तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाण्याची बांधा

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात एकाच वेळी २० श्वानांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रासायनिक सांडपाण्याची बाधा या श्वानांना झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र येथील अधिकाऱ्यांनी कोणत्याही विभागाला न कळवताच या श्वानांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी शनिवारी सकाळच्या वेळी सुमारे २५ ते ३० श्वान फिरकत होते. अचानक थोडय़ा वेळाने यातील २० श्वान जमिनीवर पडून मृत्यूशी झुंज देत होते. मात्र व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील श्वानांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

या भागात मोठय़ा प्रमाणात रासायनिक सांडपाणी असल्याने त्यांची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मृत्यू झालेल्या श्वानांचे शवविच्छेदन करणे गरजेचे असतानाही येथील व्यवस्थापनाने चक्क मोकळ्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावली. या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे

तीन दिवस उलटले असतानाही कोणत्याही विभागाने साधी चौकशीही केलेली नसल्याचे प्राणिमित्रांकडून सांगण्यात आले.