नागपूर : नागपूर जिल्हा वगळता उर्वरित विदर्भात करोनाने ३६ जणांचे बळी गेले. त्यात यवतमाळ जिल्ह्य़ात तीन, अमरावती जिल्हा सहा, चंद्रपूर जिल्हय़ातील सात, वाशीम जिल्हय़ात एक, वर्धा जिल्ह्य़ातील सहा, बुलढाणा जिल्ह्य़ात एक, अकोला जिल्ह्य़ात तीन, गडचिरोली जिल्ह्य़ात एक, गोंदिया जिल्ह्य़ात तीन व भंडारा जिल्ह्य़ातील पाच जणांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ात सात जणांचा मृत्यू

चंद्रपूर : जिल्हय़ात चोवीस तासात सात करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ४३९ नवीन बाधितांची भर पडली आहे. बाधितांची एकूण संख्या ९ हजार ३५० वर गेली आहे. आतापर्यंत ५ हजार ३६२ जण करोनामुक्त झाले आहे. तर सध्या ३ हजार ९८८ बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत १४३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर शहरील पाच, भद्रावती व गडचिरोलीतील प्रत्येकी एक मृत्यूचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्य़ात सहा रुग्णांचे मृत्यू

वर्धा : शनिवारी जिल्हय़ात सहा करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असून नव्याने १६६ रुग्ण आढळून आले. आज सेलू येथील महिला, पुलगाव येथील दोन पुरुष, वध्रेतील एक महिला, हिंगणघाट व समुद्रपूर येथील एक अशा सहा रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूसंख्या ११२ वर पोहोचली असून करोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९३४ झाली आहे. तालुकानिहाय वर्धा १०१, देवळी १६, सेलू ११, आर्वी ४, कारंजा ६, हिंगणघाट २६ व समुद्रपूर १ अशी नवी रुग्णसंख्या आहे. आज ९८ जण करोनामुक्त झाले.

अमरावती जिल्ह्य़ात सहा रुग्णांचा मृत्यू

अमरावती : जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून शनिवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे करोनाबळींची संख्या २६८ वर पोहचली आहे. याशिवाय २४५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण करोनाबाधितांची नोंद १२ हजार ४७८ वर गेली आहे. आतापर्यंत एकूण ९ हजार ७४८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. १४६१ करोनाबाधितांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात ५७९ तर महापालिका क्षेत्रात ४२२ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार करण्यात येत आहेत. आज २६९ जण करोनामुक्त झाले.

भंडारा जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

गोंदिया : भंडारा जिल्ह्यात शनिवारी पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५३ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत २८८८ जण करोनामुक्त झाले असून १६६ बाधित रुग्णांची आज नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ४६७३ झाली आहे. करोनाबाधितांमध्ये भंडारा तालुक्यातील ९९, साकोली २४, लाखांदूर ९, तुमसर ८, मोहाडी ८, पवनी १४ व लाखनी तालुक्यातील ४ व्यक्तीचा समावेश आहे.

अकोला जिल्हय़ात तीन मृत्यू

अकोला : जिल्हय़ात तीन करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ७८ नवे करोनाबाधित रुग्ण शनिवारी आढळून आले. जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या ७०९१ झाली. आतापर्यंत जिल्हय़ात २२४ करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण ३६१ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २८३ अहवाल निगेटिव्ह, तर ७८ बाधित आढळून आले. सध्या १४९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जुने शहर येथील ६५ वर्षीय पुरुष, अकोट फैल येथील ८४ वर्षीय पुरुष व महसूल कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्ण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज ३६ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्हय़ातील ५३७१ जण करोनामुक्त झाले आहेत.

