दिगंबर शिंदे

जत तालुक्यातील उमराणी येथे गेल्या आठवडय़ात सुमारे १८ लाखांचा १४७ किलो ओला गांजा जप्त करण्यात आला. या गांजाचे उत्पादन घेण्यामागे कमी श्रमात जास्त उत्पादन हा हेतू असला तरी याची पाळेमुळे दाक्षिणात्य झगमगत्या दुनियेतील नशाबाजीशी निगडित आहेत. पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला अटक केली आहे. जत तालुक्यात पुर्वीही असे प्रकार उघडकीस आले आहेत.

जत तालुक्यात कन्नड भाषिक लोकांची संख्या लक्षणीय आहे. विकासाच्या दृष्टीने मागास असल्याने येथे काम करण्यास अनेक अधिकारी नाराज असतात. जतला एखाद्या कर्मचाऱ्याची बदली केली गेली तर ती एक प्रकारची शिक्षाच समजली जाते.

या तालुक्यात गेल्या पाच-दहा वर्षांत सर्वात मोठी कारवाई करून गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गांजा लागवड उघडकीस आणली. एका शेतकऱ्याने उसाच्या फडात गांजाची लागवड केली असल्याचे समोर आले. तयार झालेल्या गांजाची वाळवण करून त्याची विक्री कर्नाटकमधून हैद्राबादसाठी केली जाते.

वाळलेल्या गांजा भुकटीची गोळी तयार करून ती विक्री करण्याची पद्धत तस्कराकडून विकसित करण्यात आली आहे. एका गोळीची किंमत सात-आठशे प्राथमिक पातळीवर असली तरी प्रत्यक्षात नशा करणाऱ्या व्यक्तीला या गोळीसाठी पाच हजार रुपये मोजावे लागतात. व्यसनाला चटावलेल्यांकडून या गोळीसाठी हजारो रुपये मोजले जातात. या गोळीचा ग्राहक वर्ग प्रामुख्याने दाक्षिणात्य सिनेक्षेत्रातील वर्ग आहे.

याचबरोबर सांगली मिरज शहरात काही ठिकाणी हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात येते, या हुक्का पार्टीसाठी प्रामुख्यांने गांजाचा वापर करण्यात येतो. यासाठी गांजाची दहा ग्रॅमची एक पुडी शंभर रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत विकली जाते. मिरज शहरात काही भागात राजरोस गांजा विक्री केली जाते.

प्रबोधनाची गरज

याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे, मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. शहरी भागातील नशाबाजांची केंद्रे उद्ध्वस्त करीत असताना तरुण वर्गाला या नशेपासून रोखण्यासाठी प्रबोधन आणि मानसिक सक्षमीकरणासाठी समुपदेशन केंद्रांची गरज आहे. केवळ कारवाई करून हा प्रश्न अधिक जटिल बनू शकतो. मात्र यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून या तरुणांना नशेच्या मायाजालापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

गांजाची लागवड सीमावर्ती भागात केली जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवायावरून स्पष्ट झाले आहे. गांजा सुकवून विक्री केली तर त्याची किंमत जादा मिळते. ओला गांजा किलोला सात हजार तर सुका गांजा १२ ते १५ हजार रुपये दराने विकला जातो. तर १०० ग्रॅम सुका गांजा हजार रुपयापर्यंत प्लास्टिकच्या पुडीतून विकला जातो. याची प्रक्रिया करून तयार केलेल्या दहा ग्रॅमच्या गोळीसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नशाबाजांकडून दोन ते पाच हजार रुपये मोजले जातात.

नशा आणणाऱ्या पदार्थाची देवघेव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कायमच सतर्क राहिली आहे. असे प्रकार कोठे घडत असतील तर जनतेने धाडसाने पोलिसांना माहिती द्यावी, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अमली पदार्थापासून तरुणाईला वाचविणे ही जशी पालकांची जबाबदारी आहे तशीच ती समाजाचीही जबाबदारी आहे. प्रशासन अशा प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टींचे समूळ उच्चाटन करण्यास सक्षम आहे.

– मनीषा डुबुले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सांगली.