खोपोली येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणावर तब्बल ३ हजार ७२१ गांधीजींचे दर्शन झाले. गांधी जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लबच्या वतीन हा उपक्रम राबविण्यात आला. अिहसा व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी ‘मी गांधी’ या सदराखाली गांधींच्या वेशात हजारो शाळकरी मुले या उपक्रमात सहभागी झाली. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दखल घेतली जाणार असल्याचा दावा आयोजकांनी केला. लायन्स क्लबचे खोपोली शहर अध्यक्ष शेखर जांभळे यांनी गांधी जयंतीनिमित्त विश्वविक्रमी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गेले दोन महिने शेखर जांभळे व लायन्स क्लब व त्यांचे सहकारी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रयत्नशील होते. तीन वर्षांपूर्वी तामिळनाडू येथे एकाच पटांगणावर २ हजार ७०० विद्यार्थी गांधीजींच्या वेशात अवतरले होते. त्या समारोहाची गिनीज बुकात नोंद झाली होती. हा विश्वविक्रम मोडीत काढण्याचा तसेच खोपोलीचे नाव जगाच्या नकाशावर आणण्याचा त्यांचा मानस होता. यानुसार खोपोली परिसरात नगरपालिका व केटीएसपी मंडळांच्या शाळांमधील तब्बल ४००० हून अधिक विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात भाग घेण्याची विनंती करण्यात आली होती. खोपोली, खालापुरातील अनेक घटकांना त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यानुसार शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी जयंतीनिमित्त जनता विद्यालयाच्या पटांगणावर ३७२१ विद्यार्थी महात्मा गांधी यांच्या पेहरावात जमले. या वेळी स्थानिक आमदार सुरेशभाऊ लाड, आमदार जयंत पाटील यांच्यासह खोपोलीचे नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, उपाध्यक्ष रमेश जाधव व नगरसेवक, नगरसेविकांसह खोपोलीतील अनेक मान्यवर व लायन्सचे पदाधिकारी येथे हजर होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधीही या कार्यक्रमास उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानास शुक्रवारी १ वर्ष पूर्ण होत असल्याने या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले होते. स्वच्छता व अिहसेचा नारा या कार्यक्रमात देण्यात आला. या उपक्रमाची लवकरच गिनीज बुकात नोंद केली जाणार असल्याची माहिती या वेळी आयोजकांच्या वतीने देण्यात आली.