शासकीय योजनांमधील सुविधांचा परिणाम
शुध्दपाणी, एलपीजी गॅस, शौचालय, रोजगार यासह विविध शासकीय योजनांच्या लाभामुळे गावकऱ्यांचे जीवनमान उंचावल्याचे बघून ताडोबा बफर झोन हद्दीत असलेली, परंतु अधिसूचनेत समाविष्ट नसलेल्या ३३ गावांनी ताडोबा बफर झोनमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा दाखविली आहे. तशा आशयाचे पत्र संबंधित गावांनी क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड यांना दिले आहे.
आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोअर आणि बफर, असे दोन भाग आहे. कोअर झोनमधील पळसगाव सिंगरू व रानतळोधी या दोन गावांच्या पुर्नवसनाचे काम सुरू आहे, तर कोळसाचे ६० टक्के पुर्नवसन झाले असून उर्वरीत ४० टक्के काम लवकरच पूर्ण होणार आहे, तर ताडोबा बफर झोन मध्ये ७९ गावे आहेत. या सर्व गावांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे या गावातील लोकांचे आयुष्यमान पूर्णत: बदलून गेले आहे या गावकऱ्यांची आर्थिक प्रगती बघून ताडोबा बफर झोनच्या हद्दीत असलेली, परंतु अधिसूचनेत समाविष्ट नसलेल्या ३३ गावांनी ताडोबा बफर झोनमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर ताडोबा अंधारीचे क्षेत्र संचालक डॉ. जे.पी. गरड यांना लेखी पत्र लिहून तसे कळविले आहे. या गावांमध्ये चंद्रपूर परिक्षेत्र, पळसगाव परिक्षेत्र, खडसंगी परिक्षेत्र, शिवनी परिक्षेत्र, मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील ३३ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी याच गावांनी यासाठी नकार दिला होता. भाजपच्या विधान परिषद सदस्या शोभा फडणवीस यांनीही तेव्हा बफर झोनला कडाडून विरोध केला होता. एकदा का बफर झोन घोषित झाला की, गावकऱ्यांना निस्तार हक्कापासून वंचित राहावे लागेल. त्यांचा जंगलावरील हक्क नाहीसा होईल. अनेक र्निबध येतील व अनेक गोष्टींपासून त्यांना वंचित राहावे लागेल, यासाठी आंदोलनही केले होते, परंतु त्यांचा विरोध पूर्णत: राजकीय होता, हे आज स्पष्ट झाले आहे.

ताडोबातील ७९ गावातील गावकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत. त्यामुळे या ३३ गावकऱ्यांनीही ताडोबा बफर झोनमध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी. गरड यांनी लोकसत्ताला दिली. या सर्व ३३ गावाच्या सरपंचांकडून आम्ही पत्र लिहून घेत असून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करू, ताडोबाचा चौफर विकास होत असल्यामुळेच हे गावकरी यासाठी तयार झाले. त्यामुळे या गावकऱ्यांचा आर्थिक फायदाच होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.