यवतमाळ जिल्ह्य़ात तीन जणांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्याने १७२ बाधित आढळले. मृतांची संख्या २४७ वर पोहोचली. आज १५५ जण करोनामुक्त झाले आहे. मृतांमध्ये यवतमाळ शहरातील ६९ वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील ७५ वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने बाधित आढळलेल्या १७२ जणांमध्ये १०४ पुरुष व ६८ महिला आहेत. जिल्ह्यात ७१४ सक्रिय बाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आठ हजार ९४ झाली आहे. यापैकी सहा हजार ५४२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्य़ात तिघांचा मृत्यू

गोंदिया : जिल्ह्य़ात शनिवारी तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर २३६ नवे करोनाबाधित आडळून आले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ६१६७ झाली आहे तर शनिवारी २७८ जण करोनामुक्त झाले.  आतापर्यंत ४११४ जण करोनामुक्त झाले आहे. जिल्ह्य़ात एकूण १९६७ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्य़ात एकूण ८६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

बुलढाणा जिल्हय़ात एक मृत्यू

अकोला : बुलढाणा जिल्हय़ात एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. १८४ नवे करोनाबाधित रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्हय़ातील १२७ जण करोनामुक्त झाले आहे. बुलढाणा जिल्हय़ातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे व रॅपिड टेस्टचे एकूण ५६० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३७६ अहवाल निगेटिव्ह, तर १८४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८४ करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६६०३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील ५४३१ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्हय़ात सध्या १०८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाशीम जिल्हय़ात एक मृत्यू

अकोला : वाशीम जिल्हय़ात एका करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली आहे. ८२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १३३ जण करोनामुक्त झाले. वाशीम येथील ५० वर्षीय महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज करोनाबाधित आढळून आलेले रुग्ण शहरासह जिल्हय़ातील विविध भागातील रहिवासी आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत ४०१७ करोनाबाधित आढळले असून, ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३२१४ करोनामुक्त, तर एक आत्महत्या धरून ८४ जणांचे मृत्यू झाले आहेत.

गडचिरोली जिल्ह्य़ात एकाचा मृत्यू

गडचिरोली : एकूण सक्रिय करोना बाधितांपैकी जिल्ह्य़ात वेगवेगळ्या तालुक्यातील ५५ जण करोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोलीमधील ३१ जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यात अहेरी १, आरमोरी ३, भामरागड ३, चामोर्शी ३, धानोरा ३, मुलचेरा ३, सिरोंचा १ व वडसा ७ जणांचा समावेश आहे. तर करोनामुळे घोट येथील एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

आ. प्रकाश भारसाकळेंना करोनाची बाधा

अकोला : भाजपचे अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या स्वीय सहायकालाही करोनाची लागण झाली. प्रकाश भारसाकळे यांच्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मूळचे अमरावती जिल्हय़ातील दर्यापूरचे असलेले प्रकाश भारसाकळे हे गत काही महिन्यांपासून त्यांच्या निवासस्थानीच होते. यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू होते. काही कार्यक्रमांमध्येही त्यांनी हजेरी लावली. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी करोना चाचणी करून घेतली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वीय सहायकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

करोनाबाधित कुटुंबातील व्यावसायिकांवर गुन्हे

यवतमाळ : कुटुंबातील काही सदस्य करोनाबाधित आढळल्यानंतरही व्यावसायिक प्रतिष्ठाण सुरू ठेवणाऱ्या येथील एका कुटुंबातील तीन सदस्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील स्टेट बँक चौक ते चर्च मार्गावरील एका व्यावसायिकाच्या कुटुंबात करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने या कुटुंबातील व्यक्तींना गृह विलगीकरणात राहण्याचे ओदश दिले होते. हे आदेश धुडकावून या कुटुंबातील एका व्यक्तीने आपले व्यावसायिक प्रतिष्ठान सुरू ठेवले. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली. तहसीलदार कुणाल झाल्टे, नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी विजय अग्रवाल आदींनी कारवाई पथकासह या व्यावसायिकाच्या प्रतिष्ठानास भेट दिली. तेव्हा ते सुरू असल्याचे आढळले. या व्यावसायिकाच्या कुटुंबातील सहा सदस्य करोनाबाधित असल्याचा अहवाल २० सप्टेंबरला प्राप्त झाला होता. त्यापूर्वीच तपासणीकरिता गेले असताना प्रशासनाने या कुटुंबाला १८ सप्टेंबरपासून पुढील १४ दिवस गृहविलगीकरणात राहण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचना धुडकावून या कुटुंबातील व्यक्तीने आपले प्रतिष्ठान सुरू ठेवून ग्राहकांचा जीवही धोक्यात घातल्याचे निदर्शनास आले. त्यावरून तहसीलदारांनी येथील पळसवाडी भागात राहणाऱ्या या कुटुंबातील तीन व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.