|| अमृतांशू नेरुरकर

‘डेबियन प्रकल्पा’त १९९६ सालात महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्याचे केवळ डेबियन व्यवस्थापनातच नव्हे तर एकूणच ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेत दूरगामी परिणाम झाले. एक म्हणजे डेबियनच्या वाढत्या व्यावहारिक दृष्टिकोनाकडे पाहून फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनने त्याच्यापासून फारकत घेतली व डेबियनचं प्रायोजकत्व थांबवलं. तर दुसरं म्हणजे डेबियनच्या तांत्रिक बाबींमध्ये अधिक लक्ष घालण्यासाठी इयन मरडॉकने डेबियन प्रकल्पाचं नेतृत्व सोडलं व ती आली जबाबदारी विविध ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या निर्मितींमध्ये मोलाचा सहभाग असलेल्या अमेरिकन संगणक तंत्रज्ञ, ब्रूस पेरेन्सकडे!

पेरेन्स तेव्हा पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज या अ‍ॅनिमेशन चित्रपट बनविणाऱ्या अमेरिकेतल्या विख्यात कंपनीत काम करत होता. पिक्सारच्या नावाजलेल्या ‘अ बग्ज लाइफ’ व ‘टॉय स्टोरी – टू’ या अ‍ॅनिमेशनपटांच्या तांत्रिक चमूमधला तो एक महत्त्वाचा सदस्य होता. पिक्सारसारख्या प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरणाऱ्या कंपनीत काम करत असूनदेखील पेरेन्सचा ओपन सोर्स सॉफ्टवेअरकडे जास्त ओढा होता.

सन १९९५ मध्ये त्याने बिझीबॉक्स या ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रकल्पाचा श्रीगणेशा केला होता. बिझीबॉक्स हा लिनक्स व बीएसडीवर सहजपणे चालू शकतील अशा विविध लहानमोठय़ा उपयुक्त सॉफ्टवेअर प्रणालींचा संच होता. बिझीबॉक्समुळे पेरेन्सचं ओपन सोर्स विश्वात चांगलंच नाव झालं होतं व तशात त्याच्या गळ्यात डेबियनच्या नेतृत्वपदाची माळ येऊन पडली.

पेरेन्स काहीसा हुकूमशाही प्रवृत्तीचा असला तरीही धोरणी आणि व्यावहारिक होता. डेबियनचं नेतृत्वपद स्वीकारल्यानंतर दोन गोष्टी त्याच्या लगेच ध्यानात आल्या. एक म्हणजे उगाच स्टॉलमनसारखं तात्त्विक गोष्टींचा बाऊ करून त्यांनाच चिकटून राहण्यात अर्थ नाही; ज्यामुळे तोटाच होण्याची शक्यता असते. ओपन सोर्स सॉफ्टवेअरचं यश हे त्याचा लोकांनी व्यावसायिक अथवा बिगैर व्यावसायिक कामासाठी अधिकाधिक वापर करण्यावर अवलंबून आहे व त्यासाठी ओपन सोर्सबरोबर व्यावसायिक प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वापरण्यासारखी तत्त्वांशी तडजोड करायला लागली तरी काही हरकत नाही.

दुसरं म्हणजे डेबियनसारख्या प्रकल्पात जिथे सोर्स कोडमध्ये अविरत सुधारणा करत राहणं, सॉफ्टवेअरची अद्ययावत आवृत्ती सतत अपलोड करत राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं, तिथे केवळ जगभरातल्या तंत्रज्ञांच्या ऐच्छिक सहयोगावर अवलंबून राहता येणार नव्हतं. काही ठरावीक तंत्रज्ञ वा प्रोग्रामर्सचा पूर्ण वेळ सहयोग अत्यावश्यक होता व यासाठी प्रकल्पास प्रायोजकत्व मिळणं गैरजेचं होतं.

फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनचं प्रायोजकत्व आधीच बंद झालं होतं. म्हणूनच डेबियनला अधिकृतपणे देणगी स्वीकारता यावी म्हणून पेरेन्सने शक्कल लढवली. त्याने १९९७ मध्ये ‘सॉफ्टवेअर इन द पब्लिक इंटरेस्ट’ (एसपीआय) या ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून डेबियन प्रकल्पासाठी पेरेन्सला अधिकृतपणे देणगीमूल्य स्वीकारता येऊ लागलं.

