सोलापूर : घरात बहिणीबरोबर ओढणी वापरण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर मनस्ताप होऊन अकरा वर्षांच्या शालेय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील कुमठा नाका परिसरातील महाराणा प्रताप झोपडपट्टीत घडली. या घटनेमुळे तेथील पालकवर्गाला धक्का बसला आहे.

सोनाली जयसिंह पंतुवाले असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मृत सोनाली हिच्या घरात आजीसह आई, दोन भाऊ व बहीण राहतात. तिच्या वडीलांचे निधन झाले आहे. तर आई विडी कामगार आहे. घरात ओढणी वापरण्याच्या कारणावरून तिचे आपल्या बहिणीबरोबर सकाळी भांडण झाले होते. शाळेसाठी वापण्यात येणारी काळ्या रंगाची ओढणी सोनाली हिला हवी होती. परंतु बहिणीने न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणानंतर सोनाली हिला मनस्ताप झाला होता. दुपारी बाराच्या सुमारास ती शाळेला जाण्यासाठी तयारही झाली होती. तर आई विडय़ांचे माप देण्यासाठी विडी कारखान्यात गेली होती. आजी शेजारी गेली होती. सोनाली हिने घरात एकटीच असताना घरातील खुंटीला ओढणीने गळफास लावून घेतला. बराच वेळ सोनाली घरातून बाहेर न आल्याने आजीने आवाज दिला. परंतु काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आजीने शेजारच्या तरुणाला बोलावले. घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता सोनाली ही खुंटीला गळफास घेऊन लटकलेली दिसली.

घराचा दरवाजा तोडून सोनाली हिला बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. सदर बझार पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.