एकदा तुम्ही मला नकार दिला होता. आज मी तुम्हाला नकार देतो!’ पण राजने या तरुण कवीमधील सुप्त गुण ओळखले होते. हा कवी त्याला आवडला होता आणि तो त्याला हवा होता. राजने त्याला मागितलेली रक्कम दिली आणि आपल्यात सामावून घेतले. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासाला नवे वळण लावणारा हा दिवस होता.

‘बरसात’ गाजला. त्याचे संगीत आणि गीते प्रचंड लोकप्रिय झाली. आणि शैलेंद्रला स्वत:चा रस्ता सापडला.

‘निकल पडे है खुल्ली सडक पर अपना सीना ताने..

हम सिंहासन पर जा बैठे जब जब करे इरादे..’

पाहता पाहता शैलेंद्र रसिकांच्या मनाच्या सिंहासनावर जाऊन बसला. हिंदी सिनेमातला आघाडीचा कवी बनला. ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘सीमा’, ‘दो बिघा जमीन’, ‘जागते रहो’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘अनाडी’ अशा दर्जेदार चित्रपटांसाठी त्याने नुसती गीतेच लिहिली नाहीत, तर या चित्रपटांची मौलिकता आणि लोकप्रियता वाढविण्यात त्याचा फार मोठा वाटा होता.

..आणि आज या मायानगरीत येऊन एक तप झाल्यावर आपला चित्रपट काढावा असे स्वप्न त्याच्या मनात निर्माण झाले होते. त्या विचाराने तो झपाटून गेला. एका तिरमिरीतच तो उठला आणि त्याने फणिश्वरनाथ रेणू यांना पत्र लिहिले-

‘प्रिय बंधूवर फणिश्वरनाथ,

सप्रेम नमस्कार. ‘पांच लंबी कहानियां’ पढी. आपकी कहानी मुझे बहोत पसंद आई. फिल्म के लिए उसका उपयोग कर लेने की अच्छी संभावनाए है. आपका क्या विचार है? कहानी में मेरी व्यक्तिगत रूप से दिलचस्पी है.

इस संबंध में यदि लिखे तो कृपा होगी. धन्यवाद.

आपका-

शैलेंद्र

(२)

रेणूंना पत्र लिहिले आणि शैलेंद्र आतुरतेने त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागला. रेणूंची ‘मैला आंचल’ ही कादंबरी त्याने वाचली होती आणि ते त्याचे आवडते लेखक बनले होते. त्यांच्या कथा वाचताना तर ते आपल्याच गोत्रातील आहेत असे त्याला वाटत होते. त्याला विश्वास होता, की रेणू आपल्या प्रस्तावाला होकार देतीलच.

काही दिवसांनी रेणूंचे पत्र आले. एक मनस्वी कवी म्हणून ते शैलेंद्रला ओळखत होते. असा कलावंत आपल्या कथेवर चित्रपट काढू इच्छितो आहे हे पाहून त्यांना आनंदच झाला होता. त्यांनी ‘मारे गये गुलफाम’ या कथेवर चित्रपट काढण्याची शैलेंद्रला परवानगी दिली.

शैलेंद्रला अतिशय आनंद झाला. आता त्याने गंभीरपणे चित्रपटाच्या निर्मितीसंबंधी विचार करण्यास सुरुवात केली. कथा जशी आहे तशीच त्याला पडद्यावर साकार करावयाची होती. तिच्यात कसलाही मालमसाला नको होता. व्यवसायासाठी कथेची मोडतोड केल्यामुळे अनेक कथांचे वाटोळे झाले होते हे त्याला ठाऊक होते. ज्या शुद्ध स्वरूपात त्याच्या मनाच्या पडद्यावर ही कथा त्याला दिसत होती, त्याच स्वरूपात ती लोकांसमोर यायला हवी होती. यात तडजोड नाही, हे त्याने सुरुवातीलाच ठरवले होते. यासाठी दिग्दर्शक म्हणून एखादा प्रतिष्ठित, मान्यवर दिग्दर्शक त्याला नको होता. त्याच्या नजरेसमोर अनेक नावे तरळली. त्यापैकी एक नाव बासू भट्टाचार्य याचे होते.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून बासूची आणि शैलेंद्रची घनिष्ठ मैत्री होती. शैलेंद्र ज्यावेळी बिमल रॉय निर्माण करीत असलेल्या ‘मधुमती’ची गीते लिहीत होता, त्यावेळी बासू भट्टाचार्य हा पंचविशीतला तरुण बिमल रॉय यांचा असिस्टंट म्हणून काम पाहत होता. बासू आणि बिमलदा यांची मुलगी रिंकी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, बिमलदांना त्यांचे प्रेम मान्य नव्हते. शेवटी रिंकी बिमलदांच्या घरून पळून गेली आणि तिने व बासूने लग्न केले. यासाठी शैलेंद्रने त्यांना खूप मदत केली. आणि या कारणे त्याला बिमलदांचा रोषही सहन करावा लागला. या काही दिवसांत बासू व शैलेंद्र एकमेकांच्या खूप जवळ आले. बासूमध्ये एक उत्तम दिग्दर्शक दडला आहे हे शैलेंद्रच्या ध्यानात आले होते. त्याने बासूला ‘मारे गये गुलफाम’वरील चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी विचारले. बासूच्या दृष्टीने ही फार मोठी संधी होती. तो आनंदाने तयार झाला.

आता शैलेंद्रसमोर प्रश्न होता तो पात्रनिवडीचा. हिरामनच्या भूमिकेसाठी त्याला एखादा गाजलेला, लोकप्रिय नट नको होता. त्याच्या डोळ्यासमोर हास्य- अभिनेता महमूद याचे नाव आले. विनोदी भूमिकांत गुंतून पडलेला असला, तरी हा एक अस्सल अभिनेता आहे हे शैलेंद्रने ओळखले होते. नुकतीच त्याने महमूदच्या ‘छोटे नवाब’ या सिनेमाची गीते लिहिली होती आणि महमूदशी त्याचा जवळून परिचय झाला होता. पण महमूदच्या नशिबात ही भूमिका नव्हती.

एके दिवशी ‘संगम’ या आगामी चित्रपटातील गाण्यांबद्दल शैलेंद्र राज कपूरशी चर्चा करीत होता. बोलता बोलता त्याने राजला सांगितले, ‘‘मी नुकतीच एक अतिशय अप्रतिम कहाणी वाचली आहे आणि तिच्यावर चित्रपट निर्माण करण्याची माझी इच्छा आहे.’’

राजने त्याला ती कहाणी सांगण्याची विनंती केली. शैलेंद्रने जेव्हा त्याच्या भावपूर्ण आवाजात ‘मारे गये गुलफाम’ ही कथा सांगितली तेव्हा राज भारावून गेला. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘‘कविराज, काय कहाणी आहे! मी या सिनेमात हिरामनची भूमिका करायला तयार आहे.’’

शैलेंद्र आश्चर्यचकित झाला. राजमधील अद्भुत अभिनयक्षमता त्याला माहीत होती. हिरामनचा साधा, सरळ, भोळाभाबडा स्वभाव, मनाचा हळवेपणा, स्वप्नं पाहण्याची त्याची वृत्ती आणि जगण्यातील उत्कटता ही राजच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळतीजुळती आहे असे शैलेंद्रला जाणवले. राजची पडद्यावरील इमेजदेखील अशीच होती. या भूमिकेला कारुण्याची एक खोल बैठक होती आणि राज ती अभिनयातून प्रकट करू शकेल याचीही खात्री शैलेंद्रला होती. अडचण ही होती की, राज हा हिंदी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होता. त्याचा दर शैलेंद्रला परवडणारा नव्हता. शैलेंद्रच्या मनात हा चित्रपट कृष्ण-धवल रंगात आणि अतिशय कमी खर्चात काढावा असे होते. मात्र, राजला तो नाही म्हणू शकत नव्हता. राजमुळे आपण या क्षेत्रात आलो, आपल्याला नवा जन्म मिळाला, ही कृतज्ञतेची भावना त्याच्या मनात होती. शैलेंद्र पेचात पडला.

