संगमनेर : संगमनेर शहरातील लोकवस्तीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने संगमनेरकरांना अग्नितांडव अनुभवायला मिळाले. आग आटोक्यात आणण्यात सुमारे अठरा तासांनी यश मिळाले असले, तरी बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत ही आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीत सुमारे २२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची तीव्रता भीषण असल्याने गोदामाच्या छताचे आणि शटरचे पत्रे देखील वितळून गेले आहे.

आगीत कापूस गाठी, सोयाबीन, गहू, बाजरी, सरकी पेंड, बारदान आदी जळून खाक झाले. या सर्व मालाची किंमत अंदाजे २२ कोटींच्या आसपास असल्याचा अंदाज संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी वर्तविला आहे. आगीत नुकसान झालेल्या मालाचा विमा असल्याची माहिती मिळाली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीची माहिती मिळताच संगमनेर कारखाना, संगमनेर नगरपरिषद, मालपाणी उद्योग समूहासह अकोले, लोणी, राहाता, कोपरगांव, नेवासे, शिर्डी आदीसह जिल्हाभरातील अग्निशामक दलाचे बंब रात्रभर आग विझवत होते. आग लागली त्या वेळी शहरात जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीची वार्ता शहरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आग विझविण्यात अडथळे येत असल्याने घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी बघ्यांना लाठीचा प्रसाद दिला.

घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे सचिव सतीशा गुंजाळ, तहसीलदार अमोल निकम, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, यांच्यासह आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, महसूल, नगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

दरम्यान, दुपारी तहसीलदार निकम यांनी या आगीत सुमारे २२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. बुधवारी सायंकाळी देखील आग विझविण्याचे काम सुरूच होते. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून दाट लोकवस्तीत असलेल्या बाजार समितीच्या गोदामाच्या आगीची झळ परिसराला बसू नये यासाठी एकाच वेळी चारही बाजूंनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.