पण पेरेन्सचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्याने निर्मिलेलं डेबियन सोशल कॉन्ट्रॅक्ट (किंवा डेबियनचा सामाजिक करार)! या दस्तऐवजात डेबियन प्रकल्पासंदर्भातल्या पण कोणत्याही ओपन सोर्स प्रकल्पाला लागू पडतील अशा अनेक घटकांचा समावेश होता.

या कॉन्ट्रॅक्टमधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे फ्री सॉफ्टवेअर संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वं! ही मार्गदर्शक तत्त्वं, जी डेबियनमध्ये कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा समावेश करता येईल याचा निर्णय घेण्यासाठी लिहिली गेली होती, आजही ओपन सोर्स सॉफ्टवेअरची व्याख्या करताना वापरली जातात. त्या वेळेला ‘ओपन सोर्स’ ही संज्ञाच अस्तित्वात नसल्याने पेरेन्सने या तत्त्वांना ‘फ्री’ सॉफ्टवेअरची तत्त्वं असं म्हटलं होतं. पण स्टॉलमनच्या फ्री सॉफ्टवेअरच्या व्याख्येशी या तत्त्वांनी काही बाबतीत पूर्णपणे फारकत घेतली होती.

ही मार्गदर्शक तत्त्वं समजणं ओपन सोर्स सॉफ्टवेअरची व्याप्ती समजून घेण्यासाठी पुष्कळ उपयोगी आहेत. आपण त्यातल्या मुख्य मुद्दय़ांचा थोडक्यात परामर्श घेऊ या.

(१) सॉफ्टवेअरचं कोणत्याही रॉयल्टी शुल्काशिवाय वितरण करता आलं पाहिजे,

(२) सॉफ्टवेअरच्या वितरणासोबत सोर्स कोड देणं अनिवार्य आहे,

(३) सॉफ्टवेअरसाठी वापरल्या गेलेल्या लायसन्सने सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास संपूर्णपणे मुभा द्यायला हवी व वापरकर्त्यांला असे सुधारित सॉफ्टवेअर मूळ सॉफ्टवेअरच्या अटी व शर्तीवर वितरित करण्याचा अधिकार द्यायला हवा – हा मुद्दा फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या जीपीएल लायसन्सपेक्षा पेरेन्सने अशा प्रकारे बदलला की जिथे जीपीएल वापरकर्त्यांला सुधारित सॉफ्टवेअर मूळ सॉफ्टवेअरच्याच अटींवर वितरित करण्याचं बंधन घालतो तिथे पेरेन्सचं हे तत्त्वं वापरकर्त्यांला अशा अटींवर वितरित करण्याचा अधिकार देतं. अंतिम निर्णय हा वापरकर्त्यांपाशीच राहतो. या मुद्दय़ामुळे पेरेन्सने ओपन सोर्स सॉफ्टवेअरची व्याप्ती व्यापक केली होती. आता जसे जीपीएल लायसन्स पद्धती वापरणारे सॉफ्टवेअर पेरेन्सच्या ओपन सोर्स व्याख्येत चपखल बसले असते तसेच बीएसडीसारखी लायसिन्सग पद्धती वापरणाऱ्या सॉफ्टवेअरचादेखील या व्याख्येत सहज अंतर्भाव झाला असता.

(४) सॉफ्टवेअरच्या लायसन्सने त्याच्या वापरावर कसलीही बंधनं लादता काम नयेत. तसेच त्या सॉफ्टवेअरबरोबर वितरित होणाऱ्या इतर सॉफ्टवेअरवरसुद्धा बंधन घालता कामा नये. म्हणजेच जर एखाद्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वितरित होत असेल तर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचा सोर्स कोड खुला करण्याचं कसलंही बंधन त्या वितरकावर असणार नाही.

या मुद्दय़ांमध्ये पेरेन्सने फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या तात्त्विक बठकीशी संपूर्णपणे फारकत घेतली होती. पेरेन्सच्या मताप्रमाणे वापरकर्त्यांचं हित जपणं व ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या प्रसाराला कोण्तीही बाधा न येणं या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या आणि त्याने निर्मिलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांनी या दोन्ही गोष्टींची पुरेपूर काळजी घेतली होती.