राज शैलेंद्रला म्हणाला, ‘‘मी या चित्रपटात काम करीन. पण माझा मेहनताना तुला अ‍ॅडव्हान्स द्यावा लागेल. आणि तोही संपूर्ण!’’

शैलेंद्रच्या मुद्रेवरील भाव बदलले. राजला आपल्या या प्रिय मित्राचा स्वभाव माहीत होता. त्याला फार काळ संभ्रमात न ठेवता राज म्हणाला, ‘‘माझा मेहनताना असेल.. एक रुपया! काढ एक रुपया!’’

नायक कोण असणार, हे त्या क्षणी नक्की झाले.

नायिकेच्या भूमिकेसाठी शैलेंद्रेच्या नजरेसमोर नूतन होती. मात्र, तिचे नुकतेच रजनीश बहलशी लग्न झाले होते व तिने चित्रपट संन्यास घेण्याचे ठरवले होते. यानंतर शैलेंद्रच्या डोळ्यासमोर वहिदा रेहमान आली. वहिदाचा ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ या चित्रपटांतील प्रभावी अभिनय शैलेंद्रने पाहिला होता आणि तो त्याला अतिशय आवडला होता. पण त्याने जेव्हा हा प्रस्ताव तिच्यासमोर मांडला, तेव्हा तिने चक्क नकार दिला. तिने शैलेंद्रला सांगितले, ‘‘गुरूदत्त एका नव्या सिनेमाची तयारी करीत आहेत आणि मी त्यात काम करणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी माझ्याजवळ तारखा नाहीत.’’

पण शैलेंद्रला आता हिराबाईच्या भूमिकेत फक्त वहिदा दिसत होती. त्याने सरळ गुरूदत्तला याबद्दल विचारले. गुरूने वहिदाला सांगितले, ‘‘शैलेंद्र फार चांगला माणूस आहे. तू त्याच्याशी खोटे का बोललीस?’’

मग वहिदाला हिराबाईची भूमिका स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही.

शैलेंद्रने दिग्दर्शनाची जबाबदारी जरी बासूवर टाकली असली तरी या सिनेमाच्या रूपाबद्दल त्याच्या मनात काही निश्चित कल्पना होत्या. हा कवीचा सिनेमा असल्यामुळे गीत, संगीत हा त्याचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असणार होताच; परंतु केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन म्हणून तो चित्रपटात गाणी टाकणार नव्हता. या सिनेमासाठी कथेत विरघळून जाणारी अप्रतिम गाणी त्याला लिहावयाची होती. हिरामनची व्यक्तिरेखा स्पष्ट करणाऱ्या गीताचा ‘सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है..’ असा मुखडाही त्याच्या मनात तयार होता. मात्र, हिंदी चित्रपटात प्रेक्षकांचा अनुनय करण्यासाठी जो मसाला टाकला जातो तो त्याच्या चित्रपटात असणार नव्हता. ‘आर्ट फिल्म’ ही संकल्पना हिंदी सिनेमात खूप नंतर आली; पण शैलेंद्रच्या मनातील विचार त्या दिशेनेच धावणारे होते, हे निश्चित. आपला चित्रपट आपल्या मनासारखा व्हावा यासाठी शैलेंद्रने आणखी एक निर्णय घेतला. चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी सरळ फणिश्वरनाथ रेणू यांनाच बोलवायचे.

शैलेंद्रचा हा विचार रेणू यांनाही पटला. आवडला. कोणताही लेखक जेव्हा सिनेमासाठी आपली कथा देतो तेव्हा आता निर्माते-दिग्दर्शक आपल्या कथेचे काय करतील अशी एक धास्ती त्याच्या मनात असते. अनेक साहित्यकृतींची अयशस्वी चित्रपटीकरणे रेणूंनी पाहिली होती. त्यामुळे ही धास्ती त्यांच्या मनातही होती. निर्माताच आपल्याला पटकथा लिहिण्यासाठी बोलावतो आहे, तेव्हा कथेची फारशी मोडतोड होणार नाही, अशी आशा त्यांना वाटू लागली.

फणिश्वरनाथ रेणू मुंबईला आले आणि त्यांनी व शैलेंद्रने ‘मारे गये गुलफाम’वर पटकथा लिहिण्यास प्रारंभ केला. मात्र, चित्रपटाच्या तांत्रिक बाबींबद्दल रेणू अनभिज्ञ असल्यामुळे शैलेंद्रने प्रसिद्ध लेखक आणि पटकथाकार नवेंदू घोष यांनाही सोबत घेतले. घोष यांनी बिमल रॉय यांच्यासाठी ‘देवदास’, ‘सुजाता’ आणि ‘बंदिनी’च्या पटकथा लिहिल्या होत्या. आणि त्यांची कामाची पद्धत शैलेंद्रला ठाऊक होती. चित्रपटासाठी ‘मारे गये गुलफाम’ हे नाव शैलेंद्रला फारसे योग्य वाटत नव्हते. चर्चेदरम्यान त्याला अचानक ‘तीसरी कसम’ हे नाव सुचले. रेणूंनाही ते आवडले. मग या अनुषंगाने पटकथेची रचना त्यांनी सुरू केली.

हिरामन हा एक भोळाभाबडा गाडीवान आहे. बैलगाडी चालवायची, आलेली कमाई थोरल्या वहिनीच्या हाती सोपवायची आणि मित्रांसोबत गाणी म्हणणे, ढोलकी वाजवणे यांत वेळ घालवायचा. मागे त्याला दोन वेळा वाईट अनुभव आलेले आहेत. एकदा तो गाडीतून वेळू नेत असताना आणि दुसऱ्यांदा चोरीचा माल नेत असताना. त्यामुळे पुन्हा या वस्तू गाडीतून नेणार नाही अशी त्याने शपथ घेतलीय.

मूळ कहाणीत रेणूंनी एका लोकगीताचा मुखडा टाकला आहे. शैलेंद्रला तो अतिशय आवडला. त्याने चित्रपटाच्या सुरुवातीचे गीत या मुखडय़ाचा विस्तार करीत लिहिले-

‘सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है

न हाथी है न घोडा है, वहां पैदल ही जाना है

भला कीजे भला होगा,

बुरा कीजे बुरा होगा

बही लिख लिख के क्या होगा

यहिं सब कुछ चुकाना है..

लडकपन खेल में खोया

जवानी नींद भर सोया

बुढापा देख कर रोया

यही किस्सा पुराना है..’

जीवनाच्या एका वळणावर अचानक हिरामनची भेट हिराबाईशी होते. ही नौटंकीत नाचणारी रूपवान नर्तिका आहे. गढनबैलीच्या मेळ्याला जाण्यासाठी म्हणून ती हिरामनच्या गाडीत बसली आहे. गाडीतून चंपाच्या फुलासारखा सुगंध येतो आहे. हिरामन गाडीच्या समोरचा पडदा हळूच वर करून आत पाहतो. क्षणभर चंद्राचा प्रकाश आत डोळे मिटून पडलेल्या हिराबाईच्या चेहऱ्यावर पडतो आणि हिरामनच्या तोंडून शब्द बाहेर पडतात : ‘‘अरे, यह तो परी है!’’ हिराबाई डोळे उघडून त्याच्याकडे पाहते. तो लाजतो. ती परत पडदा ओढून घेते.

वाटेत हिरामन तिला विचारतो, ‘‘घरी कोण कोण आहेत?’’

‘‘सारं जग.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘आता ही गोष्ट वेगळी, की जो साऱ्या जगाला आपले समजतो, त्याचे स्वत:चे कुणीच असत नाही.’’

तिला काय म्हणावयाचे आहे, ते हिरामनच्या नीटसे ध्यानात येत नाही. पण तिच्या स्वरामागची वेदना त्याला जाणवते. ही वेदना त्याच्याही मनात जागी होते. तो एक अशिक्षित गाडीवान आहे, पण त्याच्याजवळ लोकगीतांचा फार मोठा खजिना आहे. त्या गीतांच्या जलाशयात तो आपल्या जगाचे प्रतिबिंब पाहत असतो. तिच्या वेदनेशी समांतर असे एक गीत त्याच्याही ओठावर येते.

