उत्तराखंड येथील जलप्रलयानंतर सुरू असलेल्या बचाव कार्यात सहभागी असलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये धुळे जिल्ह्यातील शशिकांत रमेश पवार (३५) आणि जळगाव जिल्ह्यातील गणेश हनुमंत अहिरराव (२८) यांचा समावेश आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलात (आयटीबीपी) दोघे कार्यरत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेत जवान शहीद झाल्याचे वृत्त येऊन धडकताच शिंदखेडा व चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली.
कार्यकुशलतेमुळे या दोन्ही जवानांचा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकात (एनडीआरएफ) समावेश करण्यात आला होता. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील शशिकांत पवार हे दहा वर्षांपूर्वी तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गणेश अहिरराव हे नऊ वर्षांपूर्वी ‘आयटीबीपी’ या सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. शहीद शशिकांत यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, दोन विवाहित बहिणी, मुलगा असा परिवार आहे. शशिकांत यांचा भाऊही सैन्यदलात आहे. बेटावद या मूळ गावी शशिकांत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी गावातील गणेश अहिरराव हे शेतकरी कुटुंबातील. त्यांचे वडील शेती करतात तर लहान भाऊही सैन्यदलात आहे. गणेश यांच्या पश्चात पत्नीसह मुलगा व मुलगी, भाऊ व वडील असा परिवार आहे. या जवानांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर शिंदखेडा व चाळीसगाव हे तालुके शोकसागरात बुडाले. ग्रामस्थांनी उभयतांच्या घरी धाव घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. गुरूवारी दुपापर्यंत त्यांचे पार्थिव वडाळीत आणले जाणार आहे. सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

उत्तराखंडातील स्थिती
गौरीकुंडजवळ हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर मंगळवारी कोसळले होते. त्यामधील ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ आणि ‘डाटा रेकॉर्डर’ सापडले असून, हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण दगावल्याचे हवाई दलप्रमुख नॅक बाऊनी यांनी सांगितले. शुक्रवारपासून हवामान चांगले राहिल्यास मंगळवापर्यंत हवाई दल बचाव कार्य पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तराखंडमध्ये प्रतिकूल हवामानातही हवाई दलाचे मदतकार्य सुरूच आहे. अनेक ठिकाणी खराब हवामानाचा परिणाम जवानांच्या मदतकार्यावर झालेला नाही. खराब हवामानामुळे जोतिर्लिग येथील विमानतळावरून उड्डाणे उशिराने सुरू होती. केदारनाथ येथे सापडलेल्या मृतदेहांवर आज अन्त्यसंस्कार केले जातील. साथीच्या आजारांची भीती पाहता याबाबत तातडीने अन्त्यसंस्कार करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.