स्वातंत्र्यापासून रस्त्याची प्रतीक्षा; आदीवासी पाडय़ांतील ३७७ कुटुंबांचे हाल; सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेची उदासीनता

विजय राऊत लोकसत्ता

कासा :  सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील दाभलोन ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाडय़ांना स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही रस्ताच झाला नसल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील आदिवासींची परवड होत असून आजही ग्रामस्थांना दगडधोंडय़ातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे.

सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशाला अगदी जवळ लागून असलेली जव्हार तालुक्यातील दाभलोन ग्रामपंचायतीतील गावे खळीचामाळ १०२ कुटुंबे, राहतेपाडा ५५ कुटुंबे, गुंजनपाडा ४५ कुटुंबे, साखळीपाडा १०५ कुटुंबे, धोदडपाडा ४० कुटुंबे, जांभेचापाडा ३० कुटुंबे अशी सहा पाडय़ांची एकूण ३७७ आदिवासी कुटुंबांची वस्ती आहे. मात्र या आदिवासी पाडय़ांना आजही रस्ताच झाला नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. येथील ग्रामस्थांना गाव-पाडय़ांच्या रस्त्यासाठी झगडावे लागत आहे. येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने दुचाकी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात बिकट परिस्थिती असते.

दाभलोन ग्रामपंचायतीच्या सहा पाडय़ांत पक्का रस्ताच झाला नसल्याने एकूण ३७७ आदिवासी कुटुंबांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात या पाडय़ांतील ग्रामस्थांना तीन कि.मी. पायपीट करत किरमिरा येथे मुख्यरस्ता  गाठावा लागतो. या पाडय़ांतील जिल्हा परिषद शाळेतील येणाऱ्या शिक्षकांना पावसाळ्यात पायी यावे लागत आहे. रस्ताच नसल्याने रुग्णांची, शाळकरी विद्यार्थ्यांची आणि विशेषकरून गरोदर महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

निवडणूक आली की उमेदवारांचे कार्यकर्ते विकासाचा प्रचार करतात. मात्र येथे विकास कधी झालाच नाही. पाहिलाच नाही. पावसाळ्यात चिखल होऊ नये म्हणून आम्ही दगडमाती टाकून रस्ता करून पुढील वाट काढत असतो अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहे.  यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत

आम्ही ग्रामस्थांनी ग्रामसभेत अनेक वेळा याबाबत ठराव घेऊन शासनाला दिले आहेत. बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेकडून साधा खड्डीकरण रस्ता झाला नाही, तर डांबरीकरण कुठून होणार? आमच्या पाडय़ांना जोडणारे रस्ते लवकरच व्हावे, अशी आमची अनेक वर्षांची मागणी आहे.

– विनू पागी, सरपंच, दाभलोन