शैलेंद्रने हिरामनसाठी गीत लिहिले-

‘सजनवा बैरी हो गये हमार

चिठीया हो तो हर कोई बांचे, भाग न बांचे कोय

करमवा बैरी हो गये हमार..

जाये बसे परदेस सजनवा सौतन के भर माये

ना संदेस ना कोई खबरिया, रितू आये रितू जाये

डूब गये हम बीच भंवर में तरसे सोला साल

सुनी सेज गोद मोरी सुनी, मर्म न जाने कोय

छटपट छल के प्रीत बिचारी ममता आंसू रोय

ना कोई इस पार हमारा ना कोई उस पार

सजनवा बैरी हो गये हमार..’

‘मारे गये गुलफाम’मध्ये हिरामन हिराबाईला ‘महुआ घटवारीन’ची कथा थोडक्यात सांगतो असा प्रसंग आहे. ही मूळ लोककथा संपूर्णपणे ऐकावी म्हणजे तिच्यासंदर्भात गीत लिहिता येईल अशी शैलेंद्रची इच्छा होती. एके दिवशी रेणू आणि तो पवई लेकच्या किनाऱ्यावर एका झाडाखाली जाऊन बसले. रेणूंनी ही कथा शैलेंद्रला सांगितली. त्यात असलेले ‘सावन-भादो’चे गीत ऐकवले. गीत ऐकता ऐकता शैलेंद्रचे डोळे भरून आले आणि तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला. या गीताने त्याचा

एवढा ताबा घेतला, की त्याला त्या ठिकाणी दुसरे शब्द रचावेत असे वाटेना. शेवटी त्याने आपली ही अडचण त्याचा मित्र हसरत जयपुरी याला सांगितली. हसरतने या थीमवर एक अप्रतिम गीत लिहून दिले..

‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन मे समायी

काहे को दुनिया बनायी,

तुने काहे को दुनिया बनायी..’

या गाण्याशिवाय हसरतने ‘मारे गये गुलफाम’ हे आणखी एक गीतही लिहिले.

रेणूंची कथा ही हिरामनला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली आहे. त्यामुळे हिराबाईच्या भावना कथेत अस्फुट ठेवल्या आहेत. तिच्या मनात त्याच्याविषयी नेमके काय आहे? चित्रपट या भावनांचाही शोध घेऊ  पाहतो.

कथेशी शक्य तितके प्रामाणिक राहून चित्रपट निर्माण करायचा, हा दोघांचाही निश्चय होता. मात्र, असे करताना आपला चित्रपट सामान्यातील सामान्य माणसालाही आवडावा अशी शैलेंद्रची इच्छा होती. शैलेंद्रच्या घरी दोघांच्या तासन् तास चर्चा चालत. एखादा मुद्दा पटवून देत असताना शैलेंद्र इतके मोहक हास्य करी, की त्याला विरोध करणे शक्य नसे. शैलेंद्रचे व्यक्तिमत्त्व अतिशय लोभस होते. तो जेव्हा हसे तेव्हा त्याच्या सावळ्या चेहऱ्यावर त्याचे पांढरेशुभ्र दात खुलून दिसत. रेणूंनी लिहिले आहे, ‘शैलेंद्र जब मुस्कुराता है तो प्यारभरे गीत का कोई मुखडा गुंज उठता है.’ शैलेंद्र एकदा रेणूंना म्हणाला, ‘‘वह अच्छा मेरे लिये बेकार है, जिसे केवल गिनेचुने लोग ही समझ सकते है.’’ मूळ कथेत हिराबाई तिने स्वीकारलेल्या व्यवसायाच्या बंधनामुळे हिरामनला सोडून जाते असे दाखवले आहे. चित्रपटात तिची व्यक्तिरेखा वाढवताना या निर्णयामागचे कारण थोडे स्पष्ट करून दाखवले आहे. ज्या गावात मेळा लागलेला असतो त्या गावचा जमीनदार हिराबाईला खरेदी करू पाहतो. (कथेत जमीनदाराचे पात्र नाही.)  पण ही हिराबाई वेगळी आहे. बदललेली आहे. ती त्याला नकार देते. मात्र, त्याला नाराज करून या गावात राहणे शक्य नसते. दुसरीकडे हिरामनच्या मनातील आपल्याबद्दलच्या भावनांना प्रतिसाद देणेही शक्य नाहीए, हेही तिला कळले आहे. हिरामन तिला देवी समजत असतो. त्याच्या मनातील ही भावना त्याच्यासाठीच जपायला हवी. त्यामुळे शेवटी अत्यंत नाइलाजाने ती गाव सोडून जाण्याचा निर्णय घेते. एकीकडे तिला बाजारू स्त्री समजणारा जमीनदार आणि दुसरीकडे तिला देवी समजणारा हिरामन या दोघांतही तिला स्थान नाही. या दोन टोकांमध्ये कुठेतरी हिराबाई आहे. आणि ती जेथे आहे तेथे विलक्षण एकाकी आहे.

‘ना कोई इस पार हमारा, ना कोई उस पार

सजनवा बैरी हो गये हमार..’

पटकथा तयार झाल्यावर शैलेंद्र, रेणू, नवेंदू घोष आणि बासूने तिचे वाचन केले. पटकथा बासूला आवडली. एक-दोन ठिकाणी त्याला बदल हवे होते, पण ते चित्रीकरणादरम्यान करता येतील असा त्याने विचार केला. परंतु राज कपूरला हिरामनची भूमिका देण्यास त्याचा विरोध होता. त्याचे म्हणणे होते की, राज कपूर गाडीवान खेडुत म्हणून मुळीच शोभणार नाही. दुसरे म्हणजे राज आता चाळिशीकडे झुकला होता आणि प्रौढ दिसत होता. शैलेंद्रने बासूला दाखवून दिले की, कथेतील हिरामनचे वर्णन असेच आहे. तो चाळीस वर्षांचा आहे. लहानपणीच त्याचे लग्न झालेले आहे आणि पत्नी मरण पावली आहे. वीस वर्षांपासून तो गाडीवानी करतो आहे. तेव्हा वयाचा मुद्दा योग्य नव्हे. शिवाय शैलेंद्रने राजला शब्द दिलेला होता आणि तो मोडणे अशक्य होते. नायक राजच राहणार. बासूने थोडी कुरकुर केली. पण एवढी चांगली संधी त्याला सोडावीशी वाटेना. शेवटी तो या गोष्टीसाठी तयार झाला.

चित्रपट हा गीत-संगीतप्रधान असणार, हे शैलेंद्रने ठरवलेच होते. ‘बरसात’पासून त्याचे आणि शंकर-जयकिशन यांचे उत्तम टय़ुनिंग जमले होते. त्यांची कामाची पद्धत त्याला माहीत होती. गीते त्याने स्वत:च लिहिली. त्याच्या गीतांत बिहारच्या मातीचा सुगंध मिसळलेला आहे. लहानपणी अनेक लोकगीते त्याने ऐकली होती. लोकगीते गाणाऱ्यांना त्याने ढोलकीची साथही केली होती. या गीतांचा सुरेख वापर त्याने आपल्या गाण्यांत केला. ‘चलत मुसाफिर मोह लिया रे पिंजडेवाली मुनिया’, ‘लाली लाली डोलिया में लाली रे दुल्हनिया’, ‘पान खायो सैंया हमारो..’ ही गीते चित्रपटात दुधात साखर विरघळावी तशी विरघळून गेली. हसरत जयपुरी यांनी लिहून दिलेले ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समायी, काहे को दुनिया बनायी’ हे गीत चित्रपटात एवढे काही मिसळून गेले, की ते ऐकल्यावर शैलेंद्रनेच ते लिहिले असावे असे अनेकांना वाटले.

