गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कर्नाटकमधील गाणगापूर येथील दत्तदर्शनासाठी गेलेल्या यात्रेकरूंच्या मोटारीची लक्झरी बसशी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १८ जण ठार, तर चारजण जखमी झाले. अपघातग्रस्त मोटारीतून प्रवास करणारे यात्रेकरू सांगली जिल्ह्यातील जत कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. देवदर्शन आटोपून गावी परतत असताना सोमवारी दुपारी कर्नाटकातील शिंदगी येथे ही दुर्घटना घडली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बसप्पावाडी व कोकळे आणि जत तालुक्यातील बागेवाडी व कंठी येथील यात्रेकरू क्रुझर या वाहनाने गाणगापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ते परतत असताना िशदगी (जि. विजापूर) या ठिकाणी आले असता समोरून येणारी लक्झरी बसशी त्यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाली.
क्रुझर वाहनातून २२ यात्रेकरू प्रवास करीत होते. त्यापैकी १७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीला रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याने प्राण सोडले. अन्य चारजणांवर विजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजापूर पोलिसांनी या दुर्घटनेची सांगली पोलिसांना माहिती दिली असून, अपघातातील मृतांची नावे मात्र रात्री उशिरापर्यंत मिळालेली नव्हती. अपघातस्थळी मदतकार्यासाठी सांगली पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांगितले.