शहरातील एका धार्मिक स्थळात टाळेबंदी असतानादेखील राज्यातील व राज्याबाहेरील २३ लोकांना ठेवण्यात आले. त्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली नाही, म्हणून सुभेदारवस्ती भागातील एका धार्मिक स्थळाच्या सचिवाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जामखेड, नेवासे, राहुरी व नगर शहरातील धार्मिक स्थळांमध्ये टाळेबंदीच्या काळात देश—विदेशातील लोक आढळून आले होते.मात्र त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे नोंदविले होते. तसेच जिल्ह्यतील सर्व धार्मिक स्थळाची तपासणी सुरु केली होती. काही धार्मिक स्थळे सील करण्यात आली होती. या तपासणीमध्ये शहरातील सुभेदारवस्ती भागातील उमर फारुख मशिदीत २३ नागरिक आढळून आले. हे नागरिक अमरावती, पुणे, वर्धा व उत्तरप्रदेशातील आहेत. त्यांचे मशिदीतच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. तीन महिन्यापूर्वी पारनेर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा कार्यक्रम रद्द झाला. त्यामुळे हे नागरिक शहरातील उमर फारुख मशिदीत तीन महिन्यापासून थांबले होते. त्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यात ते अडकून पडले होते. मात्र मशिदीचा सचिव अब्दुल रहेमान मोहम्मद शेख याने पोलिसांना त्याची माहिती दिली नव्हती. त्यामुळे सचिव अब्दुल शेख याच्यासह २३ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहर पोलीस शिपाई रमीजराजा रफिक आत्तार यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन अब्दुल रेहमान मोहम्मद शेख याच्याविरुध्द टाळेबंदीच्या काळात मस्जिद उघडी ठेवून जमातीचे प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेरुन आलेल्या २३ जणांना लपवून ठेवल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पोलिस प्रशासनाने सदर २३ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन मस्जिदीत विलगीकरण केले आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई जोसेफ साळवी अधिक तपास करत असून त्यांच्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.