आर. के. प्रॉडक्शनसाठी बारा वर्षे काम करीत असल्यामुळे शैलेंद्रची अनेक तंत्रज्ञांशी चांगलीच ओळख झाली होती. राज कपूरच्या चित्रपटांचे छायाचित्रण राधु कर्मकार करीत. राज आणि त्यांचे उत्तम टय़ुनिंग जमले होते. साहजिकच ‘तीसरी कसम’च्या छायाचित्रणाची जिम्मेदारी शैलेंद्र कर्मकार यांच्यावर टाकेल अशी राज कपूरची कल्पना होती. त्यामुळे शैलेंद्रने या कामासाठी सुब्रतो मित्र यांची निवड केली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले.

सुब्रतो मित्र हे सत्यजित राय यांच्या चित्रपटांचे छायाचित्रकार. ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’, ‘अपूर संसार’ या चित्रपटत्रयीमुळे ते भारतातील एक नामवंत छायाचित्रकार मानले जाऊ  लागलेले  होते. शैलेंद्रने हे चित्रपट पाहिले होते आणि त्यांचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला होता. हिंदी सिनेमातील अनेक दिग्गज छायाचित्रकार सोडून त्याने मित्र यांची निवड केली ही गोष्ट अर्थपूर्ण आहे. याचा अर्थ असा, की सुरुवातीपासून आपला सिनेमा हा आम हिंदी सिनेमापेक्षा वेगळा असणार आहे, ही खूणगाठ त्याने बांधली होती. नव्हे, तेच त्याचे स्वप्न होते. वास्तव जीवनात खोल मुळे रुजलेला, तरीही अत्यंत काव्यात्म चित्रपट त्याला निर्माण करायचा होता. त्याच्यासमोर ‘न्यू थिएटर’चाही आदर्श होता. फिल्मनिर्मितीबद्दल विचारल्यावर तो एकदा म्हणाला होता, ‘‘बचपन से मैं न्यू थेटर की फिल्मों पर फिदा था. तभी से पता नहीं क्यों मुझे यह ख्वाहिश थी कि मैं भी ऐसी फिल्म बनाऊं.’’ त्याचे स्वप्न भव्य होते. आणि त्यासाठी नवे प्रयोग करण्याचा धोका पत्करण्यास तो तयार होता. सुब्रतो मित्रांनादेखील नृत्य आणि गीते असणारा एक चित्रपट चित्रित करायचा होता. ती संधी अचानक त्यांच्यासमोर चालून आली. त्यांनी आनंदाने हे काम स्वीकारले. शैलेंद्र-रेणू यांच्या मनातील शब्दप्रतिमांना विलक्षण मोहक दृश्यरूप देण्यात सुब्रतो मित्र यांचा फार मोठा वाटा होता.

अशा रीतीने ‘तीसरी कसम’ची पूर्वतयारी पूर्ण झाली आणि एका मृगजळाच्या विणकामास सुरुवात झाली.

(३)

‘तीसरी कसम’ची सुरुवात फेमस स्टुडिओमध्ये ‘सजन रे झूठ मत बोलो’च्या रेकॉर्डिगने झाली. पहिल्याच दिवशी शैलेंद्रला चित्रपटनिर्मिती हे कसे आव्हानात्मक काम असते याची कल्पना करून देणारा प्रसंग घडला. जणू पुढल्या साऱ्या प्रसंगांची ही नांदीच होती. स्टुडिओमधील एअरकंडिशनर अचानक बंद पडला. रेकॉर्डिग रूम थंड ठेवण्यासाठी बर्फाच्या लाद्या मागवाव्या लागल्या. मात्र, जेव्हा गाण्याचे रेकॉर्डिग संपले त्यावेळी एका असामान्य गाण्याची निर्मिती झाल्याबद्दल साऱ्यांनी शैलेंद्रचे अभिनंदन केले.

चित्रणाला सुरुवात झाली आणि निर्माता ही भूमिका किती अवघड आहे हे शैलेंद्रच्या ध्यानात येऊ  लागले. काही जाणकारांना मदतीस घेऊन त्याने चित्रपटासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला. स्वत:जवळ जमवलेल्या पैशांतच त्याला हा चित्रपट तयार करायचा होता. त्याच्यासमोर ‘पथेर पांचाली’चा आदर्श होताच. पण त्याने प्रमुख भूमिकेसाठी राज कपूर आणि वहिदा रेहमान यांना घेतले आणि ती फार मोठी चूक ठरली. या दोघांनी आपल्या भूमिका अतिशय अप्रतिम केल्या हे जरी खरे असले तरी या दोघांमुळे चित्रपटाचे बजेट कोलमडून पडले ही बाबदेखील नाकारता येत नाही. राज कपूरने मानधन म्हणून फक्त एक रुपया घेतला, असे शैलेंद्रचे एक अभ्यासक आणि ‘गीतों का जादूगर’ या पुस्तकाचे लेखक ब्रजभूषण तिवारी यांचे म्हणणे असले तरी शैलेंद्रचा मुलगा दिनेश याला ते मान्य नाही. त्याचे म्हणणे आहे की, या फिल्मी जगात कुणीही कुणावर मेहरबानी करीत नाही. राज कपूरने तसेच शंकर-जयकिशन यांनी त्यांच्या नेहमीच्या दराप्रमाणेच शैलेंद्रकडून पैसे घेतले.

तिवारी यांचे म्हणणे मान्य केले तरी राज कपूरला घेतल्यामुळे ‘तिसरी कसम’च्या चित्रणाला विलंब होऊ  लागला, हे खरेच होते. राज त्यावेळी अत्यंत व्यस्त कलाकार होता. या दिवसांत तो ‘आशिक’, ‘एक दिल सौ अफसाने’ आणि ‘दिल ही तो है’ या चित्रपटांतून काम करीत होता. शिवाय त्याचे सारे लक्ष त्याच्या स्वत:च्या ‘संगम’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या निर्मितीत गुंतले होते. त्यामुळे त्याच्या सलग तारखा मिळणे कठीण होऊन बसले. ‘संगम’चे बरेच चित्रण परदेशात करावयाचे राज कपूरने ठरवले होते. त्यामुळे तो व आर. के.चे  युनिट बराच काळ भारताबाहेर होते.

हीच गोष्ट वहिदा रेहमानची होती. तिचा ‘चौदहवी का चांद’ अत्यंत लोकप्रिय झाल्यामुळे तिला अनेक निर्मात्यांकडून मागणी येत होती. तिच्या हातात ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘बीस साल बाद’, ‘बात एक रात की’, ‘मुझे जीने दो’, ‘कोहरा’ आणि ‘गाईड’ असे अनेक चित्रपट होते. यांपैकी बरेच चित्रपट बिग बजेट होते. त्यांच्यासाठी खूप वेळ द्यावा लागे. राजला वेळ असेल तर तिला नसे आणि तिला जेव्हा वेळ असे त्यावेळी राज उपलब्ध नसे. त्यामुळे चित्रीकरण सुरू होऊन दीड वर्ष झाले तरी सिनेमा अद्याप २५ टक्केही  चित्रित झाला नव्हता. प्रॉडक्शनचे इतर खर्च तर चालूच होते. जवळचे सारे पैसे संपले. आता काय करावे असा प्रश्न शैलेंद्रला पडला. नाइलाजाने चित्रीकरण चालू ठेवण्यासाठी त्याने फायनान्सरकडून पैसे उभे करण्याचे ठरवले.

परंतु या मोहमयी दुनियेत कुणी कुणाला निरपेक्ष मदत करीत नाही, हे सत्य या कवीला चांगलेच समजले. जीवनाच्या व्यवहारात तो ‘अनाडी’च होता.

‘असली नकली चेहरे देखे,

दिल पे सौ सौ पहरे देखे

मेरे दुखते दिल से पूछो

क्या क्या ख्वाब सुनहरे देखे..’