पेरेन्सला एका गोष्टीची जाणीव होती की डेबियनसारखा प्रकल्प हा काही एखाद-दुसऱ्या माणसावर अवलंबून असता कामा नये व त्यासाठी त्या प्रकल्पाची संस्थात्मक रचना मजबूत असणं जरुरी आहे. त्यासाठी त्याने डेबियनची घटना तयार केली.

यात मुख्य म्हणजे त्याने डेबियनचं नेतृत्व वर्ष-दोन वर्षांत निवडणुकीच्या माध्यमातून बदलत राहील याची काळजी घेतली. डेबियनमध्ये आपला अधिकृत सहभाग देणारे वर्षांतून एकदा होणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराची निवड करतात. यामुळे एक तर प्रकल्पात कोणा एका व्यक्तीची मक्तेदारी राहत नाही व नव्या नेत्याबरोबर त्याच्या नावीन्यपूर्ण कल्पनासुद्धा राबवता येतात. डेबियनचा नेता काही वरिष्ठ तंत्रज्ञांचं एक शिष्टमंडळ बनवतो, ज्यातील प्रत्येक प्रतिनिधी प्रकल्पाच्या एका विशिष्ट बाबीवर काम करतो; उदाहरणार्थ-  सोर्स कोडमध्ये सुधारणा करणं, नवनव्या आवृत्त्या प्रकाशित करणं, सहयोगी तंत्रज्ञांशी संवाद साधणं, परिषदांचं आयोजन इत्यादी.

प्रकल्प अंमलबजावणीच्या अशा सुसूत्रीकरणामुळेच कदाचित डेबियन हा एक अत्यंत यशस्वी व अजूनही सक्रिय असलेला ओपन सोर्स प्रकल्प म्हणून ओळखला जातो. पन्नास हजारांहूनही अधिक सॉफ्टवेअर पॅकेजेसनी बनलेली व लिब्र ऑफिस, फायरफॉक्स ब्राऊझर, व्हीएलसी मीडिया प्लेअरसारख्या अत्यंत लोकप्रिय सॉफ्टवेअर प्रणालींचा अंतर्भाव असलेली अशी ती ऑपरेटिंग प्रणाली आहे. त्याचबरोबर डेबियनला आधारभूत ठेवून बनलेल्या ऑपरेटिंग प्रणालीसुद्धा (उबुंटू लिनक्स, काली लिनक्स, नॉपिक्स वगरे) लोकप्रिय आहेत.

सन १९९८ मध्ये स्वत:च निर्मिलेल्या डेबियनच्या घटनेनुसार पेरेन्स हा डेबियनच्या नेतेपदावरून पायउतार झाला व डेबियनमध्ये केलेल्या घटनात्मक कार्याला व्यापक स्तरावर नेण्यासाठी त्याने एरिक रेमंड यांच्यासह ‘ओपन सोर्स इनिशिएटिव्ह’ (ओएसआय) या ओपन सोर्सच्या प्रसाराला वाहून घेतलेल्या ना-नफा संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. डेबियनच्याच फ्री सॉफ्टवेअर मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन ओएसआयने प्रथमच ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या व्याख्येची निर्मिती केली- जी आजही ओपन सोर्सची अधिकृत व्याख्या मानली जाते.

सन १९९८-९९चा हा कालखंड लिनक्स व ओपन सोर्स व्यवस्थेसाठी ऐन बहराचा होता. सर्वच स्तरावर दोघांचीही यशस्वी घोडदौड सुरू होती. पण कोणत्याही बाबतीतलं यश, मग ते वैयक्तिक वा सामूहिक स्तरावर असो, सहजासहजी व सरळसोट मार्गाने येत नाही. अनेक प्रकारचे वाद, सत्तासंघर्ष, हेवेदावे यांतून पार पडावं लागतं. लिनक्स व ओपन सोर्स व्यवस्थासुद्धा याला अपवाद नव्हती. एका बाजूला व्यावसायिक यश व प्रसिद्धी मिळत असताना दुसऱ्या बाजूला तिच्या अस्तित्वाचा कस लागेल असा वाद लिनक्सच्या व्यवस्थापनात झाला.

amrutaunshu@gmail.com

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.