तीन वर्षांपूर्वीच आपण लिहिलेले शब्द आपल्याच बाबतीत असे खरे ठरतील याची शैलेंद्रला कल्पनाही नव्हती. फायनान्सर हे प्रत्येक गोष्टीला नफा-तोटय़ाच्या मापाने मोजणारे होते. त्यांना शैलेंद्रच्या स्वप्नाशी काही देणे-घेणे नव्हते. त्यांना जेव्हा शैलेंद्रने कथा सांगितली आणि चित्रित झालेला काही भाग दाखवला, तेव्हा त्यांचे एकच म्हणणे होते, ‘‘यह पिक्चर चलेगी नहीं.’’ चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी जे घटक आवश्यक असतात ते पब्लिकला आकर्षून घेणारे घटक यात नाहीत, असेही मत त्यांनी मांडले आणि त्यांचा समावेश करावा असा आग्रह धरला. तरी दोन गोष्टी शैलेंद्रच्या बाजूने होत्या. त्यापैकी एक म्हणजे ‘तीसरी कसम’ची गाणी रिलीज् झाली आणि ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. शैलेंद्रने आपला सारा जीव त्या गाण्यांत ओतला होता आणि शंकर-जयकिशन यांनीही त्यांच्याजवळचे उत्कृष्ट ते दिले होते. दुसरे म्हणजे राज आणि वहिदासारखे ‘स्टार’ चित्रपटात होते. या दोन गोष्टींच्या बळावर शैलेंद्रने काही वितरकांकडून रकमा उचलल्या. पण तरीही जेव्हा पैसे कमी पडू लागले तेव्हा तो फार चिंतेत पडला. चित्रपट पूर्ण करण्यासाठी आता भरमसाट व्याजाने पैसे उभे करणे हाच मार्ग त्याच्यासमोर उरला होता.

हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेकवार कवीने चित्रपट निर्माण करण्याचे स्वप्न पाहावे आणि तो कफल्लक बनवा- असे घडले आहे.  पी. एल. संतोषी या स्वप्नापायी राजाचे रंक बनले. न्याय शर्मा कर्जबाजारी झाले. दीनानाथ मधोक, जां निसार अख्तर यांनाही या व्यवसायात आपले हात पोळून घ्यावे लागले. (पुढे गुलजारांनादेखील चित्रपटनिर्मितीत नुकसान सहन करावे लागले.) शैलेंद्रही या मालिकेत जाऊन बसला. कवीला व्यवहार समजत नाही असे मानले जाते, ते पुन्हा एकदा सिद्ध होत होते. मात्र, शैलेंद्रच्या दृष्टीने हे सत्य पचवणे अतिशय अवघड होते. या मायावी जगात फक्त परकेच आपल्याला फसवतात असे नव्हे, तर आपलेही परके बनतात, या गोष्टीचा त्याला लवकरच अनुभव आला.

निर्मिती खर्चाचा हिशोब ठेवण्याचे व त्यावर देखरेख करण्याचे काम शैलेंद्रने त्याच्या पत्नीच्या भावावर सोपविले होते. घरचाच माणूस असल्यामुळे शैलेंद्र निश्चिंत होता. पण हा अस्तनीतील साप निघाला. शैलेंद्रने टाकलेल्या विश्वासाचा त्याने विलक्षण गैरफायदा घेतला. ‘तीसरी कसम’ची कथा खेडय़ांतील माणसांभोवती फिरते. कोणतेच पात्र धोतराखेरीज दुसरे काही घालीत नाही. पण शैलेंद्रच्या मुलांच्या या मामाने चित्रपटासाठी वीस सूट शिवल्याची नोंद केली व ते पैसे ढापले. चित्रपटात वापरण्यासाठी बैलगाडय़ा व बैल वारेमाप किमतीला खरेदी केलेले दाखविले गेले. एकदा आणलेले बैल मेले असे दाखवून पुन्हा बैल विकत आणल्याची नोंद त्याने केली. मात्र, प्रत्यक्षात आणलेले बैल जुनेच होते.

‘तीसरी कसम’चे बाह्य़ चित्रण प्रत्यक्ष खेडय़ात जाऊन करायचे ठरले होते. मुंबईजवळच्या कुठल्याही खेडय़ात ते करता आले असते. मात्र, हा मामा लोकेशनचा शोध घेत मध्य प्रदेशात गेला व तेथे बिना या गावाजवळ चित्रण करण्याचे त्याने ठरवले. आपण घेत असलेले निर्णय शैलेंद्रचेच आहेत असे तो लोकांना सांगे. तो घरचाच माणूस असल्यामुळे कुणी खरे-खोटे करण्याच्या भानगडीत जात नसत. चित्रपटाचे संपूर्ण युनिट- राज कपूर, वहिदा रेहमानसह- बिनाला नेणे, तेथे त्यांची राहण्याची व्यवस्था करणे आणि पंधरा दिवसांचे शूटिंग यात इतका खर्च आला, की तेवढय़ात चित्रपट तयार झाला असता. खूप उशिरा राज कपूर आणि मुकेश यांनी हे सर्व व्यवहार पाहिले तेव्हा त्यांना समजले की, या मामाची एक प्रेयसी बिना येथे राहत होती व तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी त्याने हा सारा घाट घातला होता. आपल्या सर्व नातलगांना त्याने बिना येथे बोलावून घेतले व शूटिंगच्या खर्चात त्यांची पिकनिक घडवून आणली.

शैलेंद्रच्या मनस्तापात भर पडली ती बासू भट्टाचार्यच्या हट्टी व एककल्ली स्वभावामुळे. त्याचे युनिटमधील कुणाशी पटत नसे. बासूला खेडय़ातील जीवनाची काहीच माहिती नव्हती. अनेकदा शब्दांचे अर्थही त्याला समजावून सांगावे लागत. बऱ्याचदा तो तयारी केल्याशिवायच सेटवर येत असे. आज काय चित्रित करायचे आहे, हेही त्याला ठाऊक नसे. ‘तीसरी कसम’ची प्रादेशिकता हा त्या चित्रपटाचा आत्मा होता. पण ती त्याला कधी समजलीच नाही. अनेकदा चित्रीकरणाची जबाबदारी त्याचे सहाय्यक बासू चटर्जी किंवा बी. आर. इशारा घेत. खरे तर हा सिनेमा बासूचा असण्यापेक्षा शैलेंद्र, रेणू व सुब्रतो मित्राचा होता. बासू भट्टाचार्यने यानंतर जे चित्रपट तयार केले त्यांच्यावर नजर टाकली म्हणजे ध्यानात येते की ‘तीसरी कसम’ची काव्यात्मता व शोकात्म चिंतन त्यानंतरच्या त्याच्या कुठल्याच चित्रपटात दिसले नाही. पुढे चालून बासूची जी शैली तयार झाली, किंवा ज्या शैलीमुळे बासू ओळखला जातो ती ‘तीसरी कसम’च्या शैलीपेक्षा अगदी निराळी होती.

चित्रीकरण जसजसे लांबत चालले तसतशा शैलेंद्रच्या काळज्या वाढत चालल्या. चित्रपट पूर्ण करण्यासाठी अजून बऱ्याच रकमेची आवश्यकता होती. या काळात शैलेंद्रचे इतर निर्मात्यांसाठी गीतलेखन चालूच होते. त्याने मिळतील ते चित्रपट स्वीकारण्यास सुरुवात केली. १९६३ ते १९६६ या चार वर्षांच्या काळात त्याने गीते लिहिलेले तीस चित्रपट पडद्यावर आले. या काळात त्याने लिहिलेली गाणी त्याच्या मृत्यूनंतरदेखील अनेक वर्षे संगीतकार वापरत होते. ‘गाईड’ हा या काळातील शैलेंद्रच्या अभिजात गीतांनी नटलेला एक महत्त्वाचा चित्रपट होता. या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची विनंती देव आणि विजय आनंद यांनी जेव्हा शैलेंद्रला केली तेव्हा त्याने गीतलेखनासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. आजवर कुठल्याही गीतकाराने एवढी मोठी रक्कम मागितली नव्हती. परंतु देव आनंदने ती देण्याचे कबूल केले व पुढे ‘गाईड’च्या ‘आज फिर जीने की तमन्ना है’, ‘वहां कौन है तेरा’ अशा अप्रतिम गीतांनी इतिहास घडवला.

असे असले तरी मिळत असलेला सारा पैसा कोठे गडप होत होता, हे शैलेंद्रला समजत नव्हते. या काळात तो अतिशय तणावाखाली वावरत होता. चित्रपट अर्धवट तयार झाला होता आणि तो पूर्ण करण्यासाठी बराच पैसा लागणार होता. त्याची बेचैनी वाढली. एक-दोन वर्षांपूर्वी मित्रांच्या आग्रहास्तव सोडलेले मद्यपान आता पुन्हा सुरूझाले. सोबतीला अखंड सिगारेट ओढणे चालूच होते. एके दिवशी शैलेंद्रचे शाळकरी मित्र डॉ. ब्रजवल्लभ मिश्र शैलेंद्रला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यावर गेले तेव्हा द्वारपालाने त्यांना अडवले. त्यांनी एक चिठ्ठी लिहून त्याला दिली व ती  शैलेंद्रला नेऊन देण्यास सांगितले. दोन मिनिटांनी तो बाहेर आला आणि म्हणाला की, ‘साहेब आज तुम्हाला भेटू शकत नाहीत.’ असे पूर्वी कधीच घडले नव्हते. मिश्र यांना फार आश्चर्य वाटले. वाईटही वाटले. त्यांनी एका कागदावर लिहिले, ‘मी यानंतर कधीही तुमच्या घरी येणार नाही..’ आणि ती चिठ्ठी द्वारपालाला देऊन ते तडक परत फिरले.

काही दिवसांनी एका समारंभात त्यांची व शैलेंद्रची अचानक भेट झाली. त्याला पाहून त्यांनी तोंड फिरवले आणि ते निघून जाऊ लागले. तेवढय़ात शैलेंद्र त्यांच्याजवळ आला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना जवळ घेत म्हणाला, ‘‘माझ्यावर नाराज आहेस का?’’

मिश्र काहीच बोलले नाहीत. शैलेंद्र पुढे म्हणाला, ‘‘तू मला मोठा भाऊ  मानतोस ना?’’

‘‘हो.’’

‘‘इकडे ये..’’ असे म्हणत शैलेंद्र त्यांना एका कोपऱ्यात घेऊन गेला. मग हलकेच एखादा कबुलीजबाब दिल्याप्रमाणे शैलेंद्र म्हणाला, ‘‘त्या दिवशी मी दारूच्या नशेत होतो. तुझ्या मनात माझ्याविषयी काय भावना आहेत हे मी जाणतो. मला त्या अवस्थेत पाहून तुझ्या भावनांना ठेच लागली असती, म्हणून मी तुला आत बोलावले नाही. ही फिल्म लाइन फार खराब आहे, वल्लभ! काही दोस्तांनी मला दारू प्यायला शिकवले. आणि आता तर रात्र झाली की..’’

बोलता बोलता शैलेंद्र अचानक गप्प झाला. बोलण्यासारखे काहीच उरले नाही असे त्याला वाटले.

‘संगम’ आणि ‘गाईड’ या चित्रपटांचे चित्रीकरण संपल्यावर ‘तीसरी कसम’च्या चित्रणाला थोडा वेग आला. चित्रण जवळजवळ संपत आले आणि बासूचे काहीतरी बिघडले. तो बरेच दिवस कामाकडे फिरकलाच नाही. मूळ आराखडय़ाप्रमाणे सहा महिन्यांत पूर्ण करावयाची फिल्म चार वर्षे झाली तरी पूर्ण होत नव्हती. बासू सोडून गेल्यानंतर काय करावे, हे शैलेंद्रला सुचेना. शेवटी चित्रपटाची सारी जबाबदारी राज कपूर आणि मुकेश यांनी घेतली. थोडेफार बदल करून चित्रपटाचे एक कामचलाऊ  रूप तयार केले गेले. राज कपूरच्या स्टुडिओत त्याचा एक ट्रायल शो वितरकांना दाखविण्यात आला. परंतु चित्रपटाचा शोकान्त शेवट वितरकांना पटला नाही. त्यांनी शेवट बदलून नायक-नायिकेचे मीलन होते असे दाखवण्यास सांगितले. खुद्द राज कपूरचे मतही तसेच होते. तो शैलेंद्रला म्हणाला, ‘‘कविराज, शेवट बदलल्याशिवाय वितरक या सिनेमाला हात लावतील असे वाटत नाही. मीही माझ्या ‘आह’चा शेवट बदलला होता.’’

पण शैलेंद्रला ही कल्पनादेखील अस होत होती. तो म्हणाला, ‘‘हिरामन आणि हिराबाई या दोघांच्या नात्याला कसले नाव नाही. भविष्यही नाही. आहे फक्त वर्तमानाचा क्षण. आणि तो तर सतत निसटून चाललेला असतो. म्हणून या कहाणीला फक्त ताटातुटीचाच शेवट असू शकतो. शिवाय शेवट बदलला तर मला चित्रपटाचे नावदेखील बदलावे लागेल. कारण हिरामनला हिराबाई मिळाली तर त्याला ‘तीसरी कसम’ घेण्याचे प्रयोजनच उरणार नाही.’’

(४)

कफल्लक होण्याची वेळ आली तरी पैशासाठी, व्यवसायासाठी एवढी तडजोड करण्यास शैलेंद्र तयार नव्हता. राज कपूरने आपला आग्रह सोडला नाही तेव्हा शैलेंद्रने रेणूंना बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, ‘‘रेणूजी, मैं अभी तक डटा हूं. अब यह आपके उपर है कि हिरामन और हिराबाई को मिलाये या नहीं?’’

रेणूंना शेवट बदलणे मान्य नव्हतेच. पण शेवटी शैलेंद्रने या सिनेमासाठी त्याचे आयुष्य पणाला लावले होते. त्यांनी त्यालाच विचारले,

‘‘आपकी क्या राय है?’’

‘‘मेरी राय है के न मिलाये.’’ शैलेंद्रचे उत्तर तयार होते. आपल्या मनातील स्वप्न तो भंग होऊ देणार नव्हता. हाच तो क्षण होता- ज्या क्षणी फक्त सिनेमाच्या शेवटाचा निर्णय झाला नाही, तर कवीच्या आयुष्याचाही फैसला झाला. स्वप्नाची समाप्ती होण्यापेक्षा आयुष्याची समाप्ती होणे त्याने स्वीकारले.

‘तीसरी कसम’ तयार झाला आहे, ही बातमी सर्वत्र पसरली आणि शैलेंद्रला ज्यांनी पैसे दिले होते ते  सारे वसुलीसाठी त्याच्याकडे फेऱ्या मारू लागले. या संदर्भात त्याने एका पत्रात लिहिले आहे- ‘‘फिल्म खत्म हुए देर नहीं हुई और सभी मुझ पर गिद्ध की तरह टूट पडे हैं..’’ सावकार त्याच्या घरी येऊन धडकू लागले. त्याला घरी राहणे कठीण झाले. चार-चार दिवस तो कोठेतरी जाऊन दारू पीत राही. घरी फोन होता; पण आलेला फोन कुणी उचलीत नसत. न जाणो एखाद्या देणेकऱ्याचा असला तर! शैलेंद्रसमोर उभे राहण्याची ज्यांची लायकी नव्हती अशी गुंड माणसे त्याच्या घरी येऊन त्याला शिव्या देऊ  लागली.

याच सुमारास रेणूजीदेखील अतिशय आजारी पडले. मुंबईला त्यांची शुश्रूषा करणारे कोणी नव्हते. पाटण्याला त्यांची पत्नी नर्स म्हणून काम करीत होती. ते तिच्याकडे निघून गेले. शैलेंद्र अगदी एकाकी पडला.

आता शैलेंद्रचा जीवनातील रस हळूहळू कमी होऊ  लागला. त्याचे गीतलेखनही जवळजवळ संपले. राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’साठी त्याने गीताचा एक मुखडा लिहून दिला होता-

‘जीना यहां मरना यहां

इस के सिवा जाना कहां..’

राजला हा मुखडा अतिशय आवडला होता. गीत पूर्ण करावे म्हणून तो शैलेंद्रची सतत विनवणी करायचा. पण शैलेंद्रला काही सुचतच नव्हते. अर्धे गीत पूर्ण होत नव्हते. ते शेवटपर्यंत पूर्ण झालेच नाही. शैलेंद्रच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शैली शैलेन्द्र याने हे गीत पूर्ण करून राजला दिले.

‘गाईड’नंतर देव आनंदने ‘ज्वेल थीफ’ बनविण्यास सुरुवात केली होती. गीते शैलेंद्रनेच लिहावीत असे ठरले होते. त्याने या सिनेमासाठी एक गीत लिहूनही दिले होते-

‘रुला के गया सपना मेरा

बैठी हूं कब हो सवेरा..’

शैलेंद्रच्या स्वप्नानेही त्याला असेच रडवले होते. आणि आता तर सकाळ होईल याची आशा करण्यातही अर्थ नव्हता. विजय आनंद आणखी गाण्यांसाठी त्याच्याकडे चकरा मारायचा. आपण घरी नाही असे शैलेंद्र मुलांना सांगायला लावायचा. शेवटी ‘आता माझ्या हातून काम होणार नाही,’ असे शैलेंद्रने गोल्डीला स्पष्ट सांगितले.

शैलेंद्रच्या मनात दिवस-रात्र या चित्रपटाचेच विचार चालत. अशीच एके दिवशी उत्तररात्री त्याला जाग आली आणि मग या विचारांनी त्याचा ताबा घेतला. आपले अर्धवट राहिलेले स्वप्न त्याला आठवले. अचानक काही ओळींनी त्याच्या मनात प्रवेश केला.

‘जो ये सपने सच हो जाते

तो ये सपने क्यों कहलाते

और इस घडी नींद क्यों टूटती..’

आता झोप येणे अशक्य होते. त्याने आपली गीतांची वही काढली आणि कागदावर झरझर शब्द उमटू लागले.

‘हम सैलानी, घर न घराना

काम हमारा, चलते जाना

अपनी कभी, कोई मं़िजल न थी

अपना कोई न था

अपना कोई नहीं, इस दुनिया में हाय

आँख से जो इक बूँद गिरी है

हर सपने का मोल यही है

ऐ दिल तेरी कोई क़ीमत न थी

अपना कोई न था

अपना कोई नहीं, इस दुनिया में हाये

जो ये सपने सच हो जाते

तो ये सपने क्यों कहलाते

और इस घडम्ी नींद क्यों टूटती

अपना कोई न था

अपना कोई नहीं, इस दुनिया में हाय

वो ज़िदगी, ऐ मेरी बेबसी

अपना कोई न था, अपना कोई नहीं

इस दुनिया में हाय..’

शंकर-जयकिशनच्या ‘सपनों का सौदागर’साठी त्याने हे गीत त्यांना दिले. याच चित्रपटासाठी त्याने लिहिलेले एक गीत असेच अर्धवट राहिले होते. ते सारखी मागणी करायचे. त्यांच्यासाठी शैलेंद्रने ‘तुम प्यार से देखो, हम प्यार से देखें’ हे गीत लिहून दिले. त्याने लिहिलेले ते शेवटचे गीत ठरले.

शैलेंद्रच्या पत्नीची व मुलांची परिस्थिती तर अतिशय वाईट होती. एकीकडे अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीला तोंड देत असताना आपली प्रिय व्यक्ती विनाशाच्या टोकाकडे ओढली जात आहे आणि आपण काहीच करू शकत नाही, हे सत्यही त्यांना निमूटपणे सोसावे लागत होते.

‘तीसरी कसम’साठी पैसे दिलेल्या एका वितरकाने थोडाफार पैसा वसूल होईल या आशेने दिल्लीच्या एका सिनेमागृहात या चित्रपटाचे प्रदर्शन करण्याचे ठरवले. मात्र, चित्रपट रिलीज करण्याआधी वातावरणनिर्मिती करावी लागते, पोस्टर लावावे लागतात, वर्तमानपत्रांत बातम्या छापून आणाव्या लागतात, ढोल पिटावे लागतात- की अमुक एक फिल्म येते आहे, ती फार उत्तम आहे, वगैरे.. असे काहीच केले गेले नाही. उलट, फिल्म रिलीज होणार म्हणताच काही देणेकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली. दिल्ली कोर्टातून शैलेंद्रच्या नावाने वॉरंट निघाले. आपल्या चित्रपटाच्या पहिल्या खेळालाही कवीला हजर राहता आले नाही. राज कपूर आपल्या परिवारासह दिल्लीला गेला होता. कसेतरी त्याला प्रीमियरला उपस्थित राहता आले.

परंतु पब्लिसिटी नसल्याचा मोठा फटका चित्रपटाला बसलाच. शिवाय ज्या चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित झाला तो बकाल वस्तीचा भाग होता. तेथे नेहमी मारधाडचे सवंग, सी ग्रेड चित्रपट लागत. त्यामुळे बरेच प्रेक्षक चित्रपट चालू असताना उठून गेले. तिसऱ्या दिवशी चित्रपट टॉकिजमधून काढून घ्यावा लागला.

किमान आपला चित्रपट प्रदर्शित तरी झाला- याचा शैलेंद्रला आनंद झाला. त्याने २९ सप्टेंबर १९६६ रोजी फणिश्वरनाथ रेणूंना पत्र लिहिले..

प्रिय भाई रेणूजी,

सप्रेम नमस्कार. फिल्म आखिर रिलीज हो गयी, मालूम ही होगा. जो नहीं मालूम वो बताता हूं. दिल्ली- यू. पी. के डिस्ट्रिब्युटर और उनके सरदार फायनान्सर का आपसी झगडा- छ: अदालतो में इंजन्क्शन्स, मेरे उपर वारंट, कोई पब्लिसिटी न होते हुए फिल्म लगी. मुझे अपनी पहली फिल्म का प्रीमियर देखना भी नसीब न हुआ. यह तो उन सरदार फायनान्सर का ही दम था, कि चित्र प्रदर्शित हो सका. अन्यथा यहां से दिल्ली सपरिवार गये हुए राजसाहब अपमानित लौटते. कल्पना कर सकते है (मेरी) क्या हालत हुई. इस सब के बावजूद पिक्चर कि रिपोर्ट अच्छी रही. रिव्ह्य़ू तो सभी ‘टाप क्लास’ मिले.

सी. पी. बरार में भी रिलीज हो गयी है. वहां भी एकदम बढीया रिपोर्ट है. कल सी. आय. राजस्थान में रिलीज हो जायेगी.

कम से कम बंबई रिलीज पर तो आपको अवश्य बुला सकुंगा. पत्र दीजिएगा. लतिकाजी को मेरा नमस्कार.

शेष कुशल.

आपका भाई-

शैलेंद्र

मात्र, चित्रपट मुंबईत प्रदर्शित होण्यात अनंत अडचणी येऊ  लागल्या. अति मद्यपानामुळे शैलेंद्रचे लिव्हर खराब झाले होते. ते वारंवार बिघडू लागले. हाता-पायावर सूज येऊ  लागली. डॉक्टरांनी निदान केले- सिरोसिस ऑफ लिव्हर झाला आहे. सांगितले, दारू प्यायची नाही. शैलेंद्रने  ऐकले नाही. आपला अंत जवळ येत चालला आहे हे त्याने जाणले. तो दूर ढकलण्यासाठी किमान प्रयत्न करण्यास मनाची जी उभारी लागते ती शैलेंद्र हरवून बसला होता.

३ डिसेंबर १९६६. शैलेंद्र आपल्या खोलीत एकटाच बसला होता. सोबत होती मद्याची बाटली. गेली काही वर्षे कवीच्या नजरेसमोरून सरकत गेली. सहा वर्षांपूर्वी एका सुंदर स्वप्नाने त्याच्या मनात प्रवेश केला होता. आणि आज! आज त्या स्वप्नाचे तुकडे होऊन पडलेले कवी पाहत होता. हे असे का झाले? आपले काही चुकले का? शैलेंद्र परत परत स्वत:ला हे प्रश्न विचारीत होता आणि त्याला उत्तर सापडत नव्हते. जगाने आपला विश्वासघात का केला? की ‘खुद ही मर मिटने की’ ही आपलीच जिद्द होती?.. ‘अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा, कौन कहे इस ओर, तू फिर आये न आये..’ असे त्यानेच एकदा लिहिले होते. पण आता तो कोणती कहाणी सोडून जाणार होता? कोणती निशाणी सोडून जाणार होता? फसलेल्या प्रयोगाची कहाणी? शिरावरल्या कर्जाची कहाणी? फार वर्षांपूर्वी आपण लिहिलेल्या एका गीताचे शब्द त्याच्या मनात उमटले..

‘ये गम के और चार दिन,

सितम के और चार दिन

ये दिन भी जायेंगे गुजर

गुजर गये हजार दिन

कभी तो होगी इस चमन

पर बहार की नजर..’

त्यावेळची गोष्ट वेगळी होती. आज कवीला वाटले, हे दु:खाचे दिवस आता कधीच संपणार नाहीत. चहूकडून अंधारलेल्या या बागेत आता बहार येणे अशक्य आहे.

‘फिर वही रात कठीन, छुप गये तारे

अभी से बुझने लगे, दीप हमारे

दूर बडी दूर सवेरा, दूर बडी दूर उजाला

दूर है आशाओं का कुल किनारा..’

या अंधारातून बाहेर येण्यासाठी, मार्ग शोधण्यासाठी कवीला एकही आशेचा किरण सापडेना. तो बेचैन झाला. त्याला घरात बसवेना.

तो अचानक उठला आणि राज कपूरकडे गेला. आपल्या मित्राची ही हालत पाहून राजला फार वाईट वाटले. शैलेंद्र त्याच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसला. बराच वेळ कुणीही एकमेकांशी काही बोलले नाही. शब्द त्यांचे अर्थ हरवून बसले होते. शैलेंद्रच्या लेखी तर जीवनाचाच अर्थ हरवला होता.

कवीचे आधीच हळवे असलेले मन या दिवसांत अधिकच चंचल बनले होते. कधी अचानक त्याच्या मनात नवी आशा निर्माण होई. दूर कुठेतरी प्रकाशाची किरणे दिसू लागत. ११ डिसेंबर रोजी शैलेंद्र असाच आपल्या खोलीत विचार करीत बसला होता. अचानक त्याच्या मनात एक विचार आला. त्याने आपली कवितेची वही बाहेर काढली. तिच्यात काही अर्धवट राहिलेली गीते त्याने लिहून ठेवली होती. त्यापैकी एक गीत राज कपूर नायक असलेल्या, महेश कौल दिग्दर्शित ‘सपनों का सौदागर’ या सिनेमासाठीचे होते. लिहून ठेवलेला त्याचा मुखडा..

‘तुम प्यार से देखो, हम प्यार से देखे

जीवन के अंधेरे में बिखर जाये उजाला..’

शैलेंद्रने पुन्हा एकदा वाचला आणि त्याला भराभर शब्द सुचत गेले..

‘हम तुम पर जो भारी थे वो दिन बीत चुके है

मतवाली डगर पे जो मिले, मित नये है

खुशियों की लहर और चांद जोड गयी है

हम प्यार करने वालों की दुनिया ही नयी है

फिर आज धडकता हुआ दिल बोल रहा है

फिर से कही उड जाने को पर खोल रहा है

नगरी जवां अरमानों की ये प्रेम नगर है

हर दिल उछल रहा है, मुहोब्बत का असर है

ये रात है रंगीन, ये रंगीन नजारे

धरती पे उतर आये है आकाश के तारे..’

शैलेंद्रने दोन कडवी लिहिली. या गीताची रचना त्याने अशी केली होती : नायक प्रत्येक कडव्याच्या पहिल्या दोन ओळी म्हणतो आणि नंतर नायिका दोन ओळी म्हणते. तिसऱ्या कडव्याच्या दोन ओळी लिहिल्या आणि त्याच्या मनातील शब्द आटले. पुढल्या ओळी त्याला सुचेनात. त्याने बराच काळ प्रयत्न केला आणि मग नंतर थकून तो प्रयत्न सोडून दिला. गीत अधुरेच राहिले. हे अधुरे गीत त्याने लिहिलेले शेवटचे गीत ठरले. शेवटचे गीत- आणि तेही अर्धे! नियतीची कशी ही विलक्षण लीला होती! पुढे हे गीत असेच शंकर-जयकिशन यांनी नायकाच्या दोन ओळीच नायिका पुन्हा म्हणते असे दाखवून संगीतबद्ध केले.

१३ डिसेंबर. सकाळीच शैलेंद्रला अस्वस्थ वाटू लागले. त्याने शकुंतलाला तसे सांगितले. तिने घाबरून राज कपूरला फोन लावला. आपल्या मित्राच्या आयुष्याचे फार थोडे दिवस राहिले आहेत हे राजला जाणवले. त्याने डॉक्टरना बोलावले. त्यांनी तपासून शैलेंद्रला ताबडतोब दवाखान्यात दाखल करावयास सांगितले. लगेच राज त्याला नॉर्थ कोट नर्सिग होममध्ये घेऊन गेला. शैलेंद्र अर्धवट गुंगीत होता. मधेच त्याला जाग येई व तो घरी जाण्याची भाषा करू लागे. राजने शकुंतलाला दवाखान्यात बोलावून घेतले. उत्तररात्री कधीतरी कवीला झोप लागली. मग राज आणि मुकेश आपापल्या घरी गेले.

१४ डिसेंबर. राज कपूरचा जन्मदिवस. त्याला शुभेच्छा देण्यासाठी आर. के. स्टुडिओत असंख्य लोक जमले होते. पण ज्याला शैलेंद्रची बातमी कळे- तो स्तब्ध होई. आजचा दिवस हा आनंद व्यक्त करण्याचा नव्हता. प्रार्थना करण्याचा होता. शैलेंद्रला आयुष्य लाभावे म्हणून सर्वानी प्रार्थना केली.

इकडे शैलेंद्र मृत्यूशी झगडत होता. मधेच त्याला शुद्ध आली. त्याला आठवले, आज त्याच्या मित्राचा वाढदिवस आहे. मग आपण या दवाखान्यात काय करतो आहोत? त्याने राजकडे आपल्याला घेऊन जावे असा आग्रह धरला. डॉक्टरांनी त्याला मना केले. ते शक्यच नव्हते. पुन्हा शैलेंद्रची शुद्ध हरपली. मुकेश आणि संगीतकार शंकर त्याच्याजवळ होते. मुले बिचारी भेदरून एका खोलीत बसली होती. अश्रू ढाळणाऱ्या शकुंतलाजवळ बसून राजची पत्नी कृष्णा तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होती. मुकेशला काही दिवसांपूर्वीच रेकॉर्ड केलेले शैलेंद्रचे गीत आठवत होते-

‘चंद दिन था बसेरा हमारा यहां

हम भी मेहमान थे, घर तो उस पार था

हमसफर एक दिन तो बिछडना ही था

अलविदा, अलविदा, अलविदा..’

दुपारी तीन वाजता कवीची प्राणज्योत मावळली.

उपसंहार..

शैलेंद्रच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी ‘तिसरी कसम’ मुंबईच्या अप्सरा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. लवकरच तो भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांतही प्रदर्शित झाला आणि त्याने बऱ्यापैकी व्यवसाय केला.

राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून ‘तीसरी कसम’ला त्यावर्षीचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले.

आज तो एक अभिजात चित्रपट म्हणून ओळखला जातो.

साहित्यकृतीवरून तयार झालेल्या हिंदी सिनेमांत तो सर्वोत्तम आहे असा जाणकारांचा अभिप्राय आहे.

शैलेंद्रला जे हवे होते ते सारे या चित्रपटाने मिळविले.

मात्र, हे पाहण्यासाठी तो या जगात राहिला नव्हता.

‘भाग ना बाचे कोय..’ असे त्यानेच लिहिले होते.

कवीचे म्हणणे.. ते खोटे कसे ठरणार?
विजय पाडळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 1:24 am

Web Title: hindi movie teesri kasam and lyricist shailendra
Next Stories
1 पँक्रीची कमाल
2 नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा
3 शोध.. शेक्सपिअरचा!
Just Now!
X